मूल रडू लागले तर त्याला आंदुळणे, त्याला नीट कपड्यांत गुंडाळून घेऊन हिंडविणे, खेळविणे, नाचविणे, ही कामे राधाबाईच करीत. त्यांना काम सांगावे लागत नसे, काम हाच आनंद होता. आपण होऊनच त्या सारे करीत, नवीन बाळाचे नाव दिनेश असे ठेवण्यात आले होते. दिनेश व नरेश-दोन नातू. जशी रामलक्ष्मणांची वा लवकुशांची ती जोडी होती ! पुनर्वसु नक्षत्रांचे ते दोन तारे होते !
दिनेश वाढू लागला, आपले टपोरे काळेभोर डोळे उघडून तो सारी सृष्टी पाही. राधाबाई त्याला अंगणात नेत. झाडामाडांची डोलणारी, नाचणारी, हिरवीगार सृष्टी, फुलांची सुगंधी व रंगमय अशी पवित्र सृष्टी, पाखरांची किलबिल करणारी, उडणारी, फडफडणारी सृष्टी. या अनंत सृष्ट्या लहान बाळ पाही.
नरेशलाही राधाबाईंचा फार लळा लागला होता. त्या त्याला गोष्टी सांगत. गाणी म्हणून दाखवीत. त्या त्याला मांडीवर घेत, त्याचे मुके घेत. नरेश त्यांची पाठ सोडीत नसे. प्रेम सा-या जागाचा लळा लावून घेईल व अहंकार सा-या जगाला दूर लोटील.
राधाबाई बाईसाहेबांस म्हणाल्या, “नका ती तेलाची भजी खाऊ. तेलकट खाल्लेत तर बाळाला बाधेल, त्याला खोकला होईल.”
बाईसाहेब म्हणाल्या, “तुम्हा जुन्या बायकांच्या आपल्या काही तरीच वेड्या समजुती ! भजे खाल्ले म्हणून काय झाले ? हे कांद्याचे नाही; बटाट्यांचे आहे चांगले ! आणि झाला खोकला तर आहेच डॉक्टर औषध घ्यायला !”
राधाबाई नम्रपणे म्हणाल्या, “बाईसाहेब ! लहानपणापासून कशाला ते डॉक्टर ? रोज बोंडलेभर बाळकडू घातले की पोटातले दुखणे वगैरे होण्याची भीती नसते आणि बाईसाहेब, डॉक्टर आहेत म्हणून का मुलाला मुद्दाम आजारी पाडायचे आहे ? मी खरोखर सांगते तुम्हाला, की अजून इतक्यात तेलकट वगैरे खाऊ नका, आणि उद्यापासून खसखशीची लापशीही घ्या, ‘आवडत नाही’ म्हणू नका; म्हणजे अंगावर दूध येईल आणि बाळालाही बाळसे चढेल.”
दुस-या दिवशी राधाबाईंनी स्वतःच्या हातांनी लापशी तयार केली. तिच्यात त्यांनी बेदाणे, खारकाचे तुकडे घातले. बाईसाहेबांस आग्रह करकरून त्यांनी ती घ्यायला लावली. राधाबाईंचा प्रेमळ व मायाळू स्वभाव पाहून मालती म्हणाली, “तुम्ही जशा माझ्या आईच झाल्या आहा ! माझी आई असती तरी तिनेही इतक्या प्रेमाने न् काळजीने माझे केले नसते. माझे आई-बाप लहानपणीच वारले. मी अशीच एकटी वाढले. प्रेमहीन जगात मी वाढले.”
राधाबाई म्हणाल्या, “तुम्हाला कोणी नाही?”
मालती म्हणाली, “माझ्या चुलत्यांकडे होते मी. ते मला शिकवीत. परंतु त्यांचा स्वभाव जरा तिरसट होता. काकूही मला हिणवी. मला कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली. मी मग स्वतंत्रच राहू लागले. मला जगात कशाचीही जरूरी नाही.”
राधाबाई म्हणाल्या, “असे म्हणून कसे चालेल बाईसाहेब ? जगात आपल्याला कोणी तरी असावे असे वाटते. ज्याला पाहून आपण प्रेमाने हसू, ज्याची स्मृती येऊन रडू, ज्याला आपले सारे देऊ, असे कोणी तरी आपल्याला पाहिजे असते.”