बाळ : हृदयातील खरे लिहावयास वेळ लागतो. वरपांगी भरभर लिहिता येते, परंतु हृदयातील बोल कागदावर उमटविताना शब्द अपुरे पडतात. ते लिहिणे फार कठीण जाते. ती प्रसववेदना असते.
मालती : तुमचे चार ओळींचे पत्रही मला पंधरा दिवस वाचावयास पुरेल !ते वाचणे पुरेसे का होईल ? त्या तुमच्या चार ओळी म्हणजे मला प्रेमाचे चार समुद्र वाटतील. तुम्ही वेडेच आहात. तुम्हाला वाटले, की भाराभार लिहून पाठवावे लागेल ! असे नसते हो प्रेम ! प्रेमाची भाषा त्रोटक असते, खरे प्रेम कोरेच पत्र पाठवील व ते कोरे पत्रही अनंत भावदर्शन करील. मला तुम्ही एक ओळ लिहीली तरी पुरे. परंतु ती नेहमी लिहा. तुम्ही तिकडे दोन वर्षे राहणार ! चोवीस महिने ! सातशेवीस दिवस !
बाळ : सेकंद व मिनिटे कर ना !
मालती : तुम्हाला सारी थट्टाच वाटते. एकेक पळ म्हणजे मला युगासमानच वाटेल.
बाळ : तुझा अभ्यास आहे, त्यात तुझे मन रमेल. अभ्यासात वेळ केव्हाच निघून जाईल.
मालती : पण मी कोकणात नाही हो कधी येणार !
बाळ : कोण म्हणतो तिकडे जायचे म्हणून ? कोकणात दगड नि धोंडे ! जिकडे तिकडे साप न् विंचू !
मालती : राजीपुरी भटजींचा कल्पनाच मनात घेऊन मी दचकते, मग प्रत्यक्ष पाहून मी मरूनच जाईन !
बाळ : पण मी तिकडे जाणारच नाही. वडिलांना पाच-दहा रुपये पाठवावे, झाले. राहतील तिकडे. तुला सासूच्या हाताखाली शेणपोतेरे करावयास काही मी पाठविणार नाही.
मालती : मग स्वतःच्या हाताखाली ठेवणार वाटते ?
बाळ : मी तुझ्या हाताखाली ! म्हणजे तर झाले ? राणीसरकारचे राज्य चांगले असे जुने लोक म्हणत असत.
मालती : किती गार वारा सुटला आहे ! परंतु उठावेसेच वाटत नाही.
बाळ : प्रेमाची ऊब जीवनात आहे ! थंडी बाधणार नाही, झोंबणार नाही.
मालती : चला आपण जाऊ.
बाळ : जपून चाल, नाही तर पडायचीस.
मालती : तुम्ही जसे पडणारच नाही !
बाळ : तुम्ही पाडायचे मनात आणाल, तर आमचा टिकाव लागणार नाही.
मालती : स्त्रिया म्हणजे पाडणा-या, नरकाच्या दाराकडे नेणा-या हेच तुम्हा पुरुषांच्या रक्तात भिनलेले असावयाचे ! कितीही शिकला तरी जुने संस्कार थोडेच जाणार ! अहंकार थोडाच गळणार ! स्वतः पडावयाचे आणि स्त्रियांवर लादावयाचे !
बाळ : आपण एकमेकांना पाडतो न् चढवतो. दोघेही समान दोषी ! निर्दोष कोण आहे? मालती, आपण बरोबरच चढू न् पडायचेच झाले तर बरोबरच पडू.
मालती : स्वर्गात वा नरकात, पण एकत्र राहू. मग दुःख कशाला जवळ येईल !