“थांबा. उद्याचा अभ्यास घ्या. शुद्धलेखन, दहा ओळी बालबोध व त्यांतील पाच ओळी मोडी करून आणा.” असे मास्तर सांगत होते. तोच एक मुलगा म्हणाला, “मास्तर, माझ्या पाटीत एवढे मावणार नाही.”
“अरे, मग मोठी पाटी का घेत नाहीस? शाळेत पोरे पाठवितात, पण त्यांच्याजवळ धड ना पाटी, ना पेन्सिल! का मास्तरावेच घेऊन द्यायची? पगार तर बारा पंधरा रुपये. त्यात खाणार काय? करणार काय? मोठी पाटी आण रे; नाही तर अक्षर जरा बारीक काढ.” मास्तरांनी सुचविले.
“अक्षर बारीक काढले तर तुम्हाला दिसत नाही. म्हणता की ब आणि व सारखेच काढलेस. त्या दिवशी मी ‘ध’वरचे बिंदुकले केले होते, तरी तुम्ही म्हणाला, की हा घच आहे आणि मला मारलेत.”
असा पूर्वेतिहास एकजण सांगू लागला.
“तर मग सात ओळीच आणा अन् मोडी नकोच. शिवाय खारीच्या धड्यातले शब्दार्थ शाईने लिहून आणा. आणि ते अवार्ड्डपाइसचे कोष्टक पुनः पाठ करून या हा अभ्यास. घ्या पाटीदप्तर राहा उभे, फिरवा तोंडे, जा एकामागून एक.”मास्तरांनी शाळा मोडली.
सुटली एकदाची शाळा. कोंडलेली पाखरे मोकळी झाली. ती कोंडलेली, गुदमरलेली हरणे उड्या मारीत जाऊ लागली.
“ती कोणाची रे गाय? कशी पण आहे!”
“अरे ती भिका गवळ्यायी आणि ती पलीकडची गोप्याची.”
“गोप्या, तुमची का रे ती?”
असे संवाद चालले होते. इतक्यात एकजण म्हणाला, “आज शश्याला कसा पण खाऊ मिळाला! आणि दगडाने लिहित होता!”
“हो मग, लिहीन जा. माझी पाटी आहे!” शशी रागावून म्हणाला.
“माझ्याच पाठीचे बाबा घरी धिरडे करतील!” कोणी तरी बोलले. इतर मुले शशीचे हुर्यो करू लागली. पित्याची क्रुर मुद्रा शशीच्या डोळ्यांसमोर दिसू लागली. लहान पेन्सिल, पाटीवर चिरा. बाबा मारतील. शशीला रडे येऊ लागले.
“शशी, नको रडू.” अमीन म्हणाला.