तिस-या अध्यायांत भगवंतांनी कामक्रोधांच्या बाबतीत सावध रहा असें सांगितले आहे. पुन्हां पाचव्या अध्यायांतहि तेंच सांगितले आहे. कामक्रोध जिंकून घेतल्याशिवाय कर्मयोग कसा साधावयाचा? हातून उत्कृष्ट कर्म कसें व्हायचें? विकर्म कसें ओततां येईल ? कर्म करून अकर्मी दशा कशी अनुभवितां येईल?
मन निर्मळ, प्रसन्न असेल तरच हातून उत्कृष्ट सेवा होईल. म्हणून सदैव प्रयत्न करावे, धडपडत असावें. धडपड हेंच मानवाचें भाग्य. ज्याची धडपड संपली तो मुक्त तरी किंवा पशु तरी. ज्याच्या जीवनांत धडपड आहे त्याला आशा आहे. आपल्यासमोर कर्मयोग्याचा दिव्य आदर्श आहे. त्या आदर्शाकडे पावलें टाकीत जावयाचे आहे. देवळाचें शिखर लांबून दिसतें. परंतु पाऊल हातावरच पडतें. त्याप्रमाणें एकदम ध्येयाला मिठी मारतां येणार नाही. धडपडत जावें लागेल.कालच्यापेक्षां आज चांगले होऊं, आजच्यापेक्षां उद्या चांगले होऊं असें करीत जाऊं. उत्तरोत्तर अधिक चांगले होतां येत नाही म्हणून रडूं. मीराबाईनें म्हटलें आहे :
“अंसुवन जल सिंच सिंच
प्रेम-बेल वोई”
डोळ्यांतील आंसवें ढाळून प्रेमाची वेल मी लावली आहे. हे धन्य अश्रू कोणाजवळ आहेत? जर्मन कवि गटे म्हणतो “जो कधी रडला नाहीं त्याला देव मिळणार नाही.” आपल्या अपूर्णतेची पदोपदीं जाणीव होऊन रडत, धडपडत पूर्णतेकडे जाणारे आपण यात्रेकरू आहोंत. केव्हांतरी तो शेवटचा दिवस येईल, की ज्या दिवशी संपूर्ण विकासाची भेट होईल. तुकाराममहाराज म्हणतात :
“याजसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दीस गोड व्हावा”
दगड फोडणारा घाव घालीत असतो. शेवटच्या घवाला छकलें होतात. परंतु पहिले घाव का निरूपयोगी होते? महात्माजींनी लिहिलें होतें “प्रयत्न म्हणजेच यश:सिद्धि.” प्रत्येक प्रयत्न, पाऊल प्रत्येक आपणांस उत्तरोत्तर पुढें नेतें.
आणि एक दिवस संपूर्ण ज्ञान होईल. सारे खळमळ धुऊन जातील. परंतु संपूर्ण ज्ञान या देहांत मिळणे कठिण. जनकादिकांना आपण जीवनमुक्त म्हणतों. त्याचा अर्थ इतकाच कीं ध्येयाच्या जास्तींत जास्त जवळ ते गेले होते. जसें भूमितींत आपण म्हणतों की “ही सु-रेषा समजा.” भूमितीत पदोपदी “समजा” हा शब्द असतो. कारण रेषा काढावयाची कशी? रेषेची व्याख्या काय? जिला लांबी आहे, परंतु रूंदी नाही ती रेषा. रूंदीशिवाय लांबी कशी काढायची? बर्फीची लांबी खा, रूंदी खाऊं नको असें म्हटलें तर बर्फी खाता येईल का? पण तरीहि रेषा काढतां येणार नाही. तसा संपूर्ण कर्मयोग, संपूर्ण संन्यास या देहांत मावूं शकणार नाही. किती झाले तरी हा मातीचा गोळा आत्म्याला चिकटलेला आहे. थोडी तरी अपूर्णता राहतेच. ती देहपातानंतर संपते. तुकाराम म्हणतात:
“उद्योगाची धांव बैसली आसनीं
पडलें नारायणीं मोटळें हें”
सारे उद्योग जसे गळून पडतात; सर्वत्र स्वत:चें परम स्वरूप दिसतें; आणि देहाचे हें मोटळें प्रभुचरणी पडतें. जीवन कृतार्थ होतें.