१३०. लोकापवादाचें भय.

(कण्हदीपायनजातक नं. ४४४)


मांडव्य किंवा कृष्णद्वैपायन हे दोघे ॠषि फलमूलांवर निर्वाह करून रहात असत. कांहीं कालानें खारट आणि आंबट पदार्थांचें सेवन करण्यासाठीं ते कौशांबीला आले. तेथें द्वैपायनाचा मांडव्य नांवाचा एक गृहस्थ लहानपणाचा मित्र होता. त्यानें या दोघांलाहि एक पर्णशाला बांधून देऊन त्यांचा चांगला आदर-सत्कार ठेविला. बराच काळ या दोघां ॠषींनी कौशांबींत घालविला आणि आपल्या मित्राचा निरोप घेऊन यात्रेसाठीं तेथून प्रयाण केलें. फिरत फिरत ते दोघे वाराणसीला आले. तेथेंहि लोकांनीं त्यांचा योग्य गौरव केला व गांवाबाहेर त्यांस एक पर्णकुटी बांधवून दिली. कांहीं दिवस तेथें राहून कृष्णाद्वैपायन परत कौशांबीला गेला. पण मांडव्य ॠषि तेथेंच राहिला.

एके दिवशीं वाराणसींतील एका घरीं चोरी झाली. चोर गटाराच्या वाटेनें पळून गेले. लोक त्यांचा पाठलाग करीत मांडव्याच्या कुटीजवळ आले. सर्व सामान घेऊन पळून जाणें शक्य नसल्यामुळें चोरांनीं तें मांडव्य ॠषीच्या कुटींत टाकून देऊन पळ काढिला. लोकांनीं कुटीला वेढा दिला व सर्व सामान जप्‍त केलें. हा तपस्वी दिवसा तपश्चर्या करून रात्री चोरी करतो अशी सर्वांची समजूत होऊन त्यांनी त्याला पकडून राजाकडे नेले. राजा आपला अंतःपुरांत दंग झाला असल्यामुळें त्याला सर्व खटल्याची सुनावणी करून घेण्यास सवड नव्हती. त्यानें एकदम हुकूम दिला कीं, या तपस्व्याला निंबाच्या सुळावर चढवावें. राजपुरुषांनीं निंबाचा सूळ आणला. तो ॠषीला लागूं पडेना. दुसरे लोखंडाचे वगैरे पुष्कळ सूळ लावून पाहिले. पण त्यांनीहि त्याला कांहीं इजा होईना. तेव्हां पुढें काय करावें अशा विवंचनेंत ते पडले.

मांडव्य ॠषीला पूर्वजन्माचें स्मरण करण्याचें सामर्थ्य होतें. कोणत्या पापानें हा आळा आपणावर आला आणि सुळावर जाण्याची पाळी आली हें तो अंतज्ञानानें पाहूं लागला. तेव्हां आपण कांचनवृक्षाच्या काठीचा बारीक सूळ करून एका माशीला टोंचला होता. ही गोष्ट त्याच्या स्मरणांत आली. आणि त्या पापापासून आपण मुक्त होणार नाहीं असें जाणून तो म्हणाला, ''हे राजपुरुषहो, तुम्हाला जर मला सुळावर द्यावयाचेंच असेल तर कांचनवृक्षाचा सूळ तयार करून आणा. मग तुमचा कार्यभाग सिद्धीस जाईल. त्याच्या सांगण्याप्रमाणें राजपुरुषांनी त्याला कांचनवृक्षाच्या सुळावर चढविलें. कृष्णद्वैपायन मित्राचा समाचार पुष्कळ दिवस कळला नाही म्हणून कौशांबीहून वाराणसीला आला. तेथें मांडव्याला सुळावर दिल्याची बातमी लागल्यामुळें तो त्या ठिकाणीं आला. मांडव्यॠषीला सुळापासून म्हणण्यासारखी मुळींच इजा झाली नव्हती. त्याला पाहून द्वैपायन म्हणाला, ''बा मित्रा, तुला प्राणांतिक वेदना होत नाहींत ना ?''

मांडव्य म्हणाला, ''मी जसें एखाद्या वृक्षाच्या फांदीवर बसावें तसा या सुळावर बसून राहिलों आहे.''

द्वैपायन म्हणाला, ''पण ज्या राजानें तुला फाशी देवविलें, व ज्या माणसांनी तुला फाशी दिलें, आणि जे येथें बसून तुझ्यावर पहारा करीत आहेत त्या सर्वांला शाप देण्याची बुद्धि तुला झाली नाही ना ?''

मांडव्य म्हणाला, ''मित्रा द्वैपायना, माझ्या हृदयांत क्रोध-सर्पाचा अंगुष्ठमात्र प्रवेश झाला नाहीं. कां कीं, मला सुळावर चढविण्याचा हुकून देणार्‍या राजावर, सुळावर चढविणार्‍या माणसांवर आणि पहारा करणार्‍या पहारेकर्‍यांवर माझ्या अंतःकरणांत मैत्री जागृत राहिली आहे.

द्वैपायनाचा आणि मांडव्याचा संवाद ऐकून पहारेकर्‍यांना एक प्रकारची भीति आणि आदरबुद्धि वाटली. आमच्या राजानें गैरसमजुतीनें भलत्याच माणसाला दंड केला अशी त्यांची खात्री झाली आणि राजाला त्यांनीं हें सर्व वृत्त निवेदिलें. राजा स्वतः त्या ठिकाणीं आला व मांडव्याला साष्टांग दंडवत घालून त्याची त्यानें क्षमा मागितली व सूळ बाहेर काढण्यास एकदम आज्ञा केली. पण कांहीं केल्या सूळ बाहेर निघेना. मांडव्य म्हणाला, ''महाराज, सूळ बाहेर काढण्याच्या खटपटीनें मला फार त्रास होतो. तेव्हां बाहेरचा भाग तेवढा कापून टाका म्हणजे झालें.'' सुळाचा बाहेरचा भाग कापून टाकण्यात आला. मांडव्याच्या उदरांत कांहीं भाग राहिला खरा, पण त्यापासून त्याला कांहीं रजा झाली नाहीं. तेव्हांपासून त्याला लोक अणिमांडव्य म्हणूं लागले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel