रडत रडत अमीन बाहेर पडला. शशीही आपले पाटीदप्तर घेऊन निघाला. त्याला शाळा म्हणजे स्मशानच वाटू लागले. “तू रे कोठे चाललास ? ओढा रे त्याला मागे. बस तेथे. का तुडवू ? चालला पाटीदप्तर घेऊन !” शशीवर मास्तर वाघासारखे गुरगुरले.
वर्गामध्ये शशी रडत बसला. अमीनच्या पाठोपाठ जावे असे त्याला कितीदा वाटले ! त्याचे वर्गात लक्ष नव्हते. मला शाळेत सोबत कोण ? माझ्यासाठी कोण रडेल ! मला कधी कधी कोण खाऊ आणून देईल ? ही इतर मुले मला खाऊन टाकतील, असे किती तरी विचार शशीच्या मनात येत होते व मध्येच त्याला हुंदका येत होता. शशीला अमीनच्या घरी जाण्याची बंदी होती. इतके दिवस शाळेत तरी अमीन भेटत होता; आता शाळेतही अमीनचे दर्शन त्याला मिळाले नसते.

अमीन रडत रडत घरी गेला. दादू कामाला जाण्याच्या तयारीत होता. अमीनने शाळेत जे झाले ते सारे सांगितले. थोर मनाचा दादू म्हणाला, “बेटा रोओ मत. मेरे साथ चलो. मेरा धंदा सीख लो; गाना सीखो. चलो.” दादूने अमीनला त्याच दिवशी नेले. अमीन बापाला मदत करू लागला. अमीनची कोंडवाड्याची शाळा सुटली, बापाच्या संगतीला तो स्वधर्मकर्माचे-पिढीजात धंद्याचे शिक्षण घेऊ लागला. स्वकर्माने ईश्वराची पुजा कशी करायची, हे प्रेमळ पितृदेवाजवळ तो शिकू लागला. दादूबरोबर तो पिंजरा शिके, कबिराचे दोहरे शिके, नविन दिव्य व भव्य शाळेत-जीवनशाळेत अमीनने प्रवेश केला.

एके दिवशी हरदयाळांच्या मनात आले, की शशीला कोठे तरी शिकायला पाठवावे; एरव्ही तो सुधारणार नाही. हरदयाळांची एक बहिण-शशीची आत्या-विलासपूरला राहात असे. त्या आत्याकडे शशीला ठेवावे असे ठरले. शशीची बांधाबांध सुरू झाली. शशीची रवानगी झाली.

विलासपूरला शशीला मुळीच करमत नसे. त्याला तेथे गाईची वासरे खेळायला मिळत नसत. तेथे नदी नव्हती, तेथे प्राणप्रिय अमीन नव्हता. ते शशीला देखताच नाचणारे व शीळ घालणारे   पिंज-यातील पाखरू नव्हते. तेथे पो पो करणा-या निर्जीव व प्रेमहीन मोटारी, फट्फट् करणा-या मोटारसायकली, फट्फट् वाजणा-या पिठाच्या गिरण्या-सारे निर्जीव व निष्प्रेम यांत्रिक जीवन होते.

त्याचे नाव शाळेत घालण्यात आले. शाळेत शशी बसे परंतु त्याचे मन तेथे नसे. तो कधी बोलत नसे. तो फिकट दिसू लागला. त्याची प्रकृती बिघडली. परंतु त्याच्याकडे लक्ष कोण देणार ?

शशीच्या आत्याला दोन मुले होती. एक शशीहून जरा मोठा त्याचे नाव रघुनाथ व शशीहून वयाने थोडा लहान, त्याचे नाव मिठाराम. रघू हा तुसडा होता. ख-याखोट्याचा त्याला विधिनिषेध नसे. मिठाराम मात्र नावाप्रमाणे गो़ड होता. रघू शशीजवळ काही तरी भांडण उकरून काढावयाचा, परंतु मिठाराम शशीची बाजू घ्यावयाचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel