पोषाख करून, उंची बूट घालून, सिगरेट तोंडात धरून तो बाहेर पडला. दारातच घोडयांची गाडी उभी होती.

‘रावसाहेब गाडी पाहिजे ना? तयार आहे. काल ज्या श्रीमंत घरी गेला होतात तिकडेच जायचे ना? मला वाटलेच होते की, आजही तुम्हांला गाडी लागेल. बसा.’ तो गाडीवान म्हणाला.

‘मला कोर्टात जायचे आहे’ असे म्हणून तो त्या बग्गीत बसला. ‘या गाडीवानांनाही माझे संबंध माहीत आहेत! परंतु आणि खरेच मी लग्न का करू नये? हल्ली माझ्या जीवनाला काही अर्थच नाही. लग्न केले तर बरे नाही का? मी कुटुंबी होईन. जबाबदारी कळेल. सुखी होईन, नीतिमानही होईन. मुलाबाळांचा आनंद. खरेच, का बरे मी लग्न करू नये? परंतु माझे लग्न म्हणजे माझ्या स्वातंत्र्यातील विघ्न नाही का  माझे स्वातंत्र्य कमी नाही का होणार? पत्नी मिळेल, ती तरी कशी निघेल कोणी सांगावे? लग्न म्हणजे जुगार आहे, सोडत आहे; परंतु तरूण युवायुवतींना अशी भीती कधी वाटते का? माझे तारूण्य -ते पहिले उसळणारे तारूण्य- निघून गेले आहे. आता मी जरा पोक्त झालो आहे. म्हणून हे भितुरडे विचार, म्हणून शंका. काल जिच्याकडे गेलो होतो तिच्याशी करावे लग्न? ती माझा स्वभाव थोडा फार जाणते. परंतु तिच्याहून अधिक चांगली मुलगी नाही का मिळणार? हिचे आता सत्तावीस वर्षांचे वय आहे. आणि मी काही तिचा पहिला प्रियकर खात्रीने नसेन. प्रतापच्या मनात हा विचार येताच तो दु:खी झाला. त्याचा अभिमान दुखावला. माझ्याशिवाय दुसर्‍या कोणावर तिने प्रेम केले असेल तर काय अर्थ? तो विचार त्याला असह्य झाला. परंतु ‘मी तिला भेटेन असे तिला स्वप्न का पडले होते? ती तरी काय करणार?’ परंतु विचार करता करता तो अस्वस्थ झाला. त्या मुलीशी लग्न करायला जितकी अनुकूल कारणे त्याला दिसत होती, तितकीच प्रतिकूलही दिसत होती. परंतु त्या अधिकार्‍याच्या पत्नीचे प्रकरण निकालात निघाल्याशिवाय या नव्या भानगडीत पडू नये असे त्याने मनात ठरविले.

आज तर तो सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी जात होता. कोर्ट आले. तो उतरला. भाडे देऊन रूबाबदारपणे तो आत गेला. जिकडे तिकडे गडबड होती, गर्दी होती. नोकरांची धावपळ सुरू होती. हातात कागद घेऊन ते हाकारे पुकारे करीत होते. ललकार्‍या मारीत होते. तेथे वकील, बॅरिस्टर वगैरेंची झुंबड होती. वादी, प्रतिवादी उभय पक्षांच्या बाजू मांडल्या जात होत्या. ज्यांना काम नव्हते असे बेकार वकील रिस्टवॉचकडे बघत आणि आपणही महत्त्वाचे आहोत असे दाखवीत उगीच द्रुतगतीने इकडून तिकडे, तिकडून इकडे ये जा करीत होते. कोणी प्रेक्षक होते. कोणी बसून होते.

‘फौजदारी कोर्ट कोणत्या बाजूला?’ प्रतापरावांनी विचारले.

‘उजव्या बाजूला जा; मग डाव्या बाजूला वळा; तेथील दुसरा दरवाजा.’
तो तेथे गेला. तेथे दोन गृहस्थ उभे होते. एक जो उंचसा होता तो व्यापारी होता. दुसरा चिक्कू सावकार होता. लोकरीच्या कापडाविषयी त्यांचे बोलणे चालले होते.

‘ज्यूरी येथेच का आहे?’ प्रतापने विचारले.

‘हो. आमच्यापैकीच तुम्हीही एक दिसता. आपले नाव काय?’

‘प्रतापराव.’

ज्यूरीत निरनिराळया पेशांचे दहा लोक होते. कोणी बसले होते. कोणी हिंडत होते. कोणी एकमेकांचा परिचय करून घेत होते. आपण सार्वजनिक सेवा करायला आलो आहोत, जबाबदारीच्या कामासाठी आलो आहोत, या विचाराने त्यांना समाधान वाटत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel