युद्ध ही अति भयंकर वस्तु आहे यांत शंका नाही. अर्जुनानें युद्धामुळें जे अनर्थ होतात म्हणून सांगितलें त्याचा अनुभव मागील महायुद्धांत आला, या महायुद्धांत आणखी शतपटीनें येईल. परंतु अर्जुनाला आलेलें हें वैराग्य खरें होतें का? त्याच्या जीवनांत मुरलेला तो विचार होता का?कालपर्यंत तो यु्द्धें करीत होता. शत्रूंची मुंडकी चेंडूप्रमाणें उडवीत होता. आतांच अकस्मात कोठून आले वैराग्य? तें वैराग्य त्याच्या अनुभवांतून परिणत होऊन आलेले नव्हतें. अर्जुन क्षत्रियधर्म सोडून कोठें हिमालयांत जाता तर तेथें मृगया करूं लागला असता. तेथल्या जातीजमातींना जिंकून नवें राज्य मिळवता. हिमालयांत सिमले उभारता. संन्यासधर्माची ती विटंबना झाली असती. अर्जुनाचीहि ती फजिती झाली असती. भगवान श्रीकृष्ण हें सारें ओळखीत होते. म्हणून अर्जुनाच्या सर्व म्हणण्याला त्यांनी “प्रज्ञावाद” असें म्हटलें आहे. आपल्या मनांत जें येतें त्याच्या समर्थनार्थ आपण बुद्धि लढवित असतों, सत्यासाठीं म्हणून नव्हे. तो प्रज्ञा-वाद असतो. अपण नाना मुद्दे मांडीत बसतो. त्यांत सत्यता नसते. आपलें मनहि आपणांस खात असतें.

एकादा न्यायाधीश असावा. त्यानें आजपर्यंत अनेकांना सहज फांशीची शिक्षा फार वाईट. अपराध्यानें भावनेच्या भरांत कांही केलें म्हणून आतां आपण त्याला शांतपणें का फांशी द्यावयाचें? छे :! हें अयोग्य आहे.” त्या न्याधीशासमोर मुलगा असतो. स्वत:चा मुलगा. त्या मोहांतून, त्या आसक्तीतून त्याचें तें वैराग्य जन्मलेलें असतें. तो तात्पुरता जन्मलेला विचार असतो. मोहाला सांवरून धरण्यासाठीं, आसक्तीचे स्वरूप लपविण्यासाठीं तो विचार जन्मलेला असतो.

अर्जुनाचे अगदी तसेंच आहे. स्वजन व परजन असा तो भेद करतो. आजपर्यंत परजन त्यानें कितीतरी मारले. परंतु स्वजन दिसतांच युद्ध वाईट म्हणून तो म्हणतो. ही आसक्ती आहे. हा मोह आहे. कर्तव्य करीत असतां स्वजन, परजन भेद करावयाचा नसतो.

अर्जुनाला संन्यासधर्म श्रेष्ठ वाटतो. परंतु तो झेंपला पाहिजे ना? आपापल्या वृत्तीप्रमाणेंच अनासक्त राहून समाजसेवा आपण केली पाहिजे. दूध पाण्यापेक्षां किमतीचें आहें. आपण जप माशाला म्हणूं “माशा, तुला दुधांत ठेवतों. पाण्यापेक्षां दूध अधिक मोलवान आहे” तर तो काय म्हणेल? मासा पाण्यांतच जगेल. दुधांत मरेल. मोरोपंतांनीं म्हटले आहे:

“यज्जीवन जीवन तो दु्ग्धी वांटेल काय हो मीन?”


म्हणून दुस-याचा धर्म जरी श्रेष्ठ वाटला तरी तो आपणांस झेंपला पाहिजे ना? सूर्याचा प्रकाश चांगला खरा. परंतु आपण त्याच्या जवळ जाऊं तर जळून जाऊं. पृथ्वीवर राहूनच त्याचा प्रकाश घेऊं व वाढूं. पृथ्वीवर राहणें आकाशांत राहण्यापेक्षां कमी प्रतीचें वाटलें तरी तसें करण्यांतच आपले कल्याण आहे, आपला विकास आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel