“काय, तुम्ही शेतकरी आहांत ? कोणते पीक घेतां ?”

“माझें हृदय हें माझे शेत. तेथे विवेकाचा नांगर जोडतों. सारें वासना-विकारांचे रानगवत काढतों. प्रेमाचें, सत्य-अहिसेंचें अपरंपार पीक घेतो.”

अशी ही देवाघरची शेती आपणांस करावयाची आहे. देहाच्या या साधनानें हे सदगुण अंगी आणावयाचे आहेत. तो प्रसिद्ध तत्त्वज्ञानी कार्लाईल एके ठिकाणी म्हणतो “माणसें ही गिधाडासारखी आहेत. जरा कांही करतांच त्यांना फळ हवें असतें. मोबदला हवा असतो. परंतु ईश्वरानें हा देह आधीच दिला आहे. बुद्धि दिला आहे. हृदय दिले आहे. या ज्या अमोल देणग्या आधीच मिळाल्या आहेत, त्यांबद्दल कृतज्ञ राहून आपण सदैव सेवा केली पाहिजे. कांटा दिसला दूर करावा. दगड दिसला बाजूला फेंकावा. जेथे ओसाद उजाड असेल तेथें हिरवें हिरवें करावें. प्रभुनें जे आधीत दिले आहे त्याचे उतराई म्हणून आपण सत्कर्में करीत राहणें हेच आपणांस शोभतें.”

परंतु हे सदगुण एकाएकी येतील असें नाही. एकेक गुण अंगी यावा म्हणून बुद्धदेवांना शेंकडों जन्म घेतले. आपल्या अंत:करणांत प्रभूचा सूर असतो. “बाबा रे हें कर, हें चांगले आहे. ते वाईट आहे, तें नकों करूं.” असें कोणी तरी अंतर्यामी आंतून हळूंच सांगत असतो. परंतु ती मंजुळ वाणी आपणांस जणुं ऐकु येत नाही तो अंतर्यामी लादणारा नसतो. तो मारून मुटकून करायला लावणारा नाही. तो हळूच सांगेल. ऐकलेंत तर बरें; नाही तर आशेनें वाट पहात राहील.

परमेश्वरासारखा आशावान् कोण आहे हजारों वर्षें मानवाला जन्मून झाली. तरी अद्याप तो माकडासारखा वागत आहे ! वृकव्याघ्राप्रमाणें रक्तपिपासु आहे. आईबापांचा एकादा मुलगा जरा बिघडला तरी त्यांना दु:ख होतें. मग ज्या प्रभुची कोट्यावधि लेकरें आज हजारों वर्षें बिघडत आहेत त्या प्रभुनें किती निराश व्हावें ? बर्नार्ड शॉ या विख्यात इंग्रज नाटककारानें एके ठिकाणी लिहिलें आहे “मानवाला निर्माण करण्याचा आपला प्रयोग फसला असें समजून ही सारी मानवजात प्रभु एके दिवशीं पुसून टाकील !”

आपणांस निराशेनें असें वाटलें तरी प्रभुला तसें वाटत नाही. त्याची अमर आशा आहे. त्याचें प्रेम कमी नाही झालें. त्याचे तारे, त्याचे वारे, त्याचे मेघ, त्याची फुलें-फळें, सारें आपणांसाठी सदैव उभें आहे.

मनुष्याचें प्रेम गुलाम करतें. आईबाप मुलाला प्रेमानें वाढवतात. परंतु त्यांच्या मताप्रमाणें मुलगा न वागला तर त्यांना वाईट वाटतें. तुला एवढ्यासाठी वाढवलें का” असें ती विचारतात. परमेश्वर कधी विचारीत नाही. तो अनंत हस्तें देत आहे. एक दिवस हा मावनप्राणी माझ्याकडे येईल अशी त्याला अनंत आशा आहे.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel