आपलें सर्वांचे जीवन असेंच चाललेलें असतें. रात्री आपण आंथरूणावर पडलों म्हणजे दिवसा केलेल्या शेकडों गोष्टी आठवत नाहींत. त्या दिवसाच्या महत्वाच्या चारदोन गोष्टी डोळ्यांसमोर असतात. त्या दिवशींच्या उलाढालीचें तेवढेच फलित. एक महिना जातो. महिन्यांतील पाचदहा गोष्टी डोळ्यांसमोर असतात. त्या दिवशींच्या उलाढालीचे तेवढेंच फलित. एक महिना जातो. महिन्यांतील पाचदहा गोष्टी डोळ्यांसमोर राहतात. बाकीच्या गेल्या. वर्षे होतें. या वर्षांत काय केलें असा प्रश्न डोळ्यांसमोर येतात. असें वर्षानुवर्ष होत जातें. आणि मरतानां सर्व आयुष्याचें सार म्हणून कांही तरी फलित डोळ्यांसमोर उभें राहतें. या जीवनातील ता कमाई. अंकगणितांतील ती व्यवहारी अपूर्णांकांची उदाहरणें असतात. केवढाले ते अपूर्णांक वाढतात. परंतु शेवटीं शून्य किंवा एक असें सुटसुटित उत्तर येतें. तसें आपल्या जीवनाचें आहे.

जीवनाचें हें शेवटचें उत्तर धन्यतेचें यावें म्हणून आपण धडपडलें पाहिजे. या जगात आपण जन्माला आलों तेव्हां आपण रडत आलों तेव्हां आपण रडत आलों; परंतु सभोंवतीचे लोक आनंदले. त्यांनी पेढे वाटले. परंतु मरताना आपणांस आनंद होऊं दे व लोकांना रडूं दे. जीवन कृतार्थ झालें असें मनांत येऊन आपल्या तोंडावर मरतांना प्रसन्नता फुलूं दे. आणि लोकांना म्हणूं दे, “अरेरे ! किती सुंदर याचें जीवन ! हा सुंदर मंगल दीप का आतां विझणार?”

तुकारामांनी म्हटलें आहे :

“सोनियाचा कलश । माजीं भरला सुरारस”


सोन्याचा देह मिळाला. त्यांत का वासना-विकारांची दारू भरून ठेवायची ? का मंगल जीवनाचा सुधारस भरावयाचा ? मरतांना गत जीवनांतील मंगल कार्यांची स्मृति कृतार्थ वाटणें याहून धन्य तर काय आहे?

परंतु आपण प्रत्येक दिवशीं जर जपून न वागूं तर मरणाचे सोने होणार नाही. रोज वाटेल तसे वागाल तर मरताना रडाल. सोन्यासारख्या आयुष्याची माती कराल. म्हणून जपून जाऊं या. रोज ध्येयाचें स्मरण ठेवून वागूं या. परमेश्वर जीवनांत शिरायला सर्वत्र उभा आहे. ज्याप्रमाणें दार उघडतांच वारा आंत घुसतो, प्रकाश आंत शिरतो, त्याप्रमाणें तुम्हीं हृदय जरा मोठें करतांच, बुद्धि जरा विशाल करतांच, दृष्टि जरा प्रेमळ व पवित्र करतांच परमात्मा आंत शिरेल. रविंद्रनाथ गीतांजलीत एके ठिकाणी म्हणतात “ देवा, आयुष्यातील कांही क्षणांवर दिव्यतेचे शिक्के होते. तुझी मुद्रा होती.” प्रभु तुमच्या क्षणांवर दिव्यतेचे शिक्का मारावयास उभा आहे. तुम्ही प्रत्येंक क्षण ध्येयार्थ जावो म्हणजे मरण मंगल होईल. ध्येयाची संतत धारा सदैव स्त्रवूं दे.जें आज तेंच उद्या; जें या महिन्यांत तेंच पुढल्या; जें या वर्षी तेंच पुढल्या वर्षी; जे या जन्मी तेंच पुढल्या; अशा रीतीने जे थोर ध्येय मिळालें त्याचा मागोवा घेत सारखे जाऊं या. ग्रह सूर्याभोवती फिरून प्रकाशित होतात, त्याप्रमाणें ध्येयाभोंवती सतत कायावाचामानें करून प्रदक्षिणा घालीत राहून आपण आपलें जीवन प्रकाशित करूं या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel