१२९. निःस्पृहाचा वर.
(कण्हजातक नं. ४४०)
बोधिसत्त्व एका जन्मीं ब्राह्मणकुलांत जन्मला होता. जात्या तो जरा शामवर्ण असल्यामुळें त्याला कृष्ण हें नांव ठेवण्यांत आलें. कृष्ण लहानपणापासून अतिशय चलाख होता. ब्राह्मणानें त्याला तक्षशिलेला पाठवून सर्व विद्यांत पारंगत केलें. व तो पुनः घरीं आल्यावर त्याचा विवाह केला. परंतु बोधिसत्त्वाचें चित्त संसारांत रमलें नाहीं. आईबाप निवर्तल्यावर सर्व संपत्ती याचकांस वाटून देऊन तपस्विवेषानें तो हिमालयपर्वतावर जाऊन राहिला.
अरण्यवासांत काळ घालवित असतां तो आंबट आणि खारट पदार्थ खाण्याकरितां देखील गावांत येत नसे. माध्यान्हसमयीं जीं कांहीं फळेंमुळें मिळत असत त्यावर निर्वाह करून तो संतोषानें रहात असे. त्याच्या तपाच्या तेजानें इंद्राचें काश्मिरी पाषाणांचें सिंहासन तप्त झालें. आपणाला या स्थानापासून कोण भ्रष्ट करूं पहात आहे या विवंचनेने इंद्रानें जगाचें सूक्ष्म निरीक्षण केलें. तेव्हां बोधिसत्त्वाच्या तपश्चर्येचा हा प्रभाव आहे असें त्यास दिसून आले. तो तात्काल देवलोकीं अंतर्धान पावला आणि बोधिसत्त्वासमोर येऊन उभा राहिला व म्हणाला, ''हा असा कृष्णवर्ण तापसी कोण बरें ? याचा वर्णच काळा आहे असें नाहीं तर याचें भोजन देखील कृष्णच आहे आणि याचे निवासस्थान देखील कृष्णच दिसतें. सर्वतोपरी याचें आचरण मला आवडत नाहीं.''
हा इंद्र आहे हें बोधिसत्त्वानें तेव्हांच जाणलें आणि त्याच्या त्या उपरोधिक भाषणाला हें उत्तर दिलें ''हे इंद्रा, केवळ त्वचेच्या काळसरपणानें मनुष्य काळा होत नसतो. कां कीं, अंतःकरणाच्या शुद्धतेनें ब्राह्मण होत असतो. ज्या मनुष्याची कर्मे पापकारक असतात आणि त्यामुळें ज्याचें चित्त काळें झालेलें असतें तोच मनुष्य काळा होय.''
इंद्राला बोधिसत्त्वाच्या भाषणानें फार संतोष झाला आणि तो म्हणाला, ''भो ब्राह्मणा, तुझ्या सुभाषितानें मी प्रसन्न झालों आहे. आणि तूं जो वर मागशील तो देण्यास मी तयार आहे.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''हे देवराज, जर मला वर देण्याची तुमची इच्छा असेल तर क्रोध, द्वेष, लोभ आणि स्नेह या चार विकारांपासून मी सर्वथैव अलिप्त राहीन हाच मला वर द्या.''
देवता प्रसन्न झाली असतां भक्तलोक संपत्ती, अधिकार, पांडित्य, इत्यादिक वर मागत असतात. परंतु हा निःस्पृह तपस्वी दुसराच कांहीं वर मागत आहे हें पाहून चकित होऊन इंद्र म्हणाला, ''क्रोध, द्वेष, लोभ आणि स्नेह मनुष्यस्वभावाशीं संबद्ध झालेले आहेत. यांत कोणाला कांहीं विपरीत आहे असें वाटत नाहीं. मग तुला या मनोवृत्तींमध्यें कोणते दोष आढळले बरें ?''
बोधिसत्त्व म्हणाला, ''क्रोध उत्पन्न होतांना अग्निकणाप्रमाणें लहान असतो खरा, परंतु तो आवकाश सांपडला म्हणजे सारखा वाढत जातो आणि ज्याच्या आश्रयानें वाढतो त्यालाच खाऊन टाकतो. म्हणून अशा क्रोधापासून मुक्त रहाण्याची माझी इच्छा आहे. द्वेष हा क्रोधाचा भाऊ आहे. ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादि सर्व जातीमध्यें या द्वेषाची बीजें आपोआप रुजतात आणि त्या द्वेषापासून क्रोध उत्पन्न होऊन माणसाची भयंकर हानि होत असते. राष्ट्रा-राष्ट्रांतील विवाद, भावां-भावांतील तंटे, मायलेकांचें वितुष्ट किंवा पितापुत्रांची भांडणें ही सर्व द्वेषामूलकच नव्हेत काय ? हा द्वेषवैरी माझ्या शरीरांतून निघून गेला तर मी खरा सुखी असें मी समजेन. लोभ हें सर्व पापांचें मूळ आहे. लोभामुळें मनुष्य चोरी करण्यास प्रवृत्त होतो. लुटालुट, दुसर्याच्या राष्ट्रावर नाहक हल्ले, व्यापारांत फसवणूक इत्यादि सर्व अनर्थपरंपरा या लोभाच्यामुळें उद्भवते. म्हणून हा भयंकर रोग माझ्या अंतःकरणांतून नष्ट व्हावा ही माझी प्रार्थना आहे. स्नेह क्रोधलोभां इतका भयंकर नाही. तथापि, तो मनुष्यजातीचा शत्रूच म्हटला पाहिजे. आपला आप्त कुकर्मी असला तर स्नेहामुळें त्याचे अवगुण झांकण्याचा आपण प्रयत्न करतों त्याची तरफदारी करून इतरांशीं भांडण्यास आपण प्रवृत्त होतों. एवढेंच नव्हे तर केवळ अशा स्नेहापायीं कर्तव्याकर्तव्यांचा आम्हांस विचार रहात नाहीं. म्हणून व्यक्तिविषयक स्नेह माझ्या मनांतून नष्ट करावा अशी मी आपणास विनंति करितों.''
इंद्र बोधिसत्त्वाच्या या विवेचनानें अधिकच संतुष्ट झाला आणि म्हणाला, ''तुझ्या या सुभाषितावर प्रसन्न होऊन आणखीहि एक वर मी तुला देतों.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''जर आपली दुसरा वर देण्याची इच्छा असेल तर तो असा द्या कीं, या अरण्यांत निरोगी होऊन मी सुखानें रहावें. माझ्या तपश्चर्येत विघ्नें येऊं नयेत.''
इंद्र हाहि वर देऊन म्हणाला, ''तूं निःस्पृहांला साजेल असेच वर मागितलेस याबद्दल मी तुला तिसराहि वर देऊं इच्छितों.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''असें असेल तर मला असा वर द्या कीं, माझ्यापासून कोणत्याहि प्राण्याच्या शरीराला किंवा मनाला कशाहि प्रकारें इजा होऊं नये.''
इंद्रानें हाहि वर देऊन बोधिसतत्वाची फार स्तुति केली आणि आपण किती जरी वर दिले तरी निःस्पृह लोक धनादिकाची याचना करणार नाहींत असें जाणून आणखी वर देण्याच्या भरीस न पडतां तो तेथेंच अंतर्धान पावला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.