कोण ही रूपा? काय आहे तिची हकीगत? तिची आई मोलकरीण होती. एका खेडेगावात दोन श्रीमंत बहिणी राहात होत्या. त्यांचे एक मोठे शेत होते. शेतावर दुग्धालय होते रूपाची आई तेथे कामाला असे. तिचे लग्न झाले नव्हते. परंतु तिला मधूनमधून मुले होत. उपजली नाही तो ती मरत. तिची अशी पाच मुले मेली आणि सहावी मुलगी ती ही रूपा. ती नक्षत्रासारखी होती. त्या श्रीमंत बहिणींतील एकीने तिला पाळले, पोसले, वाढविले. प्रथम रूपा आईजवळच होती. तिच्या आईचे गाईच्या गोठयात बाळंतपण झाले होते. अंगावर दूध यावे म्हणून त्या श्रीमंत बहिणीने रूपाच्या आईला थोडे पैसे दिले, पोटभर खायला सांगितले. रूपा वाढली. तीन वर्षाची झाली, आणि तिची दुर्दैवी आई देवाघरी गेली. त्या श्रीमंत बहिणीने रूपाला आपल्या वाडयात आणिले. तेथे ती वाढू लागली. एक बहीण रूपाचे लाड करी, दुसरी बहीण तिला मारहाण करी. एक लिहा-वाचायला शिकवी, इतर कलाकुसरीचे काम शिकवी; दुसरी बहीण तिला झाडलोट करायला, भांडी घासायला, कपडे धुवायला लावी. एक बहीण तिला नटवी, सजवी; दुसरी तिला शिव्या देई; अशा दुहेरी वातावरणात रूपा वाढली. ती आता मोठी झाली. ती घरातील काम करी. भांडी आरशासारखी स्वच्छ घाशी. देवाची मनापासून भरपूर फुलांनी पूजा करी. लिही, वाची, भरतकाम करी.

गावातील शेतकर्‍यांच्या तरूणांकडून कामगारांच्या तरूणांकडून तिला मागणी आली. तिच्या आईचे ते दारिद्रयातले अनैतिक वर्तन सर्वांना माहीत होते. परंतु रूपा जणू देवता दिसे. तिच्या आईच्या हकीगती विसरून तरूण तिला वरायला तयार होते. परंतु गरिबाजवळ लग्न लावायला रूपाचे मन घेईना. तिला श्रीमंत बहिणींकडे सुखाची सवय लागली होती. ऐषआरामी जीवनाची चटक लागली होती. काबाडकष्टांचे, शेण गोळा करण्याचे जीवन तिला नको वाटे. ती सर्वांना नकार देई.

ती सोळा वर्षांची झाली. निर्मल, निष्पाप सौंदर्याची ती पुतळी होती. आणि एके दिवशी त्या बहिणीचा तरूण भाचा आला. तो पदवीधर होता. श्रीमंत होता. त्याचे तिच्यावर नि तिचे त्याच्यावर गोड प्रेम जमले. परंतु तो लगेच गेला. जाताना दोघांचे डोळे भरून आले. दोन वर्षांनी तो भाचा पुन्हा आला. परंतु पूर्वीचा निर्मळ, निष्पाप तरूण तो राहिला नव्हता. तो सुखविलासी, भोगी बनला होता. तो लष्करात मोठा अधिकारी होणार होता आणि लष्करात लायक ठरावे म्हणून सामान्य नीती त्याने कधीच सोडली होती. तो धूम्रपान करी. मद्यपान करी. तो बाहेरख्यालीही होऊ लागला होता. रूपाला त्याने पाहिले. बुभुक्षित डोळयांनी पाहिले. त्याने शेवटी तिला मोह पाडला. त्याने तिला भोगले, आणि त्याची दोन दिवसांची रजा संपली. जाताना शंभर रूपयांची नोट त्याने तिच्या हातात कोंबली! पाच महिन्यांनी तिच्या लक्षात आले की, पोटात बाळ वाढत आहे. ती सचिंत झाली. लाज कशी राखायची? तो कोठे गेला? त्या घरात ती एके दिवशी उध्दटपणाने वागली. तिला हाकलून देण्यात आले. आता त्या बहिणी तिला काय म्हणून ठेवतील? त्यांच्या भाच्याचे ते पाप त्या काय म्हणून घरात राखतील? रूपा निघून गेली. ती त्या मोठया शहरात गेली. तिच्याजवळ ते शंभर रूपये होते. ती कोठे राहणार? एका पोलीस अंमलदाराकडे ती मोलकरीण म्हणून राहिली. परंतु पन्नास वर्षांचा तो अंमलदार तिला का सोडील? तो तिला सतावू लागला. एकदा तर तो फारच रंगात आला. तिने त्याला संतापाने दूर लोटले. ‘पाजी, पापी सैतान’ म्हणून तिने त्याला लोटले. तो दाणक्न पडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel