“काय रे ए शश्या, निमूटपणे जागेवर चाललास का रे ? जसा अगदी साळसूद ! इकडे ये जरा. इकडे ये म्हणतो ना ? का ऐकायला येत नाही ? आणा रे, त्याला धरून आणा. ये म्हणतो तरी येत नाही. चालला बसायला !” -मास्तरांचे तोंड सुरू झाले.
शशीचे कान धरून मुलांनी त्याला मास्तरांसमोर नेले. मास्तरांचे पोट जरा मोठे होते. ते खुर्चीवर बसले म्हणजे त्यांचे पोट टेबल व खुर्ची यांच्यामध्ये नीट चपखल बसे. टेबल पुढे सरकविल्याशिवाय त्यांना उठता येत नसे. म्हणून पुष्कळ वेळा ज्या मुलावर क्रोध होई त्याचा कान धरून त्यांच्यासमोर आणून उभे करण्यात येत असे. कान पकडून कोकरींना आणतात व देवीसमोर त्यांचा बळी देतात, तोच प्रकार त्या विद्यामंदिरात होत असे ! गुरुदेवतेसमोर शशीसारख्या मुलांचे बळी देण्यात येत असत.
“हात कर पुढे, नीट कर.” मास्तर ओरडले. शशीचा तो फुलासारखा हात पुढे झाला, झणझणीत छडी त्या हातावर बसली एक-दोन-तीन छड्या बसल्या.
“जा, आपल्या जागेवर जाऊन एक तास उभा राहा.” मास्तरांनी बजावले.
फुलांवर निखारे ओतावे, तशा त्या छड्या लागल्या. रडत-रडत शशी जागेवर जाऊन उभा राहिला.
वर्गात वाचन चालले होते. आज खारीचा धडा चालला होता.
“खार कशी खेळकर असते, कशी टुणटुण उड्या मारते ! तिची शेपटी कशी सारखी नाचत असते ! ती कशी वाकुल्या दाखवते, पुढच्या दोन पायांत फळ धरून कशी खाते, मध्येच चकचक् करते ! तिचे अंग किती स्वच्छ, तजेलदार व गुबगुबीत !”
असे वाचन चालले होते. मास्तरांची दृष्टी कोठे आहे ? राहूची दृष्टी चंद्राकडे असावयाची, ससाण्याची कबुतराकडे. मास्तरांची दृष्टी पुनः शशीकडे वळली.
“शश्या, तुझे लक्ष कोठे आहे ? कोठे पाहत होतास ?” मास्तरांनी विचारले.
“बाहेर खार उड्या मारीत आहे. तिच्याकडे माझे लक्ष होते.” शशी म्हणाला.
“वर्गात खारीचा धडा चालू आहे. तरी बाहेर बघतोस का ? अरे. पुस्तकात नाही का खारीचे चित्र ? शाळेत येतोस तरी कशाला गाढवा ? शिकण्याकडे लक्ष नाही, बाहेरची पाखरेच बघत राहा. तू अगदीच निर्लज्ज कसा ? खुशाल सांगतो की मी बाहेर बघत होतो,” मास्तरांचे प्रवचन सुरू झाले.
शशी विनयाने म्हणाला, “ मास्तर, मला खरेच पाखरे आवडतात. आणि बाहेर एक खार दुस-या खारीच्या पाठीमागे लागली होती. कशी पण त्यांची धावपळ ! जणू त्यांची शर्यतच होती. मी जाऊ का बाहेर ?”
“बाहेर जातोस का ? इकडे ये रे, फाजीलपणे विचारतोस आणखी ! काही अदबी आहे की नाही ? मास्तर म्हणजे का कचरा ? इकडे ये.”