१२८. धूर्त कोल्हा आणि शहाणी बकरी.

(पूतिमंसजातक नं. ४३७)


हिमालयाच्या पायथ्याशीं पूतिमांस नांवाचा कोल्हा वेणी नावाच्या आपल्या बायकोसह एका गुहेंत रहात असे. जवळच्या खेडेगांवीं एका धनगरापाशीं पुष्कळ मेंढ्या होत्या. त्या चरावयास पूतिमांस रहात होता तेथें येत असत. परंतु त्यांबरोबर धनगर आणि त्याचे कुतरें असल्यामुळें एखाद्या कोंकराला पळविण्याची त्याची छाती होत नसे. तथापि मेंढराला पाहून त्याच्या तोंडाला वारंवार पाणी सुटत असे. एके दिवशीं तो आपल्या बायकोला म्हणाला, ''वेणी, आमच्या आसपास हीं मेंढरें खुशाल चरत असून त्यांतील एकदेखील आम्हांला मारून खातां येऊं नये ही मोठ्या शरमेची गोष्ट होय !''

वेणी म्हणाली, ''युक्तिप्रयुक्तीनें यांतील एखांद्या मेंढीला येथें आणतां येण्यासारखें आहे. परंतु ती जवळ आली तर तुम्ही तिला पकडूं शकाल काय ?''

कोल्हा म्हणाला, ''धनगराचे कुतरे नसते तर मी या मेंढरांना एकामागून एक कधींच मारून खाल्लें असतें. पण या कुतर्‍यांना पाहिल्याबरोबर माझी गाळणच उडून जाते.''

वेणी म्हणाली, ''याला आपण अशी एक युक्ती करूं कीं, एका मेंढीची दोस्ती करून तुम्ही मेला असें सांगून तिला या गुहेंत घेऊन येतें. पण ती जवळ आली म्हणजे तिच्यावर झडप घालून तुम्ही तिला धरा म्हणजे झालें.''

कोल्ह्याला ही आपल्या बायकोची युक्ति फारच पसंत पडली. वेणीनें कुत्र्यांची दृष्टी चुकवून झाडाच्या आड चरणार्‍या एका मेंढीची बरीच मैत्री संपादन केली. त्या डोंगरावर चरावयास गेल्यावर मेंढी देखील एकटीच जाऊन कोल्हीला तेथें भेटत असे. एके दिवशीं कोल्ही त्या ठिकाणीं रडत रडत येऊन बकरीला म्हणाली, ''आज माझा पति एकाएकी मरण पावला ! त्यामुळें मला अत्यंत दुःख होत आहे. माझ्यानें त्या गुहेकडे पहावतहि नाहीं. तूं येऊन जर थोडावेंळ मला धीर देशील तर मी कसेंबसें त्याच्या प्रेताचे उत्तरकार्य करीन.''

मेंढीला कोल्हीचे शब्द खरे वाटले, व ती तिजबरोबर गुहेकडे गेली. परंतु मेंढी फार सावध असल्यामुळें ती कोल्हीच्या मागोमाग जाऊं लागली. कोल्ही तिला पुढें जाण्याचा आग्रह करी. पण आपणास वाट ठाऊक नाहीं असें म्हणून ती मागेंच राहिली. गुहेच्या कांहीं अंतरावर यांची चाहूल ऐकिल्याबरोबर मेल्याचें सोंग घेऊन पडलेला कोल्हा मेंढी आली किंवा आपली बायको एकटीच आली, हें जाणण्यासाठीं वर डोकें काढून हळूच पाहूं लागला. त्यानें वर डोकें उचललेंलें पाहून मेंढीनें मागल्या पायींच पळ काढला. इतक्यांत कोल्ही त्याच्या जवळ येऊन ठेपली. तो फार संतापून म्हणाला, ''वेणी ! तूं कितीतरी वेडी आहेस ! मेंढीची गोष्ट सांगून मला येथें मृताचें सोंग घेऊन निजावयास सांगितलेंस आणि आतां पहातों तर तूं एकटीच परत आलीस !''

वेणी म्हणाली, ''मला वाटतें कीं तुम्हीच मोठे वेडे आहांत ! मेल्याचें सोंग घेऊन निजले असतां तुम्ही भलत्याच वेळीं डोकें वर कां काढलें ?भलत्याच वेळीं जो उठतो त्याच्या हातची शिकार जाते हें तुम्हास माहीत नाहीं काय ?''

कोल्हा जरा ओशाळला, आणि म्हणाला, ''हातची शिकार गेली खरी ! पण आतां दुसरी कांहीं युक्ति योजून मेंढीला येथें आणतां येईल काय ?''

कोल्ही म्हणाली, ''पुनः एकवार तिला येथें आणतां येईल असे मला वाटतें. पण त्याप्रसंगीं तरी सावध राहून तुम्ही आपलें कार्य साधलें पाहिजे.''

असें म्हणून ती धांवत धांवत मेंढीजवळ गेली आणि म्हणाली, ''सखे तुझ्या येण्यामुळें माझ्यावर अत्यंत उपकार झाले आहेत. तुझी दृष्टी आमच्या गुहेवर पडते न पडते तोंच माझ्या स्वामीच्या शरीरांत चैतन्य आलें. तेव्हां तुझा पायगुण फारच उत्तम आहे असें मी समजतें; तर पुनः एकवार येऊन जर तूं आपल्या पायाची धूळ आमच्या घरीं झाडशील तर माझ्यावर अनंत उपकार होतील. माझा पति साफ बरा होऊन आम्ही सुखानें नांदूं.''

मेंढीनें या खेपेला तिचें कारस्थान ओळखलें आणि ती म्हणाली, ''कोल्हीणबाई, आतां आपल्या घरीं यावयाचें म्हणजे मला एकटीला जाणें योग्य नाहीं. माझ्या परिवारासह मी पाहिजे तर तुझ्या बरोबर येत्यें.''

कोल्ही म्हणाली, ''पण बाई, असा तुझा परिवार तरी कोणता ?''

मेंढी म्हणाली, ''मालिय, चतुराक्ष, पिंगिय आणि जंबुक हे माझ्या धन्याचे चार बलाढ्य कुतरे आहेत. त्यांना बरोबर घेऊन मी तुझ्या घरी येतें. एका निमित्तानें त्यांनाहि तुझी सुंदर गुहा पहावयास सांपडेल.''

हे बकरीचे शब्द कानीं पडतांच कोल्ही गांगरून गेली, आणि म्हणाली, ''बाई, तुला मी त्रास देऊं इच्छित नाहीं. केवळ तुझा आशीर्वाद असला म्हणजे पुरे आहे. एवढ्यानें माझा स्वामी बरा होईल, अशी आशा आहे. मात्र कुत्र्यांना आमची गुहा दाखवूं न देण्याची मेहेरबानगी कर म्हणजे झालें.''

असें बोलून ती दुष्ट कोल्ही आपल्या नवर्‍याकडे धांवत गेली आणि म्हणाली, ''तुम्हाला काय सांगावें. वांवास चुकलेला गांवास चुकतो म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. त्या मेंढीला येथे आल्याबरोबर पकडलें असतें, तर आमच्या मागची संकटपरंपरा टळून पोटभर खावयास मिळालें असतें. पण आतां ती म्हणते कीं, तिच्या धन्याच्या कुत्र्यांला घेऊन ही गुहा पहावयास येईन. आम्ही ताबडतोब येथून पळालों तरच आमची धडगत दिसते !''

कुतरे येतात असें ऐकल्याबरोबर पूतिमांसानें वेणीला घेऊन पलायन केलें आणि पुनः त्या स्थळाकडे ढुंकून देखील पाहिलें नाहीं.

भाग दुसरा समाप्‍त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel