अशा रीतीनें आपण सर्वत्र परमेश्वर पाहूम या. परमेश्वराला शोधावयासाठी दूर जायला नको. तो आपल्या आसपास सर्वत्र आहे. आपण काशीला, रामेश्वराला जातों. परंतु देव का तेथेंच आहे? मध्यें सारे का स्मशान आहे? एकनाथांचा मुलगा काशीची कावड घेऊन रामेश्वराला ती ओतण्यासाठी जात होता. परंतु नाथांनी त्या गंगेनें तृर्षार्त गर्दभाची तृषा शमविली. मुलगा रागावला. परंतु रामेश्वर त्याच्या स्वप्नांत आले व म्हणाले “अरे, गाढवाला पाजलेली गंगा मला मिळाली हो.”
टॉलस्टॉयनें अशीच एक सुंदर गोष्ट लिहिली आहे. दोन मित्र यात्रेसाठी निघतात. परंतु एक मित्र वाटेंतील दुष्काळी गांवांत जातो. तेथल्या दुष्काळ-पीडितांस जगवितो. पैसे संपल्यामुळें यात्रेच्या स्थानी न जातां तो तसाच परत येतो. परंतु यात्रेच्या ठिकाणी गेलेल्या त्या दुस-या मित्राला स्वत:चा मित्र देवाजवळ जाऊन बसला.
आपण जेथें पाहूं तेथें परमेश्वरच आहे. परंतु आपण आंधळे आहोंत. भगवान् मोठ्या खेदानें म्हणतात:
“अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्”
आपण झाडामाडांत देव पाहतों. दगडाधोंड्यांत देव पाहतों. भुताप्रेतांत पाहतों. परंतु मानवांतील देव आपणांस दिसत नाही ! आपणांस चार तोंडांचा, आठ हातांचा असा देव असा देव पाहिजे असतो. मनुष्याहून कांहीतरी निराळा असा देव आपणांस हवा असतो. मनुष्याच्या रूपानें आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणांस दिसत नाहीं. या मानवाजवळ आपण भांडतों, त्याला गुलाम करतों, त्याची कत्तल करतों आणि देवाची पूजा करूं पाहतों ! भगवंतांना याचे आश्चर्य वाटतें. अरे, मनुष्यांतील देव आधी पहा. हा बोलता चालता देव आहे. याचें स्वरूप बघ. याला काय हवें नको तें पहा. दगडाच्या देवाला काय काय आवडतें हेंहि आपण ठरवून टाकलें आहे. गणपतीला मोदक आवजतो. विठोबाला लोणी आवडतें. खंडोबाला खोबरें हवें. परंतु मानवाला काय हवें याची कधी विवंचना आपण करतों का? आपल्या सभोंवती हा दोन हातांचा मनुष्यरूपी देव उभा आहे.त्याच्या पोटांत अन्न नाही. त्याच्या अंगावर वस्त्र नाही. त्याच्या पूजेला येता का धांवून?
परमेश्वराला प्रदक्षिणा घालाव्या असें म्हणतात एक प्रदक्षिणा घालावयाची व देवाचें रूप न्याहाळून पहावयाचें. अशानें देवाचें रूप अंतरी ठसतें. परंतु हा देव कोठें आहे? लाखों खेड्यापाड्यातून हा देव उभा आहे. या खेंड्यांना प्रदक्षिणा घाला. म्हणजे तेथील दरिद्रनारायणाचें स्वरूप तुमच्या ध्यानांत येईल त्याची काय दशा आहे तें तुम्हांला कळेल. त्याच्या सेवेसाठी मग तुम्ही जाल.