वि-कर्माची अशी ही महान् शक्ति आहे. बंदुकीची लहानशी गोळी, परंतु तिला काडी लावा. केवढी तिची शक्ति असते तें दिसेल. तसें विकर्माचें आहे. लहानशा कर्मांत विकर्मांची शक्ति ओततांच मोक्षफळ हातीं येतें. एकादा ओबडधोबड भला मोठा ओंडका असावा तो कोणाच्या डोक्यांत घालूं तर डोकें फुटेल. परंतु त्या ओंडक्याला काडी लावा, त्याचें भस्म होईल. तें घ्यावें व खुशाल अंगाला फांसावे. त्या ओंडक्याचीच का ती राख असें मनांत येईल. परंतु त्या ओंडक्याचीच ती निरूपद्रवी राख.

ज्या कर्मांत मन नाही तें ओझें वाटते. त्याचा जोजार वाटतो परंतु कर्मांत मनाचें विकर्म ओतलें की मोकळें वाटतें. भगवान् विष्णूचें वर्णन आहे ना :

“शान्ताकारं भुजगशयनम्”


सर्पावर निजलेले असून ते शांताकार आहेत. महात्माजींना एकदां एकानें विचारलें “तुम्ही प्रचंड चळवळी करतां. किती तुमचे उद्योग ! तुमच्यावर किती टीका ! परंतु हें सारे करीत असतां तुम्हांला काय वाटतें? त्यांनी उत्तर दिलें “आंत तंबोरा लागलेलाच असतो.” महात्माजींच्या जीवनांतील हें संगीत, हें कोठून आलें? ही शांति कोठून आली? ते जें कांही करितात त्यांत त्यांचे विकर्म असतें. त्यामुळें मनाची शांति ढळत नाही. प्रसन्नता राहते.

रविन्द्रनाथांनी साधनेंत म्हटलें आहे “आपण विहिरीवरून एक घागरभरून पाणी घरी आणूं लागलों की ती घागर कडेवर बसलीच, डोक्यावर ओझें झालेंच. परंतु जेव्हां आपण पाण्यांत पोहत असतों, पुन्हां पुन्हां बुड्या मारीत असतों त्या वेळेस हजारों घनफूट पाणी डोक्यावर असतें. तरी तो बोजा आपण सुखानें उचलतों.” त्याप्रमाणें जनतेच्या सेवेंत जो बुडाला त्याला टीकांचे, निंदा-अपमानांचे बोजे वाटत नाहींत. तो ते सारें लीलया सहन करतो.

ही शक्ति कोठून येते, कशानें येतें? विकर्मानें येते. जें जें सेवाकर्म उचलाल त्यांत अंत:करण ओता. आपलें हृदय म्हणजे अमृताची कुपी आहे. हृदयांतील प्रेमाच्या गुलाबदाणींतील पाणी प्रत्येक कर्मावर शिंपडीत जा. तें कर्म सतेज होईल, टवटवीत दिसेल. त्या कर्माचा तुम्हांला बोजा वाटणार नाही. शिवाय अशी सतेज कर्में समाजासहि तेजस्वी केल्याशिवाय राहणार नाहींत.

सूर्याला रविवारची सुटी नाही. नदीला कधी सुटी नाही. त्यांचें सेवाकर्म रात्रंदिवस चाललें आहे. त्याप्रमाणें जो आपल्या सेवेंत अंतरात्मा ओततो त्याला थकवा वाटणार नाही, कंटाळा येणार नाही. कर्मातच त्याचा आनंद, कर्मांतच मोक्ष. कर्म करून जणुं तो अ-कर्मी असतो.

संत सेवाकर्म कधी सोडीत नाही. कारण मोक्ष म्हणून कांही निराळी वस्तु आहे असें त्यांना वाटत नाही. तुकारामांनी एके ठिकाणी गंमतीने म्हटलें आहे :

“कां रे पुंड्या मातलासी
उभें केलें विठोबासी”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel