खेंकड्यानें विचार केलां कीं, ''ह्या चोरानें माशांना नेऊन मारून खाल्लें कीं जिवंत सोडलें हें कोणी सांगावें ? पण ह्याच्या बरोबर जाऊन त्यांची स्थिती काय झाली, हें पाहण्यास हरकत नाहीं, जर ह्यानें सुखरूपपणें मला पोहोंचविलें तर ठीकच आहे; न पेक्षां माझ्या तावडींतून हा जिवंतपणें निघून जाणार नाहीं ह्याविषयीं खबरदारी घेतली पाहिजे.'' तो बगळ्यास म्हणाला, ''बगळेमामा, माशांना तुम्हीं नेलेंत हें ठीक झालें. परंतु मला कसें न्याल ? बगळा म्हणाला, ''कसें म्हणजे ? चोंचींत धरून !'' खेंकडा म्हणाला, ''एकतर तुमच्या चोंचीत मी मावणार नाहीं; व दुसरें असें कीं मी गुळगुळीत असून घट्ट आहें, तेव्हां तुम्हांला मला नीट पकडतां यावयाचें नाहीं. पण माझे हे आंकडे फार सुदृढ आहेत. ह्यांनी जर मी आपल्या मानेला धरून लोंबकळत राहिलों, तर खालीं पडण्याची भीती नाहीं आणि त्या योगें तुम्हीं मला सुरक्षितपणें तिकडे घेऊन जाल.''

बगळ्याला ही गोष्ट पसंत पडली. खेंकड्याला आपल्या मानेला लटकावून तो सरोवराजवळ गेला, व त्याला तें सरोवर दाखवून वहिवाटीप्रमाणें आपल्या नेहमींच्या वृक्षाकडे वळला. तेव्हां खेंकडा म्हणाला, ''बगळे मामा, सरोवर तर ह्या बाजूला राहिलें, आणि तुम्ही मला येथें कोठें नेता ?''

बगळा रागावून म्हणाला, ''काय, मोठे आले आहेत कीं नाहीं तुम्हीं आमचे भाचे ! तुला गळ्याला लटकावून फिरत आहें, म्हणून तूं मला दास समजतोस काय ? हा पहा इकडे त्या माशांच्या कांट्यांचा केवढा ढीग पडला आहे ! तुझींहि हाडें ह्याच राशीवर पडणार हें पक्कें लक्षात ठेव.''

खेंकडा म्हणाला, ''त्या माशांच्या मूर्खपणामुळें, त्यांना मारून खाणें तुला सोपें गेले. पण आतां प्रसंग खेंकड्याशीं आहे हें तूं विसरूं नकोस. माझ्या आंकड्यांनीं तुझी जी मान पकडली आहे ती उगाच नव्हे. एवीं तेवीं मला जर मरावयाचें आहे तर आपण दोघेहि बरोबरच मरूं. हें पहा, तुझें डोकें कापून कसें खालीं पाडतों ते !'' असें म्हणून त्यानें आपल्या आंकड्यांनीं बगळ्याची मानगुटी दाबली. बगळ्याची बोबडी वळली, व डोळे पांढरे होण्याची पाळी आली. तो म्हणाला, ''महाराज, माझ्यावर मेहेरबानी करा. मला जीवदान द्या. मी तुम्हांला सुरक्षित तलावांत पोहोंचवून देतों.

खेंकड्यानें ''ठीक आहे'' असें उत्तर दिल्यावर बगळ्यानें त्याला नेऊन सरोवराच्या पाण्याच्या कांठीं हळूच चिखलावर ठेवलें. तेव्हां खेंकड्यानें कमळाच्या देंठाप्रमाणें त्याचा गळा कापून टाकला, व पाण्यांत प्रवेश केला. तेव्हां वृक्षदेवतेच्या रूपानें रहाणारा आमचा बोधिसत्त्व म्हणाला, ''शठ आपल्या शाठ्यानें सदोदित सुखी होतो असें नाहीं. बकाला जसा खेंकडा भेटला तसा शठाला कोणीतरी भेटतोच.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel