कोल्हीला हा ताप फारच असह्य झाला व तिनें ती गोष्ट आपल्या नवर्‍याला कळविली. दुसर्‍या दिवशीं कोल्हा सिंहाला म्हणाला, ''महाराज, मी आपला आश्रित आहें. आश्रितावर आश्रयदात्याचा सदोदित हक्क असतो, असा न्याय आहे. जर आपणाला माझें वास्तव्य येथें नको असेल तर आपण हक्कानेंच मला येथून जाण्यास सांगा. म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन मी ताबडतोब निघून जातों. परंतु आपल्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून माझ्या बायकामुलांना सतत त्रास होणें हा सरळ मार्ग नव्हे.''

सिंहाला खरी गोष्ट काय होती हें मुळींच ठाऊक नव्हतें. परंतु चौकशीं अंतीं त्याला सर्व कांहीं समजून आलें. तेव्हां तो सिंहीणीला म्हणाला, ''भद्रे, मागें एकदां सात दिवसपर्यंत मी या गुहेंत परत आलों नाहीं हें तुला आठवतें काय ?''

सिंहीण म्हणाली, ''होय, मला आठवतें. कां कीं त्या वेळीं स्वतःच शिकार करून निर्वाह करण्याचा माझ्यावर प्रसंग आला होता. मला असें वाटलें कीं, आपण कोठें तरी शिकारीच्या नादानें भडकत गेला असाल.''

''नाहीं भद्रे मी भडकलों नाहीं. डोंगरा-खालीं असलेल्या तळ्याच्या कांठीं मी चिखलांत रुतून राहिलों होतों. केवळ लाजेखातर ही गोष्ट मी तुला सांगितली नाहीं. त्या प्रसंगी या कोल्ह्यानें मोठ्या युक्तीनें मला त्या संकटांतून पार पाडलें. तेव्हांपासून त्याची माझी मैत्री जडली. भद्रे ! जरी आपला मित्र आपल्यापेक्षां दुर्बल असला तरी जोंपर्यंत तो मित्रधर्मानें वागत आहे, तोंपर्यंत त्याची अवहेलना करतां कामा नये; तोपर्यंत त्याला आपला बांधव, सखा किंवा मित्र असें म्हणण्यास हरकत नाहीं. जरी हा कोल्हा यःकश्चित प्राणी आहे तरी त्यानें मला प्राणदान दिलें आहे, हें लक्षांत ठेव आणि मनांतील सर्व कुशंका सोडून दे. आपल्या मुलांप्रमाणें त्याच्याहि मुलांवर प्रेम करीत जा, व त्याच्या स्त्रीला आपल्या बहिणीप्रमाणें मानीत जा.''

सिंहाचा उपदेश सिंहिणीनें मोठ्या आदरानें पाळला. आणि असें सांगतात कीं, त्या सिंहाच्या आणि कोल्ह्याच्या कुटुंबाची मैत्री सात पिढयांपर्यंत अव्याहत चालली होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel