“आपण कोकणात जाऊ. रजा घ्या. तेथे त्या भेटतील, प्रेमाने अन् वात्सल्याने भरलेले हात डोक्यावर ठेवतील, नातवांस घेतील, सुनेला क्षमा करतील. चला. खरेच चला, आपण त्यांना सर्वत्र शोधू.” मालती म्हणाली.

“नाही, आईला शोधावयाचे नाही. आपण पापी होतो म्हणून आई गेली. आपण पवित्र होऊ या म्हणजे ती परत येईल. आपल्या मदांधतेने ती गेली; आपल्या अहंकारशून्यतेने मी परत येईल. आपल्या प्रेमशून्यतेने आईला मुकलो. आपण प्रेमपूर्ण झाल्यावर ती परत मिळेल. आपण आजपासून प्रेमळ, निरंहकार होऊ या; आपण उभयता विनम्र होऊ या, पाश्चात्तापाने शुद्ध होऊ या. ज्या दिवशी हृदय खरेखुरे शुद्ध होईल त्या दिवशी माझी आई मला परत मिळेल, मालती भुंगा जवळच असतो. कमळ फुलले, मकरंदाने भरले की, आलाच भुंगा रुंजी घालीत. मग तो भुंगा त्या कमळाला शत आशीर्वाद देत गोड गोड गाणी म्हणतो. मालती, माझे हृदयकमल मला प्रेमाने न् कृतज्ञतेने भरू दे, की आई येईलच, हो येईलच-”

अंतःकरणातील दुःखाने बाळासाहेब जळू लागले. पुष्पगर्भात निखारे ओतल्याने ते जसे होईल तसे ते दिसू लागले. ते खिन्न व उदासीन दिसत.

“माझे हृदय शुद्ध होईल, प्रेमाने भरभरून येईल, त्या दिवशी माझी आई मला मिळेल, हो मिळेल,” हेच वाक्य ते पुनः पुन्हा उच्चारीत. ते कचेरीत गेले तरी तेथे किती प्रेमाने व निरभिमानतेने वागत! ते अलीकडे केवळ अगर्विता व मूर्तीमंत नम्रता झाले होते! कारकुनांना, पट्टेवाल्यांना आश्चर्य वाटे. एखादा दुष्ट खटला त्यांच्यासमोर आला तर ते म्हणावयाचेच, “का रे जगात असे वाईट वागता? हेवादावा कशाला? दोन दिवस जगावयाचे ते गुण्यागोविंदाने का नाही जगत?” बाळासाहेबांच्या त्या शब्दांचे सर्वांना आश्चर्य वाटे. त्यांनी सारी ऐट सोडली. ते पायीच सर्वत्र जात-येत, रस्त्यात भिकारी भेटला, आंधळा भेटला तर त्याला प्रेमाने काही देत.

बाळासाहेबांच्या जीवनात साधेपणा आला. त्यांनी खादीचे व्रत घेतले. सर्वत्र खादी दिसू लागली. मालतीलाही त्यांनी खादीधारी बनविले. ते क्लबात जात व म्हणत, “खादी वापरणे हा धर्म आहे. सरकारी अधिका-यांनी तर खादी आधी वापरली पाहिजे. गरिबांचे कल्याण हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे. व्हाइसरॉयांनीही ‘खादीला उत्तेजन दिले पाहिजे,’ असे लिहिले आहे. पंजाब सरकारने खादीचे महत्त्व रिपोर्टात मान्य केले आहे. खादीत राजद्रोह नाही. खादी न वापरल्याने मात्र प्रजाद्रोह-दरिद्रद्रोह होतो.” त्यांच्या या बोलण्याचे लोकांना आश्चर्य वाटे.

एके दिवशी घरात चरखाही आला! ते सूत कातणे शिकू लागले. एके दिवशी ते क्लबात म्हणाले, “येथे आपण चरखेही ठेवू या, सूत कातण्यातही मजा असते, संगीत असते. त्या सुताने आपण गरिबांशी जोडलो जातो.” काही लोक हसले, काहींनी संमती दर्शवली. सूत कातायला येऊ लागल्यावर ते क्लबात सूत कातीत बसत!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel