त्याच्या वचनावर विश्वास ठेऊन बोधिसत्त्व त्याच्या पाठीवर बसला. कांहीं अंतरावर गेल्यावर मगर त्याला पाण्यांत बुडवूं लागला. हें काय आहे असा बोधिसत्त्वानें प्रश्न केल्यावर तो म्हणाला, ''रे मूर्खा, मीं केवळ परोपकारासाठीं माझ्या पाठीवर तुला वाहून नेत नाहीं. माझ्या स्त्रीला तुझें हृदयमांस खाण्याचें डोहाळे झाले असल्यामुळें तुला मी माझ्या बिळांत नेत आहें.''

आतां प्रसंगावधानावांचून दुसरी गती नाहीं असें जाणून बोधिसत्त्व मगराला म्हणाला, ''रे मित्रा, तूं ही गोष्ट मला सांगितलीस हें फार चांगलें झालें नाहींतर माझा नाश होऊन तूं मात्र फसला असतास ! शिवाय तुझ्यावर विश्वासघाताचा आरोप आला असता तो निराळाच ! आमच्या पोटांत हृदय असतें, तर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत असतांना तें छिन्नविच्छिन्न होऊन गेलें असतें. वानराच्या पोटांत हृदय असतें ही गोष्ट तुला खरी तरी वाटली कशी ?''

मगर म्हणाला, ''मग तुमचें हृदय तुम्ही कोठें ठेवीत असतां ?'' बोधिसत्त्वानें फळभारानें नष्ट झालेल्या एका औदुंबर वृक्षाकडे बोट दाखवून म्हणाला, ''ती पहा या अरण्यांत असलेल्या वानरांचीं हृदयें त्या झाडांवर लोंबकळत आहेत.'' औदुंबराची परिपक्व फळें पाहून मगराला वानराचें बोलणें खरें वाटलें, आणि तो म्हणाला, ''जर मी तुला तीरावर नेलें तर यांतील एखादें हृदय मला देशील काय !''

बोधिसत्त्व म्हणला, ''यांत काय संशय ? तुला वानराचें हृदय पाहिजे आहे हें मला आगाऊ समजलें असलें तर येथपर्यंत मला आणण्याची तसदीच तुला पडली नसती ! एक सोडून दहा हृदयें तुला तेव्हां देऊन टाकलीं असतीं ! आम्हाला त्याचा कांहीं उपयोग होत नसतो. उगाच शोभेंसाठीं आम्हीं तें ठेवीत असतों एवढेंच काय तें !''

मगरानें त्याला तीरावर नेऊन सोडल्यावर तो त्या औदुंबराच्या झाडावर चढून बसला आणि म्हणाला, ''अरे मूर्ख मगरा प्राण्यांची हृदयें झाडावर लोंबतात यावर तूं श्रद्धा ठेविलीस कशी ? तुझ्या देहाच्या प्रमाणानें डोक्यांत मेंदू नसल्यामुळें तुला सहज फसवतां आलें. आतां हीं औदुंबराची फळें घेऊन येथून चालता हो आणि पुनः गंगेच्या पलीकडील चांगल्या फळांच्या गोष्टी मला सांगू नकोस, मला माझा औदुंबरच श्रेष्ठ आहे. असें समज.''

जुगारांत हजार कार्षापण घालवल्यासारखें दुःख होऊन मगर आंसवें गाळीत अधोमुखानें तेथून निघून गेला !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel