५९. दुर्बल देवता.

(नंगुट्ठजातक नं. १४४)


एका काळीं आमचा बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मणकुलांत जन्मला होता. त्याच्या जन्म दिवशीं आईबापांनीं जाताग्नि स्थापन केला. पुढें वयांत आल्यावर ते त्याला म्हणाले, ''जर गृहस्थाश्रम करून राहण्याची तुझी इच्छा असेल तर तीन वेदांचे अध्ययन करून अग्निहोत्र पालन कर. जर ब्रह्मलोक परायण होण्याची इच्छा असेल तर हा जाताग्नि घेऊन अरण्यांत प्रवेश कर, व तेथें याची पूजा करून ब्रह्मसायुज्यता मिळेल.''

बोधिसत्त्वाला प्रपंचाचा उपद्‍व्याप नको होता. त्यानें जाताग्नि घेऊन अरण्यांत प्रवेश केला व तेथें अग्निदेवतेची पूजा करून तो कालक्रमणा करूं लागला. एके दिवशीं अरण्याजवळच्या गांवांत भिक्षेला गेला असतां एका श्रद्धाळू मनुष्यानें अग्निपूजेसाठीं त्याला एक बैल दिला. तो घेऊन बोधिसत्त्व आपल्या आश्रमांत आला; पुढें त्याच्या मनांत असा विचार आला कीं, भगवान अग्निनारायणासाठीं दिलेली ही दक्षणा त्यालाच अर्पण करावी. याचा यज्ञ करून अग्निनारायणाची तृप्ति करावी. पण अग्निनारायणास मीठ मसाल्यावाचून हें मांस आवडणार नाहीं. तेव्हां गांवांतून मीठ वगैरे सर्व पदार्थ आणून मग यज्ञाला सुरुवात करणें इष्ट आहे, असा विचार करून बैलाला अग्निकुंडासमोर खुंटाला बांधून बोधिसत्त्व म्हणाला, ''भगवान् अग्निनारायण, हा तुमचा बली आहे. उद्यां मी याला मारून यथासांग गोमेध करणार आहे. इतर पदार्थ जमविण्यासाठीं मी खेड्यांत जात आहें. तोपर्यंत तुम्हीं या तुमच्या बलीचें रक्षण करा.'' अशी प्रार्थना करून बोधिसत्त्व जवळच्या खेड्यांत गेला.

इकडे कांहीं व्याध अरण्यांत शिकारीसाठीं फिरत असतां शिकार न सांपडल्यामुळें तहानेनें व्याकून होऊन आणि भुकेनें पीडित होऊन आश्रमांतील तपस्व्यापाशीं काहीं फळमुळें खावयास मिळतील या आशेनें बोधिसत्त्वाच्या आश्रमांत आले. तेथें त्यांना बैल व अग्निकुंडांतील अग्नि याशिवाय दुसरें कांहीं आढळलें नाहीं. त्यांनीं त्या बैलाला मारून त्याचें मांस आगीवर भाजून यथेच्छ खाल्लें, आणि शेंपटी व चामडें तेथेंच टाकून देऊन राहिलेलें मांस घेऊन ते निघून गेले. बोधिसत्त्व होमाला लागणारे सर्व पदार्थ घेऊन आश्रमांत आला, आणि पहातो, तों बैलाचें शेंपूट व चामडें एवढेंच काय तें शिल्लक राहिलेलें ! तेव्हां अत्यंत विषाद वाटून तो अग्नीला म्हणाला, हे अग्निनारायणा, आजपर्यंत मी तुझी अनन्यभावानें सेवा केली. तूं माझें दैवत व मी तुझा भक्त, परंतु तुझ्यासाठीं आणिलेल्या बैलाचें जर तुला रक्षण करतां आलें नाहीं तर मग तूं माझें- तुझ्या भक्ताचें- रक्षण कसें करशील ? म्हणून आजपासून तुझी सेवा करण्याचें मी सोडून देतों.''

बोधिसत्त्वानें अग्निनारायणाला जलसमाधी देऊन अरण्यांत प्रवेश केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel