अध्याय १० वा
नववा अध्याय सर्वत्र प्रभुरूप पहा असें सांगतो.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति
तदहं भक्त्युपहृतं अश्रामि प्रयतात्मन: ।।
यत्करोषि यदश्रसि यज्जुहोषि ददासि यत्
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरूष्व मदर्पणम् ।।


हा जो नवव्या अध्यायाचा संदेश तो एकदम कृतींत कसा आणावयाचा? सर्व कर्में ईश्वरार्पणबुद्धीनें करावयास कसें शिकावयाचें? हजारोंशी आपल्या कर्मद्वारा आपला संबंध येतो. ज्यांच्याशी संबंध येतो तीं सारी भगवंतांची रूपें आहेत असें एकदम वाटेल का?

एकदम ही दृष्टि येणार नाही. मूल जसें हळुहळूं शिकत जातें तसें आपणांस शिकत गेलें पाहिजे. भगवान् या दहाव्या अध्यायांत एकाद्या कुशल शिक्षकाप्रमाणें जणुं धडे देत आहेत. लहान मुलाला आपण प्रथम सोपी अक्षरें काढून देतों. सोपी व ठसठशित अशी अक्षरें त्याच्या पाटीवर आपण काढून देतों. मोठा ग काढतों व त्याला सांगतों की हा गवताचा ग. मोठा म काढून हा मगराचा म असें आपण शिकवितों. प्रथम ग म भ न अशी सोपी अक्षरें शिकवितों. मग स ष वगैरे जरा कठिण अक्षरें. शेवटी जोडाक्षरें. एवढेच नव्हे, तर प्रथम जो मोठा ग होता तोच लहानहि असतो हें शिकवावें लागतें. ग मोठा ठसठशित असला काय, किंवा बारीक असला काय, त्यांतील अर्थ एकचही गोष्ट मुलाला समजावून द्यावी लागते. नाहीतर त्या जावयीबुवांच्या गोष्टीतला प्रकार व्हायचा. जावयीबोवा पत्रांतील बारीक श्री पाहून रडूं लागले ! ते म्हणाले “माझ्या पाटीवर केवढी मोठी श्री असे; ही पत्रातील श्री रोड का झाली ?” ती  बारीक श्री व ती मोठी श्री यांत कांही फरक नाही. एकच अर्थ दोहोंत भरला आहे. लहान मूल अशा रीतीनें शिकत जातें. प्रथम सोपी व ठसठशित अक्षरें. मग जरा कठिण अक्षरें. मग तीच बारीक अक्षरें. तसेंच ती प्रगति होते. तो वाचूं लागतो. काव्याचा आनंद चाखूं लागतो.

या सृष्टीचा विशाल ग्रंथ या रीतीनेंच वाचायला आपण शिकलें पाहिजे. सृष्टीत सर्वत्र प्रभु भरलेला आहे. त्याचें रूप वाचायला शिकायचें आहे. परंतु एकदम बारीक अक्षरे वाचतां येणार नाहीत. जोडाक्षरें एकदम उलगडणार नाहीत. म्हणून भगवान् सृष्टीतील ठसठशित अक्षरांचा धडा अर्जुनाला देतात. ते म्हणतात “अर्जुना, तुला एकदम सर्वत्र परमेश्वर नाही पाहता येणार. परंतु संतांच्या ठिकाणी तरी पाहतां येईल ना? जे संत रात्रंदिवस परार्थ झिजत असतात, जे निंदास्तुतीनें विचलित होत नाहीत, मरणाचें ज्यांना भय नाही, अशा संतांच्या ठिकाणी तुला अनंताची मूर्ति नाही का पाहतां येणार? संत हा सोपा शब्द आहे ठसठशित डोळ्यांत भरेल असा हा शब्द आहे. हा शब्द घे. वाच, घोक. आणि तुझी जन्मदात्री माता ? ‘मातृदेवो भव’ अशी श्रुतीची आज्ञा आहे. परमेश्वराच्या परम कारुण्याची कल्पना आईच्या वात्सल्यावरूनच आपणांस करतां येईल. त्या मातेला कळत नाही, तिचें आतडें त्या मुलासाठी इतकें कांय तुटतें तें ! कोणी लावली इतकी माया ? मुलावर किती तिचें प्रेम 1 त्याला जरा दुखलें खुपलें की ती कावरीबावरी होते. पायांचा पाळणा करते, डोळ्यांचा दिवा करते. अशी ही प्रेममयी स्नेहमयी माता. फ्रेंच भाषेंत एक गोष्ट आहे. एक आई होती. तिचा मुलगा व्यभिचारी निघाला. तो एका वेश्याकडे जावयाचा. सारें घर त्यानें तिच्या घरांत भरलें. तरी त्याच्या प्रेमाची सत्यता तिला पटेना. तो म्हणाला “आतां मी काय करूं म्हणजे माझें प्रेम तुला पटेल ?” ती म्हणाली “तुमच्या आईचें काळीज कापून तें मला आणून द्या !” त्यानें आईचें काळीज कापून घेतलें. एका ताटांत घालून लगबगीनें तें घेऊन तो निघाला. परंतु ठेच लागून तो पडला. हातांतील ताट पडलें. परंतु त्या काळजांतून आवाज आला “बाळ, तुला नाही ना रे कोठें लागलें ?” अशी ही निरपेक्ष प्रेम करणारी माता ! तिच्या ठिकाणीं देव पहायला शीक. आणि लहान मुलें ? निष्पाप व सरळ. प्रभुसंगीताच्या त्या लकेरी ! त्या लहान मुलांचे ठायीं देव पहा. लहान मुलांना किती लौकर देव मिळाला. ध्रुव, प्रल्हाद. चिलया, सनक, सनंदन, शु्क्राचार्य, सारी लहान मुलें. परंतु त्यांनी क्षणांत परमेश्वर मिळविला. मुलांच्या ठायी देव पहायला शीक. आणि मानवेतर सृष्टीतीलहि ठळक अक्षरें पहा. तो पहा भव्य हिमालय कसा उभा आहे. जणुं ज्ञानवैराग्याची शुभ्र मूर्ति ! इवलीहि चंचलता तेथें नाही. मूर्तिमंत स्थिर निष्ठा जणुं ती उभी आहे. त्या हिमालयाचे ठिकाणी परमेश्वर पहा. आणि ती गंगा ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel