“पावणेदोन आण्यांची लिही. पुनः फाजीलपणाने विचारू नकोस.” मास्तरांनी बजावले. काही वेळ थांबून त्यांनी विचारले, “झाला का रे हिशेब? शश्या, लिहिलेस का उत्तर?”

“दोन आण्यांची झाली, परंतु पावणदोन आण्यांची होत नाहीत. थांबा, मारू नका. मी लिहीतो काही तरी-” शशी म्हणाला.
“काही तरी लिहीतोस का रे? ही का थट्टा आहे? हा बाजार आहे, होय? ही शाळा आहे, शाळा! रोज अश्रू ढाळा-” असे मास्तर म्हणाले.

थोडा वेळ आणखी थांबून मास्तरांनी विचारले, “किती आले?”

कोणी म्हणे दहा, कोणी म्हणे बारा.

“चूक सारे. सात एक सात; आणि सात पावणे!”

“पावणेदोन,” एकाने उत्तर दिले.
“अरे, सात पाव नव्हे” पुनः मास्तरांनी विचारले.

“सव्वापाच मास्तर.” एकाने सांगितले.

“भले शाब्बास! सात पावणे सव्वापाच; आठ पावणे सहा. आता दुसरीत तरी जाऊन बसा! अजून पाऊणकी येत नाही तुम्हाला. सात आणि सव्वापाच मिळून किती?” त्यांनी विचारले.

“सव्वाबारा!” एक बोलला.

“ज्याने सव्वाबारा लिहिले असेल, त्याचे उत्तर बरोबर,” मास्तर म्हणाले.

अमीन म्हणाला, “मी माझ्या आईबरोबर आंबे विकायला जातो, तर ती अर्धा-पाव आंबा देत नाही, सारा आंबा देते म्हणून मी तेरा आंहे लिहिले आहेत.”

“अरे, पण ही केळी आहेत, तू आंबे लिहिलेस वाटते? आणि हिशेबात येतील तेवढी लिहावी. पावक्यात, पाऊणक्यात जसे येईल तसे लिहावे तुम्हाला केव्हा हे सारे समजणार?” मास्तर खिन्नपणे म्हणाले.

“त्या बघा गायी रानातून आल्या. सो़डा आता शाळा.” मुले म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel