आणि रजोगुण म्हणजे काय ? रजोगुण म्हणजे सुखोपभोगासाठी धांवपळ. कुंभकर्ण झोपून रहावयाचा, तर रावण सारखा साम्राज्य वाढवीत रहायाचा ! एक मूर्तिमंत तमोगुण, तर दुसरा मर्तिमंत रजोगुण ! रजोगुण म्हणजे वायफळ हालचाल. उगीच वटवट करणें, उगीच आदळआपट. ज्या गोष्टीचा जीवनाच्या विकासाशीं संबंध नाही अशा फाल्तु गोष्टी करीत बसणे. आपण आपली कितीतरी शक्ति वायांदवजीत असतो. वास्तविक ही सारी शक्ति ध्येयार्थ खर्च केली पीहिजे. ज्याप्रमाणे सूर्याचे किरण भिंगावर एकत्र पाडले तर त्यांतून ठिणगी पडते, त्याप्रमाणें आपल्या सर्व शक्तीचा झोत आपल्या ध्येयावर सोडला पाहिजे. परंतु आपण शक्ति फुकट दवडीत असतों. गप्पाच मारूं; खाण्याच्याच चर्चा करूं; सिनेमा-बोलपटांतच केवळ रंगूं; नाना प्रकारचे नाना रंगाचे कपडेच करीत बसूं; केसच कुरवाळीत बसूं; बायका कानांना व नकांना भोंकें पाडतील. नाकांत चमक्या बसवतील. कानांत मोती घालतील. या देहांतच अलंकार ठेवण्यासाठी पेट्या जणुं तयार करतात ! या सर्वांचा काय उपयोग ? यानें जीवन समृद्ध होतें का ? मनाचा, हृदयाचा विकास होतो का?
कोणी विमानांत बसून पक्षी होऊं पाहतो. कोणी पाणबुडीत बसून मासा होऊं पाहतो. माणसाच्या आकारांत राहून पशुपक्षी होण्याच ?? जणुं त्याला होऊं लागतात ! हे सारे सोस कशासाठी ? याचा अर्थ विमानाचा शोध लागूं नये असें नाही. दुष्काळी भागांत धान्य पाठविण्यासाठी विमानें आणा. त्या त्या गोष्टींनी जीवनात सुंदरता ?? तर ती हवी आहे. परंतु उगीच फाफट पसारा काय कामाचा?
समाजोपयोगी कर्में करतां यावीत म्हणून देहाची जोपासना केली पाहिजे. अन्नवस्त्रादि आवश्यक गरजा भागल्याच पाहिजेत. परंतु ज्या गोष्टी आपण उन्नत न होतां कदाचित् घसरण्याचाच संभव त्या कशाला करा ? खातच बसले, खेळतच बसले, चिरूटच ओढीत राहिले, पानसुपारीचे बारच भरीत राहिले, सारखे गातच बसले, सारखे खो खो हंसतच राहिले, सारखे नट्टापटटाच करीत राहिले. सारखे भांडतच बसले, सारखी काटाकाटी व छाटाछाटी ! असलें हे जीवन भेसुर आहे. तमोगुणी जीवनामुळें कधी फुलपाखरें तर कधी वृकव्याघ्र असे आपण होतों. केवळ शारिरिक सुखोपभोगाचा हव्यास धराल तर फसाल, मराल, नष्ट व्हाल.
सेवेची उदंड कामें पडली आहेत. राष्ट्राच्या उभारणीची अनंत कामें आहेत. महात्माजी नाना प्रकारची सेवा करण्यासाठी तुम्हांला बोलावीत आहेत. ख्रिस्त एकदां म्हणला “अरे, कोळी मासे पकडतो. परंतु मी माणसांना पकडतों. त्यांना वेड लावतों. त्यांना नवीन नादास लावतों. तसें महात्माजी माणसें पकडण्यासाठी उभे आहेत. या ना त्या नात्यानें तें तुम्हांला राष्ट्रकार्याकडे खेंचून घेऊं पहात आहेत. “खादी नसेल पसंत तर गोसेवा उचला, नाही तर राष्ट्रभाषाप्रचार घ्या, ग्रामोद्योग घ्या, मधुसंवर्धनविद्या घ्या, हरिजनसेवा उचला, हिंदु-मुस्लीम प्रश्न घ्या, स्वच्छता करा. आरोग्य निर्मा, व्यायामशाळा काढा, कोठलें तरी कार्य घ्या” असें जणुं तो महापुरूष सांगत आहे. सारी कर्मक्षेत्रे दाखवीत आहे. या राष्ट्रोद्योगाच्या जाळ्यांत तुम्हांस पकडूं पहात आहे. परंतु तुमचा आमचा वेळ वायां जात आहे. जीवन हें कर्तव्यासाठी आहे. आयुष्य ही प्रभुची ठेव. सा-या आयुष्याचा झाडा घ्यावा लागेल. आपण आपल्या शारिरिक, मानसिक, बौद्धिक शक्तींचा व्यय कसा केला, कशांत केला, त्याचा हिशोब द्यावा लागेल. येईल तो देतां?