तो खरा संन्यास ज्यांत अपरंपार कर्मशक्ति असते. भोवरा अत्यंत गतिमान् असतो तेव्हां स्थिर वाटतो. शुक्राचार्य संन्यासी होते. परंतु परिक्षिताला भगवंत सांगू लागले तर सात दिवस थांबले नाहीत. सारखी कर्मधारा जणुं ओतीत राहिले.

समजा, महात्माजी येथें येऊन एकदम उभे राहिले. ते नुसते येतांच सारे एकदम उठतील, स्वच्छता करितील, उद्योग करूं लागतील. महात्माजींचे नुसतें तें अस्तित्व प्रचंड चालना देईल. संन्यास म्हणजे कर्माची अपरंपार प्रेरणा देण्याची शक्ति.

आई मुलावर रागावते. ती अबोला धरते. ती एकहि शब्द बोलत नाही. मुलगा हिंपुटी होतो. तो आईजवळ जातो व म्हणतो “दोन थोबाडीत मार, पण बोल. तुझें हें न बोलणेंच मला फार छळीत आहे. मला दु:ख देत आहे. आई, तुझा हा अबोला असह्य आहे.” आईच्या त्या न बोलण्यांत किती बोलणे होतें!

चांगदेवांना ज्ञानेश्वरांस पत्र लिहावयाचें होते. परंतु तीर्थस्वरूप लिहावें की चिरंजीव लिहावें तें त्यांना समजेना. ज्ञानदेव वयानें लहान, परंतु ज्ञानानें मोठे. शेवटी चांगदेवांनीं कोरेंच पत्र पाठविलें. आणि तें कोरें पत्र मुक्ताबाईनें वाचलें ! चांग्या, इतकें शिकलास तरी कोरा तो कोराच तूं” असें ती म्हणाली. ज्ञानदेवांनी तें कोरें पत्र वाचून उत्तर पाठविलें.

पंढरपूरला कटीवर हात ठेवून पांडुरंग मुकेपणानें उभा आहे. परंतु त्यांतील अर्थ शंकराचार्यांनीं ओळखला. ते पांडुरंगाष्टकांत म्हणतात “माझ्या भक्तांना संसारसागर कमरेइतकाच खोल आहे असें हा मुका पांडुरंग कमरेवर हात ठेवून सांगत आहे.”

संन्यासांत असा अपार अर्थ असतो. त्याचा खरा संन्यास कीं जो उभा राहतांच सा-या विश्वाला प्रेरणा मिळते. ज्यानें अपरंपार सेवा जन्मोजन्मीं ओतली असेल त्याच्याच संन्यासांत अशी शक्ति असूं शकेल. बापानें जन्मभर शेतींत काबाडकष्ट केले. आतां तो म्हातारा झाला. त्याचा मुलगा आतां काम करतो. मुलगा सायंकाळी दमून घरीं आला की बाप त्याच्या पाठीवरून हात फिरवतो व म्हणतो “बाळ तूं दमतोस, माझ्यानें कांही होत नाही.” मुलगा म्हणतो “बाब, तुमच्या या प्रेमळ पाहण्यांत व या हात फिरवण्यांत सारे आहे. तुमची कृपादृष्टि मला अपरंपार शक्ति देते.” बापाच्या त्या सुरकुतलेल्या हातांत, त्या संन्यासी हातांत मुलाला कर्मप्रेरणा देण्याची अपार शक्ति असते.

कर्मयोग व संन्यासहे एकरूप आहेत. दगड म्हणजे धोंडा म्हणजे फत्तर तसें कर्मयोग म्हणजेच संन्यास. असा हा निष्काम कर्मयोग अंगी बाणवावा. कर्में करीत राहून मुक्तस्थिति अनुभवावी. ती स्थिति प्राप्त करून घ्यावयाची आहे.

कर्मामुळें चित्तशुद्धि होत जाते. कर्मामुळें आपलें स्वरूप प्रतीत होतें. समजा, एकादा हिमालयांत जाऊन आला. स्वत:ला शांति लाभली असें त्याला वाटतें. त्याला कोणीतरी भक्तिभावानें जेवायला बोलावतो. बाबजी जेवायला येतात. तेथें एकादें लहान मूल दाराच्या कडीशीं खेळत असावें, त्या नादब्रह्मांत तें बालक रंगून गेलें असावें. परंतु हिमालयांत शांति मिळवून आलेल्या बाबाजीला ती कटकट वाटते ! त्या आनंदमूर्ति बालकाच्या अंगावर तो ओरडतो. अशी ही शांति काय कामाची? तुमच्याजवळ क्षमा-शांति किती आहे त्याची जीवनांत परीक्षा द्या.

आपण रात्रंदिवस कर्में करीत असतों. कर्में करतांना अनेकांशी संबंध येतात. आपण कधी रागावतों, कधी भांडतों. कधी द्वेषमत्सर मनांत येतात. अशा रीतीनें आफल्या मनांत काय काय घाण आहे ती आपणांस दिसते. आपण ते दोष दूर करण्याची खटपट करूं लागतों. उत्तरोत्तर निर्मळ होत जातों. कपडे उन्हांत वाळत घातले म्हणजे लपलेले ढेंकुण जसे बाहेर पडतात, तसे आपल्या मनांत लपलेले रागद्वेष, कामक्रोध कर्में करीत असतां प्रकट होतात. ते धरावे व त्यांचा नि:पात करावा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel