६. उदारधी मृग.

(निग्रोधमिग जातक नं.१२)

एका काळीं आमचा बोधिसत्त्व मृगकुलांत जन्मला होता. त्याची कांति सुवर्णासारखी होती; डोळे वज्रमण्यासारखे तेजस्वी होते; शिंगें रजत वर्णाची होतीं; तोंड अरुणवर्ण, आणि हातपाय लाक्षारसानें चित्रित केल्यासारखे सुंदर होते. त्याची वालधि चमरमृगाच्या वालधीसारखी शोभिवंत होती, व शरीर जवान घोड्यासारखें सुंदर दिसत होतें. तो आपल्या पांचशें मृगांच्या परिवारासह अरण्यामध्यें राहत होता. त्याला त्याचे लोक न्यग्रोधमृगराज या नांवानें ओळखत असत. त्याच अरण्यामध्यें बोधिसत्त्वाच्या जातीचा दुसरा एक शाख नांवाचा मृग आपल्या मृगगणासह रहात असे.

त्या काळीं काशीच्या राजाला मृगयेची फारच चट लागली होती. तो दररोज शिकारीला जातांना मृगांना वेढण्यासाठीं आपल्या शेतकरी लोकांना घेऊन जात असे. त्यामुळें लोकांची फार हानी होई. शेतांतील कामें अर्धवट रहात असत, व वेळेवर शेताची पेरणी वगैरे न झाल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असे. तेव्हां वाराणसीच्या आसपास राहाणार्‍या लोकांनीं असा विचार केला कीं, ''भलत्याच वेळीं शिकारीला जावें लागल्यामुळें आमची कामें तशींच रहातात, त्यापेक्षां आपण एक मोठें कुरण तयार करून व त्याच्या भोंवतीं एक बळकट कुंपण घालून अरण्यांतून पुष्कळ मृगांना त्या कुंपणांत आणून सोडूं. म्हणजे रोज राजा एखाद्या दुसर्‍या मृगाची शिकार करून मांस खाईल, व आम्हाला शिकारीला नेणार नाहीं.''

त्याप्रमाणें त्या लोकांनी एक मोठें कुंपण तयार केलें, आणि मृगांना पाणी पिण्यासाठीं तेथें एक लहानसा तलाव खोदला. पावसाळ्यानंतर जेव्हां त्या कुंपणांत गवत वाढलें तेव्हां नागरवासी आणि ग्रामवासी सर्व लोक आपापलीं शस्त्रास्त्रें घेऊन मृगांना आणण्यासाठी आरण्यांत शिरले. तेथें त्यांनी न्यग्रोध मृगाच्या आणि शाखमृगाच्या स्थानाला वेढा दिला, आणि दांडक्यांनी झाडें झुडपें बडवून व मोठ्यानें आरडाओरड करून त्या मृगांना तेथून हुसकावून लावलें. परंतु मृगांना पळून जाण्याला दुसरी वाट न ठेवल्यामुळें त्यांना वाराणसीच्या राजासाठीं नवीन कुंपणांत शिरल्याशिवाय दुसरें गत्यंतर राहिलें नाहीं. ते सगळे मृग त्या कुंपणांत शिरल्यावर रयत लोकांनी त्या कुंपणाचे फाटक लावून टाकिलें, व राजवाड्यांत जाऊन ते राजाला म्हणाले, ''महाराज, आपण आम्हाला घेऊन रोज शिकारीला जात असल्यामुळें आमचें फार नुकसान होत आहे. म्हणून आम्हीं हजारएक मृगांना नवीन कुंपणांत आणून सोडलें आहे. आतां रोज आपणाला जे एक दोन मृग मारावयाचे असतील ते मारून त्यांचें मांस खात जा. पण आम्हांला मात्र शिकारीला जाण्याचा हुकूम करूं नका.''

राजाला लोकांचे म्हणणें योग्य वाटलें, व शिकारीला जाण्याबद्दल त्यांच्यावर त्या दिवसापासून सक्ती करण्यात येणार नाहीं असें अभिवादन देऊन त्यानें त्या लोकांना आपापल्या घरीं पाठविलें; आणि तो आपल्या मुख्य स्वयंपाक्यासह त्या कुंपणांत गेला. तेथें न्यग्रोध आणि शाख ह्या दोन मृगांना पाहून तो अत्यंत संतुष्ट झाला, व त्या दोघांना त्यानें अभयदान दिलें. त्या दिवसापासून राजा स्वतः एखाद्या मृगाला मारून घेऊन येत असे किंवा त्याचा मुख्य स्वयंपाकी मृगाला मारून आणीत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel