अध्याय ६ वा
जीवनांत कर्मयोग कसा आणावा, कोणते उपाय करावेंत तें या सहाव्या अध्यायांत सांगितले आहे. जीवन यशस्वी करावयास संयमाची अत्यन्त आवश्यकता आहे. मनुष्य व पशु यांच्यात जर कोणता फरक असेल, तर मनुष्य आपल्या वासना-विकारांर अंकुश चालवूं शकतो हा होय. संयमहीन मनुष्य म्हणजे वृकव्याघ्रच जणुं असतो. संयमाशिवाय जीवनाला किंमत नाही. कार्लाईल हा प्रसिद्ध पाश्चिमात्य तत्वज्ञानी म्हणतो “त्या घोड्याला लोक किंमत देतात.

जो घोडा लगाम घालूं देणार नाही, त्याला कोण जवळ करणार? घोड्याला चामड्याचा लगाम असतो; माणसाला स्वत:च विवेकाचा लगाम घालून घ्यावा, तरच त्याची किंमत वाढेल.”
जें समाजसेवेचें कर्म आपण हाती घेऊं तें नीट व्हावें असें खरोखर वाटत असेल. तर आपण आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. भगवान शंकर म्हणजे योग्यांचे मुकुटमण. परंतु ते योगियांचे राणे कसे झाले? त्यांनी ज्ञानाचा डोळा पेटवून ठेवला आहे. सर्व इंद्रियांवर त्या ज्ञानचक्षूची दृष्टी आहे. वेडीवांकडी जातील तर त्यांचे भस्म होईल. आपण हा विवेकवैराग्याचा तृतीय नेत्र उघडा ठेवला पाहिजे.

तुमच्या ज्या नैसर्गिक क्षुधा आहेत त्या अजिबात मारा असें धर्मांचे सांगणे माही. परंचु त्यांना मर्यादा घाला असें धर्म सांगतो. झोपूं नका असें धर्म सांगत नाही. परंतु लौकर झोंपा, लौकर उठा असें तो सांगतो. खाऊं नका असें नाही धर्म सांगत बेतानें व शरिराला हितावह तेंच खा असें धर्म सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात :

“विधीनें सेवन धर्मांचे पालन”

विषयांचें संयमपूर्वक सेवन करा. असें केल्याने धर्मपालन केल्यासारखें आहे. सर्वत्र मर्यादा पाळा. प्रभु रामचंद्रांना मर्यादा-पुरुषोत्तम असें म्हणतात. ज्याला पुरुषोत्तम व्हावयाचें आहे, नराचे नारायण व्हावयाचें आहे, त्यानें मर्यादा घालून घेतली पाहिजे.

ज्ञानेश्वरीत या अध्यायांत फार गोड ओंव्या आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात “अरे, योग योग म्ङमजे काय? योग म्हणजे मोजकें बोलणें, मोजकें चालणें, मोजकी झोंप, मोजका आहार, इंद्रियांना असें प्रमाणांत दे. म्ङणजे त्यांनाहि समाधान मिळून जीवनात सुखशांति वाढतील.”

आपण एकादी वस्तु आवडली व तीच खात बसतों तर आजारी पडूं. एकादे वेळेस जागतच बसलों तर प्रकृति नीट राहणार नाही. आपल्या स्वधर्मांत अडथळा येऊं नये म्हणून शरीर नीट हवें. शरीर नीट राहिलें म्हणजे मनहि प्रसन्न राहिल. कार्लाईल हा पास्चिमात्य पंडित म्हणतो “आपलें निम्में तत्वज्ञान पोटाच्या स्थितीवर अवलंबून असतें” ज्याला सारखीच बद्धकोष्ठता, ज्याचें डोकें सारखें दुखत आहे, त्याच्या हातून स्वधर्म कसा पार पडणार? मॅझिनी हा थोर इटॅलियन देशभक्त एकदां म्हणाला “माझ्या देशाला माझी जरूरी असतां मी आजारी कसा पडूं शकेन?” हा देह सेवेसाठी आहे. तो निरोगी राखला पाहिजे. महात्माजी पांच पदार्थापेक्षां जास्त खात नाहीत ज्याने रसनेवर संयम मिळविला त्याला शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळाल्याशिवाय राहणार नाही.

संयमाने जीवनांत आनंद येतो, संगीत येतें. रविद्रनाथ म्हणतात “संयमानें विकास होतो. झाडाला मुळांनी जमिनीशी बांधून ठेवलें आहे, म्हणूनच झाड उंच जातें, फुलाफळांनी शोभते. झाड जर म्हणेल की ही मुळांची बंधनें कशाला? मला वर उडूं दे; तर तें झाड तरारेल का, भरारेल का? तें सुकेल. तें बांधलेले आहे म्हणूनच वाढतें. नदीला दोहोबाजूंनी तीराचें बंधन आहे म्हणूनच तिला गति आहे खोली आहे. सतारीला तारा बांधलेल्या आहेत म्हणूनच त्या तारा दिव्य संगीत देतात.” असा हा संयमाचा महिमा आहे. संयमाशिवाय सुसंस्कृतता नाही, विकास नाही.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel