गाडीवान म्हणाला, “कोण बाळासाहेब ?”
गोविंदभटजी म्हणाले, “येथले कलेक्टर आहेत ना, ते.”
गाडीवान हसून म्हणाला, “कलेक्टरकडे नेऊ ?”
राधाबाई म्हणाली, “होय, तो आमचा मुलगा हो !”
गाडीवानाने गाडी हाकली. बाळासाहेबांच्या बंगल्याजवळ गाडी उभी राहिली.
“मी चौकशी करून येतो हं. उभी कर रे गाडी. तू गाडीतच थांब गं.” असे म्हणून गोविंदभटजी बंगल्याच्या आवारात शिरले. गच्चीवर बाळासाहेब व मालती आरामखुर्च्यात बसली होती. मालतीच्या मांडीवर मुलगा होता. “बघा कसा हसतो ! तुमच्याजवळ काही येत नाही.” “माझ्याजवळ कशाला येईल ! दिवसभर तू घरी असतेस. आम्हाला थोडेच रिकामपण आहे खेळवायला !” बाळासाहेब म्हणाले. “आहे माहिती किती काम असते ते ! नुसत्या सह्या ठोकायच्या! मोठे अधिकारी म्हणजे सारे सह्याजीराव ! आम्हालाच घरी किती काम असते !” मालती विनोदाने बोलली.
“येथेच राहतो ना हो बाळ, आमचा बाळ ?” गोविंदभटजींनी खालून विचारले. “अरे ए भटा, कोठे आत शिरलास ? नीघ येथून. साहेब वर आहेत, लाज नाही वाटत ?” शिपाई अंगावर भुंकू लागला. बांधलेला कुत्राही भुंकू लागला. “येथेच असेल हो आमचा बाळ, बघा जरा.” गोविंदभटजींनी पुनः विचारले. बाळासाहेबांनी वरून पाहिले. पितापुत्रांची दृष्टादृष्ट झाली. परंतु बाळासाहेब काही बोलले नाहीत. शिपाई हात धरून गोविंदभटजींस ढकलू लागला. बाळासाहेब प्रिय पत्नीशी व आवडत्या मुलाशी बोलण्यात दंग झाले !
म्हातारा ओशाळला, विरघळला. तो पुनः गाडीत जाऊन बसला. “पुनः आम्हाला स्टेशनवर घेऊन चल रे !” त्यांनी गाडीवाल्याला सांगितले. “काय झाले ? आपला बाळ नाही का येथे ?” राधाबाईंनी विचारले. “अगं, तुझा बाळ मेला ! येथे बाळासाहेब आणि त्याची मड्डम राहतात !” असे संतापाने, खेदाने गोविंदभट म्हणाले. “”असे काय बोलता वेडेवाकडे ! माझे बाळ सुखी राहो शताउक्षी होवो !” ती माउली बोलली.
गोविंदभटजी काही बोलेनात. त्यांचा चेहरा अगदी काळवंडला. मुखावर प्रेतकळा आली, स्टेशनवर उभयता उतरली. “या गावात मी पाणी पिणार नाही. आगगाडीत बसू, पुढच्या स्टेशनवर पाणी !” म्हातारा म्हणाला. नाशिकची तिकिटे काढून दोघे गाडीत बसली व निघाली.
दोन दिवसांची उपाशी होती ती. एका स्टेशनवर उतरून दोघे पाणी प्यायली. गोविंदभट काही बोलेनात. राधाबाईंना रडे आवरेना.
“कोण रे आले होते मघा खाली ? मोत्या भुंकत होता.” मालतीने शिपायाला विचारले. “कोणी भिकारी होता. दिला घालवून.” शिपाई नम्रपणे म्हणाला.