सगुणेच्या जिवात जीव आला. जशी स्वस्थ झोप लागावी तसे विश्रामचे घोरणे चालले होते. सायंकाळ होत आली. सगुणेने पाण्याचा थेंबही तोंडात घातला नव्हता. पक्षी घरट्यात परत येऊ लागले. गाई रानातून गोठ्यात येऊ लागल्या. विश्रामचे प्राणही परत येऊ लागले. तो पाहा, विश्रामने हात हलविला. ते पाहा, डोळे उघडले. विश्रामने सगुणेनेकडे पाहिले. सगुणा मामाजींना म्हणाली, “मामाजी, आली हो, शुद्ध आली- डोळे उघडले!”
म्हातारा विश्रामजवळ आला. विश्रामच्या तोंडावरून त्याने आपला हात फिरवला. विश्राम बापाला म्हणाला, “बाबा, रागवू नका माझ्यावर.”
म्हातारा म्हणाला, “नाही हो बाळ! तुझ्यावर देवाची कृपा आहे. माझा राग नाहीसा झाला, पोरी, ऊठ आता. घरात पाणी-उदक आण. चूल पेटव, भाकर कर.” म्हाता-याने विश्रामचे डोके आपल्या मांडीवर घेतले. सगुणा उठून गेली.
जेवण झाल्यावर विश्रामला बरे वाटले. तो सगुणेला म्हणाला, “स्वप्नात मला काय दिसले, सांगू ? तू आपले प्राण अर्पण करीत होतीस म्हणून माझे प्राण परत मिळाले. तुझ्या पुण्याईने मी वाचलो!”
सगुणा म्हणाली, “माझी कसची पुण्याई? माझ्यामुळे तर हे सारे झाले. मी माझे कपाळ दुखते असे सांगितले नसते, तर हा प्रसंग येताच ना. मी आता फिरून कधी असे सांगणार नाही.”
विश्राम म्हणाला, “मग मला पुनः जिवंत कशाला केलेस? सुखदुखःच्या गोष्टी बोलणार नसशील, तर मग जगून तरी काय करावयाचे?”
सगुणा म्हणाला, “असे काय भलभलते बोलावे? सुखदुःख सांगत जाईन. परंतु कोणा श्रीमंताकडचे दूध नको, काही नको. उपाशी राहू, आजारी पडू, परंतु ते नको!”
विश्राम म्हणाला, “पुन्हा असा मोह मी होऊ देणार नाही.”
तिकडे दिनकरराव नीट शुद्धीवर आले. त्या रात्री ते घरी विचार करीत अंथरुणावर पडले होते. विश्रामच्या त्यागाचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणांम झाला. ते मनात म्हणाले, “मी केवढा पातकी! किती अप्पलपोट्या! मीच चोर आहे. मी काय श्रम करतो, कोणते काम करतो? गादीवर लोळतो, पानसुपारी खातो. कोर्टकचेरीत जातो, खोटे दस्तऐवज करतो. मला हे सुख भोगण्याचा काय अधिकार आहे? मी आयतोबा आहे. ही गुरे का माझी? ही विश्रामची आहेत. ह्या जमिनी का माझ्या? ह्या कसणा-यांच्या न् खपणा-यांच्या आहेत. विश्रामला मी चोर म्हटले! अरेरे! खरे चोर-महाचोर आम्ही! परंतु चोरांच्या उलट्या बोंबा तसे चालले आहे-”असे शेकडो विचार त्यांच्या थैमान घालीत होते.