त्यावर वेष पालटलेला पुरोहित म्हणाला, ''रे म्हातार्‍या तूं राजाला शिव्या कां देतोस ? म्हातारपणानें तुझी दृष्टि अधूं झाली आहे व तेणेंकरून तुला नीट दिसत नाहीं म्हणून तुझ्या पायांत हा काटा रुतला. तेव्हां राजाला दोष न देतां दृष्टीलाच दोष दे.''

म्हातारा म्हणाला, ''बाबारे मी ब्रह्मदत्ताला शाप कां देतो याचें वर्म तुला माहीत नाहीं. त्याच्या निष्काळजीपणामुळें दिवसां त्याचे जमीनमहसूल वसूल करणारे वगैरे कामदार आम्हास लुटीत आहेत व रात्रीं चोर लुटीत आहेत. आमच्या घरांत असलेले नसलेले सर्व कांहीं धन नष्ट झाल्यामुळें जीवित रक्षणाची देखील मारामार पडत आहे. आमच्या गावावर सरकारी कामदाराची धाड आली म्हणजे घराभोंवतीं कांटे घालून घर ओसाड आहे असें भासवून आम्ही जंगलांत पळून जातों व तें लोक निघून गेले म्हणजे पुनः कांटेरी कुंपण दूर काढून घरांत शिरण्यास रस्ता करितो. आज सकाळीं कामगार लोक आमच्या उरावर बसण्यास येणार होते. म्हणून पोराबाळाला घेऊन आम्ही जंगलांत पळून गेलों व हें कुंपण घालून ठेविलें. आतां मुलेबाळें परत येत आहेत त्यांच्यासाठीं रस्ता साफ करीत होतों, इतक्यांत हा काटा माझ्या पायांत रुतला. यानें पांचालाच्या अव्यवस्थित राज्याची मला चांगलीच खूण पटविली. व मी त्याला शाप देऊं लागलों. आतां यांत माझा कांही अपराध आहे तर तुम्हीच सांगा.''

वेषपालटलेला राजा म्हणाला, ''अहो हा म्हातारा योग्य बोलत आहे. पांचाल राजाचाच हा सारा दोष आहे. राज्यव्यवस्था नीट असती तर घराभोंवती कांट्यांची कुंपणें घालून लोक पळून कां जाते ?'' पुरोहित म्हणाला ''आपण आतां दुसरीकडे जाऊ व तेथील लोक कसे रहातात याची चौकशी करूं.''

जवळच्या गावांत एक म्हातारीबाई पांचाळराजाला शिव्या देत असलेली त्यांनीं पाहिली आणि पुरोहित तिला म्हणाला, ''बाई, तूं राजाला शिव्या कां देतेस ?'' ती म्हणाली, ''माझ्या या दोन पोरी अद्यापि अविवाहित राहिल्या आहेत. त्यांची उमर होऊन गेली आहे तथापि त्यांना नवरा मिळत नाहीं. मग राजाला शिव्या देऊं नये तर काय करावें ?''

पुरोहित म्हणाला, ''अग वेडे म्हातारी, तुझ्या मुलींना राजानें नवरे शोधित बसावें काय ? मग माथेफिरूप्रमाणें राजाला शिव्यां कां देतेस ?'' म्हातारी म्हणाली, ''बाबारे, मी कांहीं वेडी नाहीं; परंतु विचार करूनच राजाला मी दोष लावीत आहे. राजा अधार्मिक झाल्यामुळें लोकांची उपजिविका होणें कठीण झालें आहे. रात्रींचे चोर लुटत आहेत आणि दिवसां राजाचे कामगार लुटत आहेत. अशा स्थितींत केवळ उदरनिर्वाह चालणें कठीण झालें आहे. मग विवाह करून कुटुंबाची जबाबदारी शिरावर कोण घेईल ?''

आतां तुम्हीच सांगा कीं मी जी राजाला माझ्या विपत्तीचा दोष लावते तो बरोबर आहे कीं नाहीं. त्या दोघांनाहि त्या म्हातारीचें म्हणणें पटलें व ते तेथून दुसरीकडे जाण्यास निघाले. वाटेंत एक शेतकरी आपल्या जखमी होऊन पडलेल्या बैलाकडे पाहून मोठ्याने उद्‍गारला ''हा माझा बैल फाळानें जसा जखमी झाला तसाच पांचाळ राजा युद्धात जखमी होऊन पडो.'' तें ऐकून पुरोहित म्हणाला ''मूर्खा राजाचा आणि तुझ्या बैलाचा संबंध काय ? तुझ्या निष्काळजीपणामुळें बैल जखमी झाला आहे असें असतां राजाला शाप काय म्हणून देतोस.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel