जगांतील दु:ख कोणत्या मार्गानें दूर होईल या विचारांतून जिज्ञासा उत्पन्न होते. जिज्ञासा आपणांस अनेक मार्ग दाखविते. या मार्गानें दु:ख दूर होईल का, या मार्गानें होईल का? असा आपण विचार करीत जातों. जे अनेक मार्ग दिसतात, त्यांतील हितकर मार्ग कोणता? खरा कल्याणप्रद मार्ग कोणता? दिसलेल्या अनेक मार्गातील खरा मार्ग कोणता, त्याचा विचार करणारा तो अर्थार्थी-भक्त. अर्थार्थी-भक्त म्हणजे पैसे मागणारा भक्त नव्हे. अर्थार्थी म्हणजे कशांत अर्थ आहे तें पाहणारा. आज जगांत अनेक वाद आहेत. गांधीवाद आहे, समाजवाद आहे, साम्राज्यावाद आहे, भांडवलशाही आहे, फॅसिझम आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग कोणता? कोणत्या मार्गानें गेलें तर सर्वांचें संसार सुखाचे होतील? सर्वांच्या जीवनाचा नीट विकास होईल? सर्वांना विश्रांति मिळेल, ज्ञान मिळेल, कलानंद चाखतां येईल? असा विचार मनांत येऊन आपण मार्गसंशोधन करतों. कोणता तरी एक मार्ग आपण पत्करतों. या मार्गानें जाऊं तर सर्वांचे कल्याण होईल असें वाटतें. मग त्या मार्गाला आपण वरतों. तें जें निश्चित ज्ञान होतें, त्या ज्ञानाला आपण वरतों. म्हणजेच ज्ञानीभक्त आपण होतों. ज्ञानी म्हणजे जें ज्ञान झालें तें पदोपदी जीवनांत आणूं पाहणारा. बुद्धांना जें ज्ञान झालें, जगाच्या कल्याणाचा म्हणून जो रस्ता त्यांना वाटला, त्याचा मरेपर्यंत ते उपदेश करीत राहिले. पुन्हां पुन्हां जन्म घेईन व हें ज्ञान जगाला देत राहीन असें ते म्हणाले. महात्माजींना गरिबांचें दु:ख कसें परिहरूं अशी चिंता होती. त्या चिंतेने चिंतन करीत असतां त्यांना अनेक मार्ग दिसले. परंतु शेवटी चरखा हाच त्यांना परमेश्वर वाटला. त्या चरख्याला त्यांनी हृदयाशी धरलें. माझ्या ईश्वराचें नांव चरखा असें ते म्हणालें. रात्रंदिवस चरख्याचें ध्यान त्यांना लागलें. जें ज्ञान झालें, जो विचार सुचला, सर्वांच्या कल्याणाचा म्हणून जो मार्ग निश्चितपणें वाटला, त्या दिशेंने जीवन सारखें नेणें म्हणजे ज्ञानीभक्त होणें होय. रात्रंदिवस मग त्या गोष्टीचा ध्यास, त्या गोष्टीचा जप. त्या गोष्टीचा प्रचार, त्या गोष्टीचा जयजयकार. हा जन्म त्या ध्येयासाठी; पुढचा जन्म आला तरी तदर्थच. अशा रीतींने ध्येयाशीं, मिळालेल्या ज्ञानाशी लग्न लागलेला तो ज्ञानीभक्त होय.

भगवान् म्हणतात “अर्जुना, हा ज्ञानीभक्त मला फार आवडतो.”

ज्ञानेश्वरींत एके ठिकाणी प्रभु म्हणतो, “अर्जुना, माझ्या भक्ताला नीट मिठी मारतां यावी म्हणून निर्गुण, निराकार असूनहि मी दोन डोळ्यांचा सगुण साकार बनलों. त्या भक्ताची पूजा करण्यासाठी हातांत कमळपुष्प घेतलें आहे.”

“दोंवरी दोनी । आलों भुजा घेवोनी
आलिंगावया लागोनि । तयाचा देह ।।

तया पहावयाचे डोहाळे । म्हणून अचक्षूसीं मज डोळे
हातींचेनि लीलाकमळें । तयासी पुजूं” ।।


किती गोड ओंव्या. जगाच्या मंगलासाठी अशी डोळस व निर्मळ भक्ति बरोबर घेऊन सदैव झुंजणारा जो महात्मा तो धन्य होय.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गीता हृदय