अर्जुना, सोड अतर सारे विचार. एक गोष्ट लक्षांत ठेव. तूं मला शरण ये. माझी इच्छा ती तूं तुझी स्वत:ची कर. तुझी अशी निराळी इच्छा ठेवूंच नकोस.

आपण हा शेवटचा विचार सदैव ध्यानांत घ्यावा. समाजवाद का गांधीवाद, का कोणता वाद ? कोणता धर्म? भगवान् म्हणतात “सोड सारे धर्म व मला शरण ये.” कोणतेंहि कर्म करतांना आपण मनाला विचारावें “हे माझें कर्म देवाला आवडेल का? त्याच्यासमोर हें माझें कर्म मी घेऊन शकेन का?”

माझ्या मनांत कधी कधी विचार येतो की घरांत एकादी वृद्ध आजीबाई असावी. तिच्या नातवंडांनी तिच्या समोर कांदे, लसूण वगैरे नेऊन ठेवावें. ती आजीबाई म्हणेल “हें रे काय आणतां ? कांही न दिलेंत तरी चालेल, मी उपाशी राहीन. परंतु असलें नका आणूं.” असेंच तो पुराणपुरूष म्हणत असेल. ती जगन्माता आज हजारों वर्षें जणुं उपाशी आहे. तिला आवडणारा कर्ममेवा कोण देतो ? म्हणून तर द्रौपदीच्या एका पानानें त्याला ढेंकर आली. प्रभूला आफली कर्में आवडतील असें ज्याला म्हणतां येईल तो धन्य होय.

शेक्सपिअर या इंग्रज कवीनें म्हणून म्हटलें आहे की “जें जें तूं करूं पाहशील तें देवासाठी असो, तुझ्या देशासाठी असो.” शेक्सपिअरनें आधी देश नाही घेतला. आधी देव घेतला. सत्य घेतलें. इंग्रज आपल्या देशाची सेवा करीत आहेत. परंतु हिंदुस्थानची हलाखी करून स्वदेशाची त्यांनी चालविलेली सेवा ही देवाघरी रूजू होईल का? कधीहि नाही.

म्हणून आपल्या कर्मांना मनांतील विचारांना एक कसोटी लावावी. त्या भगवंताच्या समोर ही कर्में, हे विचार न्यायला मला लाज नाही ना वाटणार ? त्याच्या समोर मान खाली घालावी नाही ना लागणार ? असें स्वत:ला विचारावें. ईश्वराची इच्छा ती स्वत:ची करावी. आपल्या कर्मांतून प्रभूचे हेतू प्रकट करावेत. मी कोणी नाही. सारें तो. त्याचें संगीत माझ्यांतून स्त्रवूं दे. त्याच्या इच्छा माझ्यांतून मूर्त होऊं देत. त्याच्या हातातील मी साधन. तो दादु पिंजारी पिंजणाचे काम करीत असे. पिंजणाची तार तुंइं तुंइं तुंइं करी. दादु पिंजा-याला त्या तुंइं तुंइं मध्यें काय बरें ऐकायला येई ? तो म्हणे, “देवा, तुंहि तुंहि तुंहि” तूंच केवळ आहेस. तूंच आहेस.

ॐ तत्सत्

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel