राजदरबारीं एक चाणाक्ष ज्योतिषीणबाई होती. तिच्या कल्पकतेबद्दल सर्वांची खात्री होती. राजाच्या भाच्यानें नजराणे पाठवून व गोड गोड बोलून तिची मर्जी संपादन केली, व आपली आणि राजकन्येची भेट होण्याचा योग जुळवून आणण्याचा कांहीं उपाय शोधून काढण्याविषयीं तिला विनंती केली. त्या धूर्त बाईला यांत कांहीं विशेष अक्कल खर्चण्याचें कारण पडलें नाहीं. तिनें या कामीं जी युक्ति योजिली तिचा यापुढील गोष्टीवरून उलगडा होणारच असल्यामुळें येथें निराळा उल्लेख करीत नाहीं. एवढें सांगितलें म्हणजे पुरे आहे कीं, राजाच्या भाच्याला तिच्या मसलतीनें फार आनंद झाला, व तिनें सांगितलेल्या मार्गांचा अवलंब करण्याचें त्यानें तिला वचन दिलें.

ज्योतिषीणबाईनें आपण अशी युक्ति योजिली आहे हें राजकन्येला आगाऊच सांगून ठेविलें व तदनंतर राजाजवळ जाऊन ती म्हणाली ''महाराज, आपल्या कन्येवर एका पिशाच्याची वक्रदृष्टी आहे. ताबडतोब शांति भूतशांति केली नाहीं तर तिच्यावर अनिष्ट संकटें येण्याचा संभव आहे.'' राजा म्हणाला, ''माझ्या एकुलत्या एका मुलीसाठीं मी भूतशांति करण्यास तयार होणार नाहीं, अशी तुमची समजूत आहे काय ? जें काय ठरावयाचें असेल तें मला आतांच सांगा. मी सर्व व्यवस्था आजच्याआज करविण्याचा हुकूम देतों.''

ज्योतिषीणबाई म्हणाली, ''महाराज, राजकन्येला स्मशानांत नेऊन टाका, मंचकावर निजवून त्या मंचकाखालीं एक प्रेत ठेविलें पाहिजे व भूतशांतीचे मंत्र उच्चारून तें भूत त्या प्रेतावर जाईल असा प्रयोग केला पाहिजे.''

राजानें ज्योतिषीणबाईच्या म्हणण्याप्रमाणें सर्व व्यवस्था करावी अशी राजवाड्यांतील नोकरांना आज्ञा केली. प्रेत कशा रीतीचें निवडावें हें ज्योतिषीणबाईनें आपल्या हातीं ठेविलें होतें. ठरलेल्या दिवशीं राजाचा भाचा स्मशानाच्या कोपर्‍यांत जेथें हा विधी व्हावयाचा होता तेथें डोक्यावरून पायापर्यंत सर्व शरीर वस्त्रानें गुंडाळून निजला. त्यानें आपले सशस्त्र शिपाई आजुबाजूला झाडींत दडवून ठेविले होते, व आपणाबरोबर मिर्चीच्या पुडीची एक लहानशी डबी ठेविली होती. ज्योतिषीणबाईनें राजकन्येचा मंचक आणून या जिवंत प्रेतावरच ठेवविला; व ती राजवाड्यांतील नोकरांना म्हणाली ''संभाळाहो माझा प्रयोगविधी चालला असतां या प्रेतांत राजकन्येवर असलेलें भूत शिरून तें नाचूं लागेल. व पहिल्यानें जो त्याच्या तावडींत सांपडेल त्याचा प्राण घेईल. या प्रेतांत जिवंतपणा आल्याचें चिन्ह म्हटलें म्हणजे त्याला एक दोन शिंका येतील, व त्या आल्याबरोबर तें उठून धावावयास लागेल. नंतर त्याच बाईनें राजकुमारीला गंधोदकानें स्नान वगैरे घालून यथाविधी त्या मंचकावर निजविलें, व मंत्र म्हणण्यास आरंभ केला. इतक्यांत खालील माणसानें मिरचीची तपकीर ओढली त्याबरोबर त्याला सटासट शिंका येऊं लागल्या. आतां हें प्रेत आमच्यांतील कोणाचा तरी बळी घेणार असें जाणून जो तो पळत सुटला ! ज्योतिषीणबाईनें तर सर्वाच्या आधींच पळ काढला ! राजाचा भाचा मंचकाच्या बाहेर येऊन राजकन्येला भेटला, व आपल्या सशस्त्र शिपायांसहवर्तमान त्यानें तिला स्वगृहीं नेलें. पुढें राजाच्या कानीं ही बातमी गेली तेव्हां तो आपल्या अमात्यांना म्हणाला, एवीं तेवीं माझा त्यालाच मुलगी देण्याचा बेत होता. मध्यंतरी तो रहीत झाला खरा. पण शेवटीं भाच्यानें स्वतःच तडीला नेला, असें म्हणण्यास हरकत नाहीं ! आतां त्याच्या या कृत्याबद्दल त्याला दंड न करतां त्याचें यथासांग लग्न करण्याची सर्व तयारी करा.''

राजाज्ञेप्रमाणें विवाहमंगलाची सर्व व्यवस्था करण्यांत आली व शुभ मुहूर्तावर राजकन्येचें आणि राजाच्या भाच्याचें लग्न झालें. तेव्हांपासून राजानें सर्व राज्यभार जामातावर टाकून धर्मचिंतनांत कालक्रमणा करण्यास सुरुवात केली. असिलक्षणपाठक या तरुण राजाच्या सेवेला पूर्वीप्रमाणें सर्वथैव तत्पर असे. एके दिवशीं राजा उद्यानांत मोकळ्या जागीं बसला असतां असिलक्षणपाठक ब्राह्मण त्याजवळ उभा होता. त्यांचें संभाषण चालूं असल्यामुळें त्याला तेथून दुसरीकडे जातां येईना. पण सूर्याच्या बाजूला त्याचें तोंड असल्यामुळें लाखेचें नाक वितळलें व खाली पडलें. त्यायोगें त्याला फारच लाज वाटली. तो तोंड खालीं घालून ओशाळा होऊन मुकाट्यानें राहिला. नवीन राजा हा प्रकार पाहून हंसत हंसत त्याला म्हणाला, ''गुरुजी, विनाकारण लाजूं नका कारण शिंकेमुळें तुमची हानि झाली असली तथापि ती सर्वांनाच अपाय करते असे नाहीं. कां कीं, त्याच शिंकेनें मला राज्यप्राप्ति झाली आहे ! एकाचा अपाय तो दुसर्‍याचा उपाय !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel