या सिंहाच्या हुकूमाप्रमाणें कोल्हा डोंगराच्या पायथ्याशीं शिकार दिसल्याबरोबर गुहेच्या द्वाराशीं येऊन ''महाराज, आपल्या तेजाचा प्रकाश पाडा'' असें म्हणत असे व सिंह ताबडतोब धावत जाऊन शिकार पकडून आणीत असे. कांहीं काळ गेल्यावर कोल्ह्याची अशी समजूत झाली कीं, सिंह आपल्यापेक्षां फारसा बळकट नसतां केवळ आपल्या स्तुतीच्या जोरावर हत्ती सारख्या मोठ्या प्राण्यावर झडप घालून त्याची शिकार करतो. तो एके दिवशीं सिंहाला म्हणाला, ''महाराज, आजपासून आपल्या जिवावर मीं पुष्कळ सुख भोगलें आहे. पण आतां मला यापुढें परपुष्टतेचा कंटाळा आला आहे. ''तुम्ही शिकारीची टेहळणी करून मला यापुढें तुझ्या तेजाचा प्रकाश पाड'' असें म्हणत जा म्हणजे तुमच्याप्रमाणें गुहेंतून बाहेर पडून मी एकदम शिकार धरून आणीन.''

सिंहानें कोल्ह्याची समजून घालण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला. तो म्हणाला, ''बाबारे, आजपर्यंत हत्तीची शिकार करणारा कोल्हा कोणी पाहिला नाहीं. विनाकारण तूं या भानगडींत पडूं नकोस. मी केलेल्या शिकारीवर निर्वाह करण्याला शरम वाटण्याचें कांहीं कारण नाहीं.''

सिंहाचा हा उपदेश न ऐकतां कोल्ह्यानें हत्तीवर स्वारी करण्याचा हट्टच धरला. तेव्हां सिंहानें हत्तीची टेहळणी करण्याचें कबूल केलें, व कोल्हा गुहेंत सिंहासारखा बसून राहिला. डोंगराच्या पायथ्याशीं हत्तीला पाहिल्याबरोबर सिंह गुहेच्या द्वाराशीं येऊन म्हणाला, ''जंबुक महाराज, आपल्या तेजाचा प्रकाश पाडा !''

कोल्हा सिंहाप्रमाणें मोठ्या डौलानें गुहेंतून बाहेर पडला व धांवत जाऊन त्यानें हत्तीच्या गंडस्थळावर मोठ्या जोरानें उडी टाकली पण तेथों नखें रोवण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें तो खाली पडला. हत्तीनें पुढला पाय त्याच्या डोक्यावर ठेऊन मेंदू बाहेर काढला आणि तो तेथून निघून गेला. कोल्हा परत आला नाहीं असें पाहून सिंह त्याच्या शोधार्थ गेला व त्याची ही दुर्दशा पाहून म्हणाला, ''अरे मूर्खा तूं तुझ्या तेजाचा प्रकाश न पाडतां डोक्यांतून मेंदू मात्र बाहेर पाडलास ! तुझ्यासारखे स्तुतीच्या बळावर पराक्रम करूं पाहणारे प्राणी अशा रीतीनें मरण पावतात !''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel