सीताआत्याच्या त्या पडवीत जरा येता? चला. आत जाऊ व पाहू. सीताआत्या तेथे स्वयंपाक वगैरे करते. सीताआत्याच्या अंगखांद्यावर दागिने दिसत नाहीत; एवढेच नव्हे, तर तिच्या स्वयंरपाकघरात भांडीसुद्धा दिसत नाहीत. ते पाहा मडके. त्या मडक्यात वरण वगैरे शिजविण्यात येते. तो एक परळ आहे. ते एक पातेले व एक लहानशी तपेली दिसत आहे, पूर्वी सीताआत्याच्या भरल्या घरात केवढाली घंगाळी, पिंपे, तपेली, हंडे, पातेली, पराती, बोगणी असत! परंतु कर्जापायी, कोर्ट-कचे-यांच्यापायी सारे गेले! नको हो हे कर्ज! नकोत ते कोर्ट-दरबार! !
सीताआत्या आता कायमची दमेकरी झाली होती. थंडीवा-यात काम करून तिला कायमची दम्याची व्यथा जडली, काय करील बिचारी? बाहेरच्या पडवीतच तिला निजावे लागे. डोंगराला गार वारा दिवसरात्र भिरीभिरी यावयाचा. सीताआत्याला पांघरायला एक फाटकी चौघडीच होती. तेवढ्याने थंडी कशी भागावी? या सर्व परिस्थितीचा तिच्या शरीरावर व मनावर फार परिणाम झाला. दम्याने शरीर खिळखिळे झाले! थंडीच्या दिवसांत तर फारच त्रास होई. एकदा खोकला आला की घटका-घटका तो थांबू नये! बरे औषधपाण्याला तरी पैसे कोठून आणणार? कारण दोन पैसे हाती आले तर कोर्टातील कामाची एखादी नक्कल करून आणण्यात रामचंद्रपंतांनी ते खर्च केलेच म्हणून समजावे!
इतके होते तरी सीताआत्या पतीवर एक दिवसही रागावली नाही, धुसफूस नाही, आदळाआपट नाही, काही नाही! ती पावशेर (कोकणची पावशेर) दूध विकत घेत असे. रामचंद्रपंतांस चहा लागे व दमेकरीण झाल्यापासून सीताआत्याही चहा घेऊ लागली होती. पतीला तिने कधीच नावे ठेवली नाहीत. एकदा तिचा भाऊ रामकृष्ण तिच्याकडे आला होता. तो म्हणाला, “सीताबाई, अजून यांना अक्कल येत नाही? कोर्टकचे-यांपायी यांनी सर्वस्व घालविले. मी तुला भाऊबीजेचे म्हणून दोन रुपये यांच्याबरोबर पाठविले, तेही त्यांनी वकिलांना द्यावे काय? आणि तुला कळवूही नये; माझा मनाचा भडका उडतो! वाटते की...”
सीताआत्याने भावाच्या तोंडावर हात ठेवले. पतीची निंदा तिच्याने ऐकवेना. पतीला बोलण्याचा जास्तीत जास्त अधिकार तिचा होता. परंतु ती कधी बोलली नाही. सीताआत्या रामकृष्णाला म्हणाली, “रामकृष्णा, असे बोलू नये हो! अरे माणूस करतो ते सारे बरे व्हावे यासाठीच करतो ना? ते कोर्टकचेरी करतात, ते उरलेले आणखी जावे म्हणून नव्हे, तर आपले गेलेले परत यावे म्हणून. जेथे फुले वेचली तेथे शेण्या वेचण्याची वेळ आली! काय करायचे? आम्हा बायकांचे की नाही, एक प्रकारे बरे! घरात बसावे आणि मुळमुळू रडावे. परंतु पुरुषांचे तसे कोठे आहे? त्यांना बाहेर हिंडावे फिरावे लागते, अनेकांनी घालून पाडून केलेली बोलणी ऐकावी लागतात, अपमान सोसावे लागतात. म्हणून ते इरेस पडतात व म्हणतात, की अजूनही मिळवू-पुनः अपील करू! रामकृण्णा, आशा कुणाला सुटली आहे का? खरे म्हटले तर आम्हाला ना पोर, ना बाळ! परंतु पूर्वीप्रमाणे ऐटीने न् अभिमानाने राहता यावे असे त्यांना वाटते, म्हणूनच धडपडतात, खटपटी करतात. त्यांच्या खटपटीला यश आले असते, तर ठेवली असती का रे तुम्ही नावे? उलट मग ‘हे फारच हुशार, दक्ष, कायदेपंडीत अन् व्यवहारचतुर आहेत.’ असे तुम्हीच म्हटले असते. म्हणून रामकृष्णा, आपण काही बोलू नये. जे जे होईल, ते ते पाहावे, भोगावे.”