१४५. गुह्याचा स्फोट करूं नये.

(पंडुरजातक नं. ५१८)

वाराणसीहून पाचशें व्यापारी परदेशाशीं व्यापार करण्याच्या उद्देशानें नौकेंतून जात असतां वाटेंत भयंकर तुफान होऊन बहुतेक सर्व मत्स्यकच्छपादिकांच्या भक्ष्यस्थानीं पडले. एकटाच काय तो मोठ्या मुष्किलीनें बचावला. तो तुफानाच्या सपाट्यांत सापडून करंभीय नावाच्या बंदराला जाऊन लागला. वस्त्रपावरण समुद्रांत गेल्यामुळें तो दिगंबर रूपानेंच शहरांत भिक्षेला फिरूं लागला. लोकांनीं त्याला पाहून तो मोठा सत्पुरुष असावा अशा बुद्धीनें त्याचा फार गौरव केला. कांहीं श्रद्धाळू लोकतर त्याच्या भजनीं लागले.

तेव्हां त्यानें असा विचार केला कीं, ''आतां पुनः भांडवल जमवून प्रपंच थाटण्याची खटपट करीत बसण्यापेक्षां लोकांकडून चांगला आदरसत्कार होत आहे हें काय वाईट.'' पुढें लोकांनीं त्याच्यासाठीं वस्त्रें प्रावरणें आणलीं तरी तीं तो घेईना. हेतू एवढाच कीं, आपल्या प्रसिध्दींत विघ्नें येऊं नये. होतां होतां या साधूची कीर्ति आजूबाजूच्या सर्व प्रांतांत पसरली. दूरदूरचे लोक साधुमहाराजांच्या दर्शनाला येऊं लागले. त्यांच्या मठांत एवढी गर्दी होऊं लागली कीं, साधारण माणसाची तेथें दाद लागणें देखील संभवनीय नाहीं असे झालें.

तें पाहून करंभीय प्रांताजवळ नागभवनांत रहाणार्‍या पंडर नांवाच्या नागराजालाहि या साधूच्या दर्शनाची उत्कट इच्छा झाली व मधून मधून वेष पालटून तो त्याच्या दर्शनाला येऊं लागला. येथील नागांना पहाण्यासाठीं गरुडाचा राजा फार प्रयत्‍न करीत असे. परंतु त्याच्या तडाख्यांत ते सांपडत नसत. उलट गरुडाचाच पराभव होत असे. तेव्हां नागाचें कांहींतरी वर्म असावें व साधल्यास तें आपणाला समजावें अशा बुद्धीनें सुपर्णराजा त्या प्रांतांत फिरत असतां नागराजाला वेष पालटून करंभीय नग्न तापसाच्या दर्शनाला जातांना त्यानें पाहिलें. गरुडानेंहि आपला वेष पालटला व तो नागराजाच्या मागोमाग साधूच्या दर्शनाला गेला. हा प्रकार बरेच दिवस चालला होता. शेवटीं गरुडानें साधूची मर्जी चांगली संपादन केली. आणि एके दिवशीं तो त्या तपस्व्याला म्हणाला, ''साधुमहाराज, मी गरुडांचा राजा आहे. केवळ आपल्या सेवेसाठीं वेष पालटून येथें येत असतो. आतां आपणाला माझी एक विनंती आहे तेवढी सफल केल्यास मला मोठा वर मिळाल्यासारखें होईल.

या प्रांताजवळ एक मोठें नागभवन आहे. तेथल्या नागावर हल्ला करणें आम्हाला अद्यापि साधत नाहीं. नाग म्हटले म्हणजे गरुडाचें भक्ष्य- परंतु हे नाग आम्हाला मुळींच वश होत नाहींत आणि त्यांच्यावर हल्ला केल्यानें आमचाच पराजय होत असतो. यांत कांहींतरी वर्म असलें पाहिजे तेवढें आम्हांला शोधून द्याल तर आपले आमच्यावर अनंत उपकार होतील.''

तपस्वी म्हणाला, ''भो गरुडराज तुम्ही म्हणतां ती कामगिरी माझ्या हांतून कशी पार पडेल ? माझ्या अंगीं असें कांहीं योगबळ नाहीं कीं, जेणेकरून मला नागभवनांत प्रवेश करतां येईल. मग तेथें रहाणार्‍या नागाचें वर्म मला कसें समजेल ?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel