Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
११. हांजीहांजीपणा विषारी आहे !

(कुरंगमिग जातक नं. २१)

एकदां आमचा बोधिसत्त्व कुरंगमृग कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर अरण्यांत जाऊन तो निरनिराळ्या झाडांची फळें खात असे. एके काळीं एक शिवणीचा वृक्ष फलभारानें विनम्र झाला होता. बोधिसत्त्व त्या वृक्षाखालीं जाऊन वार्‍यानें पडलेलीं फळें खात असे. पण आमचा बोधिसत्त्व जिव्हालंपट नव्हता. फळें खाण्यापूर्वी आसपास एखादा पारधी दडून बसला आहे किंवा नाहीं, याची तो नीट छाननी करीत असे; आणि मग निर्वाहापुरतीं फळें खाऊन तेथून निघून जात असे.

एके दिवशीं त्या अरण्यामध्यें फिरणारा पारधी त्या शिवाणीच्या वृक्षावर येऊन दडून बसला. बोधिसत्त्व नियमाप्रमाणें एकदम वृक्षाखालीं न येतां कांहीं अंतरावर राहून जवळपास पारधी आहे कीं नाहीं याचें निरीक्षण करूं लागला. वृक्षाखालीं चांगलीं फळें पडलीं नसावीं असा विचार करून पारध्यानें कांहीं फळें तोडून बोधिसत्त्व उभा होता त्या बाजूला फेंकलीं. तरी बोधिसत्त्व तेथून हालेना. तेव्हां पारध्यानें आणखीहि फळें बोधिसत्त्वासमोर फैलावण्याचा क्रम चालविला. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''बाई शिवाणी, आज तूं माझी फारच हांजीहांजी चालविली आहेस ! रोजच्याप्रमाणें सरळ फळें न पाडितां माझ्या बाजूला दूरवर तूं फळें फेंकीत आहेस ! हांजीहांजीपणा विषारी आहे, हें तत्त्व मला माहीत असल्यामुळें मी तुझा दुरूनच त्याग करून दुसर्‍या शिवाणीच्या झाडाकडे जातों !''

बोधिसत्त्व तेथूनच पळत सुटला. व्याधानें त्याच्यावर शस्त्र फेंकलें; परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं !
« PreviousChapter ListNext »