Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 40

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
३५. एकी असेल तेथें वास्तव्य करावें.

(रुक्खधम्म जातक नं. ७४)

चार दिक्पालांपैकीं वैश्रवण आपल्या पुण्यक्षयामुळें देवलोकांतून पतन पावला. त्याच्या जागीं इंद्रानें दुसर्‍या वैश्रवणाची योजना केली. त्यानें सगळ्या देवतांना आपआपल्या इच्छेप्रमाणें वसति करून रहावें असा निरोप पाठविला. आमचा बोधिसत्त्व त्या काळीं हिमालयाच्या पायथ्याशीं रहाणार्‍या देवतांच्या कुलांत जन्मला होता. त्यानें जवळच्या एका दाट शालवनाचा आश्रय केला, व आपल्या ज्ञातिबांधवांना तेथेंच रहाण्यास उपदेश केला. पण कांहीं जणांना बोधिसत्त्वाचें बोलणें पटलें नाहीं. त्या देवता म्हणाल्या ''येथें या अरण्यांत राहिल्यानें लोकांकडून आदरसत्कारपूर्वक मिळणार्‍या बळीला आम्हीं मुकू. गांवोगांवीं वडासारखे मोठमोठाले वृक्ष आहेत. तेथें जाऊन आम्हीं निरनिराळ्या झाडांचा आश्रय केला असतां लोकांकडून आमचा गौरव होईल, व अन्नपाण्याची ददात पडणार नाहीं.''

बोधिसत्त्व त्यांचे समाधान करूं शकला नाहीं. त्या निरनिराळ्या गांवीं जाऊन राहिल्या. काहीं निवडक देवता मात्र त्याच शालवनाचा आश्रय धरून राहिल्या. कांहीं दिवसांनीं भयंकर तुफान होऊन मोठमोठालें वृक्ष उन्मळून पडले. व त्यामुळें गांवोगांवीं एकाकी वृक्षांवर वास करून राहणार्‍या देवतांचें फार नुकसान झालें. त्या तशा स्थितींत निवासस्थान न मिळाल्यामुळें पुनः बोधिसत्त्व रहात होता त्या ठिकाणीं आल्या, आणि पहातात तों त्या वनाला मुळींच धोका पोहोंचला नव्हता. तेव्हां त्या बोधिसत्त्वाला म्हणाल्या, ''आम्हीं मोठमोठ्या वृक्षांचा आश्रय केला होता; पण त्यापैकीं कांहीं समूळ उपटून पडले, काहींच्या शाखा छिन्नभिन्न झाल्या व दुसरे वृक्ष वर पडल्यामुळें कांहींची फार नासाडी झाली. यामुळें आम्हीं निराश्रित होऊन येथें परत आलों; परंतु तुमच्या या लहान सहान शालवृक्षांनीं भरलेल्या वनाला मुळींच धोका पोहोंचला नाहीं.''

बोधिसत्त्व म्हणाला, '' बांधवहो, आमचें हें शालवन जरी मोठ्या वृक्षांनीं मंडित केलें नाहीं, तथापि येथें शालवृक्षांची इतकी दाटी आहे कीं जणूं काय ते एकमेकांच्या हातांत हात घालूनच रहात आहेत. जेथें अशी एकी आहे तेथें मोठमोठाल्या वृक्षांनां जमीनदोस्त करणार्‍या पराक्रमी वायुवेगाचें तरी काय चालणार आहे ! या एकीचें बळ पाहूनच मी या वनाचा आश्रय केला. पण तुम्ही लोभवश होऊन मोठमोठ्या वृक्षांच्या मागें लागला.''
« PreviousChapter ListNext »