८६. कुटुंबाविषयीं निष्काळजीपणा.

(पुटभत्तजातक नं. २२३)

प्राचीन काळीं वाराणसी नगरींत ब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत होता. आपल्या पुत्राविषयी त्याचें मन साशंकित झालें, आणि त्यानें त्याला सहकुटुंब आपल्या राज्याबाहेर हाकून दिलें. पुढें ब्रह्मदत्त मरण पावल्यावर मुलगा वाराणसीला आला. वाटेंत तो आणि त्याची स्त्री एका धर्मशाळेंत उतरलीं असतां राजपुत्राला एक द्रोणभर भात कोणी आणून दिला. त्यानें बायकोची काळजी न करितां तो सर्व आपणच खाल्ला. वाराणसीला पोंचल्यावर लोकांनीं मोठा उत्सव करून त्याला अभिषोक केला. आपल्याबरोबर प्रवासांत दुःख भोगिलेल्या त्या स्त्रीला त्यानें पट्टराणीचें पद दिलें. तथापि तिजविषयीं तो अत्यंत निष्काळजी असे. राजवाड्यांतील इतर माणसांप्रमाणोंच तिलाहि वागविण्यांत येत असे.

आमचा बोधिसत्त्व त्या काळीं या राजाचा एक प्रधान होता. एके दिवशीं राणीची मुलाखत झाली असतां तो तिला म्हणाला, ''महाराणीसाहेब, आम्हीं पुष्कळ दिवसांचे या राज्याचे नोकर आहों. परंतु आपणांकडून आम्हाला अद्यापि कांहींच बक्षिस मिळालें नाहीं.''

राणी म्हणाली, ''पंडितजी, तुम्ही म्हणतां ही गोष्ट खरी आहे. परंतु माझाच जेथें योग्य बोज रहात नाहीं, तेथें तुमच्यावर उपकार मी कोठून करावे ?'' याचें कारण विचारलें असतां तिनें उत्तर दिलें, ''राजेसाहेब मजविषयीं अत्यंत निष्काळजी आहेत. मी त्यांबरोबर इतके वनवास काढलें असतां राजपद हाताला लागणार ही बातमी समजतांच त्यांना माझ्यासंबंधानें मुळींच पर्वा वाटेनाशी झाली. आम्ही जेव्हां येथें येण्यास निघालों, तेव्हां वाटेंत द्रोणभर भात मिळाला असतां त्यांनीं मला विचारलें देखील नाहीं ! आतां मला पट्टराणीपद दिलें आहे खरें, पण माझी आणि येथल्या नोकरांची योग्यता सारखीच आहे.''

बोधिसत्त्वाला ही गोष्ट ऐकून सखेद आश्चर्य वाटलें. तो म्हणाला, ''राणीसाहेब तुम्ही स्वतः ही गोष्ट महाराजांसमोर सांगाल काय ?'' त्यापासून कांहीं भय उपस्थित होईल अशी शंका बाळगूं नका.

राणीनें ती गोष्ट कबूल केली. नंतर बोधिसत्त्व एके दिवशीं राजा आणि राणी एकाच ठिकाणीं बसलीं असतां जवळ येऊन म्हणाला, ''महाराणीसाहेब आम्हीं आपल्या पदरचे जुने नोकर आहों पण आपणांला अभिषेक झाल्यापासून बक्षिसाच्या रूपानें आम्हाला कांहींच मिळालें नाहीं.''

यावर राणी म्हणाली, ''आमचाच जेथें बोज रहात नाहीं, तेथें तुम्हांला आम्हीं काय देणार ? वाराणसीला येतांना द्रोणभर भात मिळाला, त्यावेळीं देखील राजेसाहेबांना माझी आठवण झाली नाहीं. मग राज्यकारभाराच्या धांदलींत ती कशी व्हावी ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''राजेसाहेबांची जर इतकी इतराजी आहे तर त्याला चिकटून बसण्यांत अर्थ काय ? पट्टराणी होऊन त्या पदाला योग्य असा सरंजाम जर आपणाला मिळत नाहीं तर आपल्या आईबापांच्या घरी जाऊन मध्यम स्थितींतील स्त्री या नात्यानें स्वस्थ राहिलेलें काय वाईट ?''

हें बोधिसत्त्वाचें बोलणें ऐकून राजा फारच शरमला. त्यानें आपल्या पत्‍नीची झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागून तिचा योग्य गौरव केला.

राजपदावर असलेल्या पुरुषानेंहि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, नाहीं तर कधींना कधीं फजिती झाल्याशिवाय रहात नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel