“पुंडलिका, माझ्या विठोबाला तूं का रे युगानयुगें उभें करून ठेवलेंस?” पुंडलिक आईबापांचे पाय चेपीत होता. त्या सेवेनें प्रभु भेटायला आले. पुंडलिकानें एक वीट फेंकली व रहा उभा असें सांगितलें. त्याला माहीत होतें कीं ज्या माझ्या सेवाकर्मानें पांडुरंग धांवून आला, तो पांडुरंग जोपर्यंत माझ्या हातांत ही सेवा आहे तोंपर्यंत जाईल कसा? माझ्या सेवेंतच त्या प्रभुला कायमचें बांधून ठेवण्याचें सामर्थ्य आहे.
म्हणून साधनेंतच रहा. कर्मांतच हृदय ओता. तो मोक्ष समोर येऊन उभा राहील.
आपण आज फार हांवरे झालों आहोंत. जरा कांही केलें की मिळालें का फळ बघतों. लहान मूल बी रूजत घालून लगेच उकरून अंकुर आला की नाही पाहातें. तसें आपलें आहे. जरा तुरूंगात जातांच मिळालें का स्वराज्य असें पाहतों. परंतु स्वातंत्र्याच्या साधनेंत इतके रमा की तें स्वातंत्र्य एक दिवस समोर उभें राहील. रामकृष्ण परमहंस म्हणत “कमळाची कळी चिखलांत पाय रोंवून उन्हांत, वा-यांत तपश्चर्या करीत असते. एक दिवस ती कळी फुलते. भुंगे येऊन कमळाला म्हणतात “कमळा, फुललास रे तूं !”
अशा रीतीनें जें कांही हाती घ्याल त्यांत सर्व जिव्हाळा ओता. त्यामुळें फळ मिळेलच. परंतु तुम्हांला मोकळेपणा वाटेल. त्या कर्माचा बोजा वाटणार नाही. तुम्ही मुक्तदशा अनुभवाल.
“तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया”
जा, संतांकडे जा. ते कसे वागतात तें पहा. जा महात्माजींजवळ. जरा बस. त्यांची अखंड सेवावृत्ति, त्यांची नम्रता, त्यांचा आनंद, त्यांची शांति, त्यांचे तें मुक्त हास्य, हें सारें त्यांच्याजवळ जा व समजून घे.
अशा थोरांजवळ राहिल्यानें आपल्या अनेक आशंका फिटतात. “गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यस्तु छिन्नसंशय:” असें होतें. म्हणून थोरामोठ्यांकडे मधुनमधुन जावें. सत्संगति जोडावी. भाराभर ग्रंथ वाचूनल खरें ज्ञान होणार नाही. खरें ज्ञान शेवटी जीवनांतून येतें. ज्याने आपल्या जीवनाचा पवित्र दीप पेटवून ठेवला आहे, त्याच्याजवळ जाऊनच आपणांस आपल्या जीवनांत प्रकाश आणतां येईल.