२५. आपल्या सामर्थ्याचा अकालीं उपयोग करूं नये.

(वेदब्भ जातक नं. ४८)

प्राचीनकाळीं काशीराष्ट्रांतील एका गांवीं एक ब्राह्मण रहात असे. त्याला वैदर्भ नांवाचा एक मंत्र अवगत होता. त्या मंत्राचें सामर्थ्य असें होतें कीं नक्षत्रयोग जाणून त्याचा जप केला असतां आकाशांतून सुवर्णरजतादिक पदार्थांची वृष्टि होत असे. आमचा बोधिसत्त्व या ब्राह्मणाचा शिष्य होता. एके दिवशीं ते दोघे कांहीं कारणानिमित्त चैत्यदेशाला जाण्यासाठीं निघालें. वाटेंत एका जंगलांत त्याला पांचशें चोरांनीं गांठलें.

या चोरांना ओलीस धरणारे चोर असें म्हणत असत. कां कीं जेव्हां त्यांच्या हातीं पिता आणि पुत्र सांपडत तेव्हां ते पुत्राला ठेवून घेऊन पित्याला द्रव्य आणण्यासाठीं घरीं पाठवीत असत, जेष्ठ आणि कनिष्ठ भाऊ हातीं लागले असतां जेष्ठाला घरीं पाठवीत व कनिष्ठाला ओलीस धरून त्यांजकडून द्रव्य मिळवीत असत म्हणून त्यांना ओलीस धरणारे चोर असे म्हणत असत.

या चोरांनीं बोधिसत्त्वाला आणि वैदर्भमंत्रवेत्त्या ब्राह्मणाला जेव्हां पकडलें, तेव्हां गुरूला ओलीस धरून शिष्याला (बोधिसत्त्वाला) द्रव्य आणण्यासाठीं घरीं पाठविलें. जातांना बोधिसत्त्व आपल्या गुरूस एकीकडे नेऊन हळूच म्हणाला, ''आज पुष्कळ वर्षांनी आकाशांतून सुवर्णरजतादिकांची वृष्टि आपल्या मंत्रभावानें होईल असा नक्षत्र-योग आला आहे. परंतु आपण या प्रसंगीं आपल्या मंत्राचा बिलकूल उपयोग करूं नये. जर आपण अशा भलत्याच वेळीं मंत्रजप कराल तर आपली आणि या सर्व चोरांची अत्यंत हानि होईल. तेव्हां यांनीं जरी आपणाला थोडाबहुत त्रास दिला तरी तो सहन करा. मी एक दोन दिवसांत पैसे घेऊन परत येईपर्यंत दम धरा.

आपल्या गुरूला याप्रमाणें सांगून बोधिसत्त्व तेथून निघून गेला. सूर्यास्तानंतर चोरांनी ब्राह्मणाचे हातपाय बांधून त्याला खाली निजविलें. इतक्यांत पूर्ण दिशेला अलंकृत करणार्‍या पूर्णचंद्राचा उदय झाला. ब्राह्मणानें आकाशाकडे पाहिलें, आणि नक्षत्रयोग बरोबर जुळून येत आहे असें जाणून तो आपणाशींच म्हणाला, ''या विपत्तींत पडण्याचें कांहींच कारण दिसत नाहीं. येऊन जाऊन चोरांला पाहिजे आहे तें धन. आपण जर यांना आतांच्या आतां दिलें तर ते मला मोकळें करतील, व मी त्रासांतून मुक्त होईंन.'' तो चोरांना म्हणाला ''चोर हो, माझे हे हाल तुम्ही कां करितां ?''

चोर म्हणाले, ''द्रव्यप्राप्तीवांचून, दुसरा आमचा कोणताही हेतु नाहीं.''

ब्राह्मण म्हणाला, ''एवढेंच जर असेल तरी मला या बंधनांतून मोकळें करा, व न्हाऊं घालून नूतन वस्त्र परिधान करवून गंध पुष्पांनीं माझें शरीर सजवून मला आसनावर बसवा.''


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel