४. अन्यायी अधिकारी.

(तंडुलनालि जातक नं. ५)

वाराणसीमध्यें दुसरा एक ब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत होता. त्या वेळीं आमचा बोधिसत्त्व लहान अधिकारावरून बढती, होत होत परदेशांतून येणार्‍या मालाची किंमत ठरविणारा मुख्य अधिकारी झाला. बोधिसत्त्व मालाची यथायोग्य किंमत ठरवीत असे. पण ब्रह्मदत्ताला तें न आवडल्यामुळें तो बोधिसत्त्वाला एकांत स्थळीं बोलावून आणून म्हणाला 'मित्रा, तुला लहान अधिकारापासून मी ह्या मोठ्या अधिकारावर चढविलें आहे, तें कां हें तुला माहीत आहे काय ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, माझ्या प्रामाणिकपणाचें हें फळ आहे असें मी समजतों. आजपर्यंत ज्या ज्या लोकांशीं माझा संबंध आला त्यांना त्यांना कोणत्याही रीतीनें मजपासून ताप झाला नाहीं; एवढेंच नव्हे, सर्वत्र मी आपल्या प्रजेची यथाशक्ति सेवा केली आहे. माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्ध देखील दुर्बळांचा मी कैवार घेतला आहे. या माझ्या कामगिरीनें प्रसन्न होऊन श्रीमंतांनीं या अधिकारावर मला आणिलें अशी माझी समजूत आहे.''

ब्रह्मदत्त म्हणाला, ''तूं माझ्या प्रजेची सेवा केलीस हें ठीक आहे पण तुझा पगार माझ्या तिजोरींतून मिळत असल्यामुळें तूं माझ्या सेवेंत अंतर पडूं देतां कामा नये. कधी कधीं प्रजेचा आणि राजाचा अर्थ एकच असतो असें नाहीं; आणि राजसेवकांनी प्रथमतः आपल्या धन्याचा अर्थ साधून सवड झाल्यास इतरांचा साधावा हें योग्य आहे. आज मी तुला या ठिकाणीं बोलावून आणिलें त्याचें कारण हें कीं परदेशांहून येणार्‍या मालाला खरीखुरी किंमत देऊन तूं जर माल खरेदी करूं लागलास तर माझी तिजोरी थोडक्याच मुदतींत रिकामी पडेल.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''पण ह्या बाबतीत मला दुसरें कांही करितां येण्यासारखें आहे असें वाटत नाहीं. सत्य सर्वांत श्रेष्ठ आहे हें सुभाषित आपणाला माहीत आहेच. तेव्हां सत्याचा भंग होऊं न देणें हें मनुष्याचें पहिलें कर्तव्य होय. पण समजा, परदेशांतून आलेल्या मालाची मी भलतीसलती किंमत ठरविली, तर देशोदेशीं आपल्या राज्यपद्धतीची अपकीर्ति होईल, आणि कोणताहि चांगला व्यापारी आपला माल घेऊन ह्या शहरांत येण्यास धजणार नाहीं. प्रामाणिकपणानें परमार्थच साधतो असें नाहीं, परंतु प्रपंचांत देखील प्रामाणिकपणासारखा दुसरा सुखावह मार्ग नाहीं.'' परंतु त्या लोभी राजाला बोधिसत्त्वाचा प्रामाणिकपणाचा मार्ग आवडला नाहीं. त्यानें त्याला त्या अधिकारावरून दूर केलें, आणि त्याच्या ऐवजीं आपल्या भोंवतीं जमलेल्या तोंडपुजे लोकांपैकीं एकाला त्या अधिकारावर नेमविलें. तो गृहस्थ राजाला आवडेल अशा रीतीनें परदेशांतून येणार्‍या मालाची किंमत ठरवीत असे. तो राजाच्या मर्जीतील असल्याकारणानें त्याविरुद्ध कोणी तक्रार केली नाहीं.

कांही काळ गेल्यावर उत्तरेकडील देशांतून एक घोड्यांचा व्यापारी पांचशें उत्तम घोडे घेऊन विकण्यासाठी वाराणसीला आला. राजाच्या किंमत ठरविणार्‍या नवीन अधिकार्‍यानें त्या घोड्यांची किंमत * पावशेर तांदूळ ठरविली. त्याप्रमाणें राजानें त्या व्यापार्‍याला पावशेर तांदूळ देऊन घोडे आपल्या पागेंत बांधण्यास हुकूम केला. गरीब बिचारा व्यापारी ते तांदूळ फडक्यांत बांधून आंसवें गाळीत तेथून चालता झाला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळशब्द तंडुलनाळी असा आहे. नाळी म्हणजे सरासरी पावशेराचें मापटें असावें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel