आपण मंगलमूर्तीची प्रतिमा आणतों. तिचा उत्सव करतों. त्या प्रतिमेची पूजा करतों. परंतु शेवटी ती मूर्ति बुडवावयाची असते सगुणांतून निर्गुणाकडे जायचें असतें. ‘बुद्ध शरणं गच्छामि’ या पायरीवरून आपण ‘संघं शरणं गच्छामि’ या पायरीवर येतो. बुद्ध निर्वाणाला गेले. पुढे काय? पुढें बुद्धांच्या मताचे जे जे ते एकत्र येतात.स्वत:चा संघ करतात. जणुं सामुदायिक मूर्ति बनवितात. या संघाच्या आधारानें राहूं पाहतात. परंतु संघ तरी कोठें टिकाऊ आहेत ? सा-या संस्था व सारे संघ नाशिवंतच आहेत. आज आहेत, उद्यां नाहीत, हा प्रकार. म्हणून शेवटी ‘धर्मं शरणं गच्छामि’ या पायरीवर येणें प्राप्त असतें. भगवान् बुद्धांची जी शिकवण ती आपल्या हृदयांत आपण उभी करतों. वैचारिक मूर्ति आपण निर्माण करतों. ध्येयाची मूर्ति बनवितों आणि त्या ध्येयाची उपासना करणारे आपण होतों. मूर्ति जातात परंतु ध्येय अमर आहे. व्यक्ती जातात, तत्त्व टिकतें. महात्माजी कराची कॉंग्रेसच्या वेळेस म्हणाले “गांधी जाईल. ही माझी मूठभर हाडें सहज चिरडतां येतील. परंतु ज्या तत्त्वांची मी नम्रपणें उपासना करीत आहें ती तत्त्वें मरणार नाहीत.”
“तत्त्वाचा बंदा जीव
व्यक्तीला कोण विचारी”
अशा रीतीनें जरी आपण प्रथम व्यक्तिपूजक असलों तरी शेवटी ध्येयपूजक झालें पाहिजे. त्या ध्येय-भगवानालाच
“जेथें जातों तेथे तूं माझा सांगाती”
असें आपण सदैव म्हटलें पाहिजे.
सगुणांतून निर्गुणाकडे न जाऊं तर जीवन दुबळे होईल. ज्या व्यक्तीभोवतीं आपण जमलों ती व्यक्ति अंतर्धान पावतांच जर त्या व्यक्तिची ध्येयमूर्ति आपण आपल्या जवळ निर्मिली नसेल तर आपण पंगू होऊं. सगुण व निर्गुण दोहोंनी वाढ आहे. लक्ष्मण हा सगुण भक्त होता. रामचंद्र वनास जाण्यासाठी निघाले. तेव्हां लक्ष्मण म्हणाला “रामा, तुझ्याशिवाय एक क्षणभरहि मी जघूं शकणार नाही. पाण्याशिवाय मासा मरेल, तसा तुझ्याविणें मी मरेन.” परंत अशा या सगुणोपासक लक्ष्मणाला शेवटी रामाचा वियोग सहन करावा लागला आहे. नारद व रामचंद्र कांही गुप्त बोलत असतां तो तेथें जातो आणि त्याचें शासन म्हणून रामापासून त्याला दूर जावें लागतें. निर्गुणाचा अनुभव घेणें त्याला प्राप्त झालें. भरत हा जणुं निर्गुणोपासक. प्रत्यक्ष रामचंद्र जरी जवळ नसले तरी त्यांचे ध्यान करीत तो नंदीग्रामी बारा वर्षें राहिला. परंतु पंचवटींतून रामांना भेटून परत जातांना त्यांच्या पादुका तरी तो घेऊन गेला. तेवढा आधार त्याला हवा होता. सगुणाचा तेवढा ओलावा त्याला आवश्यक वाटला.