बोधिसत्त्वानें ही कोल्ह्याची अट संतोषानें कबूल केली.

दुसर्‍या दिवसापासून कोल्ह्याच्या गणनेला सुरुवात झाली. सगळे उंदीर त्याजवळून गेल्यावर शेवटल्या उंदरावर झडप घालून त्याला तो तेथेंच उडपून टाकीत असे व आपल्या पोटाखालीं झाकून ठेऊन इतर दूर गेले म्हणजे मग त्याचा फळहार करीत असे. बोधिसत्त्वाची आणि त्याच्या कळपांतील उंदीरांची अशी दृढ समजूत होती कीं, कोल्हा मोठा धार्मिक असून तो तपस्व्याप्रमाणें आपला निर्वाह पाण्यावर आणि फलमूलावर करीत आहे. आणि म्हणूनच आपल्या कळपांतील उंदीर कमी होत जातात याचें कारण काय हें समजण्यास त्यांना बराच विलंब लागला. परंतु हा प्रकार फार दिवस चालणें शक्य नव्हतें. दिवसेंदिवस कळप क्षीण होत चालला. हे उंदीर गेलें कोठें बरे ? हें बोधिसत्त्वाला समजेंना. कोल्ह्याला विचारावें तों तो म्हणे कीं, कळपांतील उंदरांची संख्या बरोबर आहे. सकाळीं संध्याकाळीं गणना करून आपणाला त्यांत कांहीं न्यून आढळून येत नाहीं. परंतु बोधिसत्त्वाला त्याच्या सचोटीची अधिकाधिक शंका येऊं लागली. एके दिवशीं रोजच्याप्रमाणें गणनेच्या वेळीं सर्वाच्या पुढें न जातां तो दडून बसला व सर्व पुढें गेल्यावर आपण हळूंच मागून निघाला. कोल्ह्यानें वहिवाटीप्रमाणें त्यावर झडप घातली. परंतु बोधिसत्त्व अत्यंत सावध असल्यामुळें त्याला झपाट्यासरशीं पकडतां आलें नाहीं. इतक्यांत बोधिसत्त्वानें कोल्ह्याच्या नरडीवर उडी टाकून कडकडून चावा घेतला तेव्हां तो दांभिक कोल्हा वेदनेनें विव्हल होऊन मोठ्यानें आरडं लागला. तें पाहून बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''हे दुष्ट कोल्ह्या, धर्माच्या पांघरुणाखालीं तूं आमचे गळे कापीत होतास ! लोकांना विश्वास दाखवून त्यांचा घात करणें याला धर्म म्हणत नाहींत ! याला पाहिजे तर मार्जारव्रत असें म्हणावें ! ही तुझी शेंडी धर्मज्ञान संपादण्यासाठीं नसून पोटाची खळी भरण्यासाठीं आहे ! या तुझ्या शाट्याचें आतां प्रायश्चित भोग !

कोल्हा तरफडत खालीं पडला असतां बोधिसत्त्वाच्या कळपातील उंदरानीं त्याला तेथेंच ठार केलें.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४९. आळसाच्या रोगावर रामबाण उपाय !
(कोसियजातक नं. १४०)


एका जन्मी बोधिसत्त्व ब्राह्मण कुलांत जन्मला. वयांत आल्यावर चार वेद आणि सर्व शास्त्रें यांत पारंगत होऊन वाराणसी नगरींत पुष्कळ शिष्यांना तो पढवीत असे. त्याचा एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पुरें झाल्यावर काशींतील एका मुलीशीं विवाह करून तेथेंच घरदार बांधून रहात असे. पण या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती. तिच्या बाह्यरूपाविरुद्ध तिचे गुण होते. बिचारा तरुण तिच्या रूपाला भुलून ती जें म्हणेल तें करण्यास तत्पर असे. सकाळीं उठून पोटांत दुखण्याचें निमित्त करून ती बाई अंथरुणावर पडून राही, व नवर्‍यास म्हणे कीं, माझ्यानें काहीं करवत नाहीं. तुम्ही चांगलें जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हावयाची नाहीं बिचार्‍या नवर्‍यानें घरांतील सगळीं कामें करावीं. एवढेंच नव्हे तर, ती जें म्हणेल तें तिला द्यावें व कधींकधीं आपण अर्ध्याच पोटीं रहावें, असा क्रम चालविला. अर्थात् त्या बाईचा रोग उत्तरोत्तर वाढतच गेला. तिचे शरीर पुष्ट होत होतें ! परंतु पोटदुखीला कांहीं गुण पडेना ! गरीब बिचारा तरुण तिच्या रोगानें अतिशय कंटाळून गेला. एके दिवशीं बोधिसत्त्वाच्या दर्शनाला गेला असतां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''कायरे आजकाल तूं कोठें दिसत नाहींस. तुझा चेहरा देखील अगदीं फिक्कट दिसतो. तुझें सर्व कांहीं ठीक चाललें आहेना ?''

तो म्हणाला, ''गुरुजी, मी निरोगी आहे पण माझ्या तरुण बायकोच्या रोगानें मला भंडावून सोडलें आहे ! दिवसें दिवस तिचा रोग वाढत जात आहे, व त्यामुळें माझ्या जिवाला चैन पडत नाहीं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''असा तिला रोग तरी कोणता आहे ? काय ताप येतो, किंवा अन्न रुचत नाहीं, कीं होतें तरी काय ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel