७७. साधूच्या सहवासाचें फळ.

(सीलानिससंजातक नं. १९०)

काश्यपबुद्धाच्या वेळीं एक श्रद्धावान् उपासक वाराणसींत रहात होता. तो कांहीं कामानिमित्त जहाजांतून परदेशीं जाण्यास निघाला. त्याच जहाजांतून एक न्हावीहि प्रवासास जाणार होता. त्याची बायको या उपासकाला म्हणाली, ''महाराज, माझा पती आपल्याच जहाजांतून जात आहे. त्याची आपण वाटेंत काळजी घ्या.''

उपासकानें आपणाकडून होईल तेवढी मदत करीन असें वचन दिलें. आणि ते दोघे जहाजावर चढले. सात दिवसपर्यंत जहाज चांगले चाललें होतें. परंतु आठव्या दिवशीं भयंकर तुफान होऊन त्याचे तुकडे झाले. उपासक आणि न्हावी एका फळ्याच्या आश्रयानें तरंगत जाऊन एका लहानशा बेटाच्या किनार्‍यावर पडले. त्या बेटावर फारशी फळफळावळें नव्हतीं. तथापि उपासकानें जीं कांहीं कंदमुळें आणि फळें मिळण्यासारखीं होतीं ती खाऊन आपली उपजीविका चालविली पण न्हाव्याला असलें नीरस जेवण आवडेना. तो पक्ष्याला मारून खाऊं लागला. पक्ष्याचें मांस आगीवर भाजून पहिल्यानें तें खाण्याविषयीं तो उपासकाला आग्रह करीत असे. परंतु उपासकानें ते कधींहि खाल्लें नाहीं. आपणाला जें कांहीं मिळालें आहे तेवढें पुरें आहे असें म्हणून पक्ष्याचें मांस खाणें तो नाकारीत असे. त्याची अचल श्रद्धा पाहून त्या बेटावर रहाणार्‍या एक नागराजाला कींव आली, आणि तो त्याला म्हणाला, ''हे उपासका, तुझ्यासाठीं मी माझ्या देहाची होडी बनवतो. तींत बसुन तूं तुला ज्या स्थळीं जावयाचें असेल त्या स्थळीं जा.''

उपासकानें नागराजाचे फार आभार मानले, आणि त्यानें निर्माण केलेल्या होडींत बसून तो न्हाव्याला म्हणाला, ''बाबारे, तुला जर मजबरोबर यावयाचें असेल तर चल लवकर ये.''

तेव्हां नागराजा म्हणाला, ''या न्हाव्याला या होडींत घेतां येत नाहीं. तो मोठा दुष्ट आहे. त्याच्यासाठीं ही होडी मी निर्माण केली नाहीं.''

उपासक म्हणाला, ''तो जरी पापकर्मी आहे तरी तो माझ्याबरोबर आलेला आहे; आणि मी जे कांहीं पुण्य केलें असेल त्याचा वाटा मी त्याला देत आहे.''

न्हावी म्हणाला, ''या तुझ्या देगणीचें मी अभिनंदन करतों. आजपर्यंत पुण्याचा मार्ग मी स्वीकारला नाहीं. परंतु तुझी संगति हेंच काय तें पुण्य माझ्या पदरीं आहे; आणि तुझ्या पुण्याचा वाटेकरी करून तूं मला फार ॠणी केलें आहेस.''

नागराजानें त्या न्हाव्यालाहि त्या होडींत येऊं दिलें. तेव्हां समुद्राचें रक्षण करणार्‍या देवतेनें होडी चालवण्याचें काम आपल्या हातीं घेतलें. त्या बेटावर सांपडणारीं अमोलिक रत्ने उपासकानें आपल्याबरोबर आणलीं. त्या दोघांना सुरक्षितपणें वाराणसीला आणून सोडल्यावर देवता म्हणाली, ''श्रद्धा, शील, त्याग इत्यादि गुणांचें हें फळ पहा ! या उपासकाच्या आंगीं हें गुण असल्यामुळें नागराजा स्वतः होडी होऊन त्याला घेऊन येथवर आला. मनुष्यानें अशा सत्पुरुषाचाच सहवास करावा. या न्हाव्यानें जर या उपासकाची कास धरली नसती तर समुद्रांतच त्याचा नाश झाला असता !''

असें बोलून ती देवता आणि नागराजा तेथून निघून स्वस्थळीं गेलीं. उपासकानें आपण आणलेल्या धनाचे दोन विभाग करून त्यांतील एक न्हाव्याला दिला. साधूच्या संगतीपासून मिळालेला लाभ न्हाव्याला आजन्म पुरला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय