उभा राहून राहून बाळ शशी दमला. गायीचे वासरू बाजूला बांधलेले होते. त्या वासराजवळ शशीने थोडे गवत पसरले व तो तेथे निजून गेला. दोन वासरे तेथे झोपी गेली होती, तांबू प्रेमळ डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहात होती.
तिकडे अमीनही रडत रडत घरी गेला होता. त्याने दादूला सारी हकीकत सांगितली.

दादू :  अमीन, खरेच नाही ना तुम्ही काही घेऊन खाल्ले? खाल्ले असेल तर सांग.

अमीन : नाही, बाबा. शशीने फी दिलेली मला चांगली आठवते बाबा, मास्तरांनी त्याला गुरासारखे मारले.  मलाही मारले; परंतु शशीला फार. आणि त्यांनी त्याच्या घरी चिठ्ठीही दिली आहे. शशीचे बाबा शशीला आणखी मारतील. बाबा, शशीला आपल्या घरी राहू द्या ना! शशी सर्वांना आवडतो. गायीगुरांना, पशुपक्ष्यांनाही शशी आवडतो. हे त्याचेच पाखरू, शशी आला रे आला, की ते पिंज-यात नाचू लागते. शशीला मुंग्या चावत नाहीत. गांधीलमाश्या डसत नाहीत. परंतु त्याच्या वडिलांना तो आवडत नाही. त्याची आईसुद्धा त्याला ‘मर जा’ असे म्हणते. बाबा, माझा शशी किती गोड आहे! किती दयाळू आहे!

अमीन एखाद्या बालकवीप्रमाणे शशीचे वर्णन करीत होता. ते वर्णन ऐकून दादूचे डोळे भरून आले! थोड्या वेळाने दादू अमीनला म्हणाला, “बेटा अमीन, मी एक युक्ती सांगू तुला? मी शशीच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना सांगतो की शशीच्या खिशातील पैसे नकळत आमच्या अमीनने घेतले होते. शशीला वाटले, की फी दिली. परंतु तो अमीनचा अपराध. अमीनने अपराध कबूल केला आहे. हे घ्या तुमचे पैसे. शशीवर रागावू नका! अमीन, असे केले तर?”

अमीन : परंतु बाबा, हे खोटे नव्हे का? आणि शाळेत मुले मला चोर चोर म्हणतील. असे खोटे सांगितल्याबद्दल देव रागावणार नाही?

दादू : बेटा, रागावणार तर नाहीच. उलट तुझे मित्रप्रेम पाहून तो प्रसन्न होईल. जग तुला चोर म्हणेल, खुदा म्हणणार नाही. तुझ्या मित्रासाठी तू हे कर.

अमीन : बाबा, तुम्ही सांगाल ते चांगलेच असेल. शशीला घरी त्रास न होवो, म्हणजे झाले.

दादू शशीच्या घरी जावय़ास निघाला. रात्रीचे दहा वाजण्याचा समय झाला होता. अंगणात येऊन ‘हरदयाळ,’ ‘हरदयाळ’ म्हणून तो हाक मारू लागला.

“कोण आहे रात्रीच्या वेळेस ?” असे म्हणत हरदयाळ बाहेर आले.

“मी दादू ! तुमच्याकडे आलो आहे. तुमचा मुलगा निर्दोषी आहे. अमीनने शशीचे पैसे घेतले होते. त्याने घरी आपण होऊन कबूल केले. तसा माझा मुलगा चांगला आहे. मुलेच आहेत, एखादे वेळेस खावे-प्यावे असे त्यांना वाटते. हे घ्या पैसे, शशीला मारू नका. गुणी आहे तुमचा बाळ.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel