गावाचे नाव होते आमोदे. मोठे सुंदर होते गाव. नावाप्रमाणेच गावाची कीर्ती होती. आमोद म्हणजे सुवास. त्या गावाच्या कीर्तीचा सुवास आजूबाजूस सर्वत्र पसरला होता. गावातील सारे लोक सुखी होते. गाव स्वच्छ होता. गावाला वेत्रवती नदीमुळे शोभा आली होती. सकाळ-संध्याकाळ केव्हाही पाहा. नदीचे तीर मुलाबाळांनी, बायामाणसांनी, गुराढोरांनी गजबजलेले दिसे.

आमोदे गाव उदार होते. सारे लोक प्रेमळ होते. एकमेकांस मदत करीत. कोणी कोणाचे उणे पाहात नसे. द्वेष नाही, मत्सर नाही; परंतु अलिकडे काय झाले कोणास कळे. पूर्वीसारखे ते गाव राहिले नाही. प्रेम कमी झाले. सहानुभूती नाहीशी झाली. जो तो स्वत:पुरते पाहू लागला. कोणी मानासाठी हपापले. कोणी सत्तेसाठी. गावातील सुख संपले. भांडणे सुरू झाली. आमोदे गावाला उतरती कळा लागली.

पूर्वी या गावाची एक आख्यायिका होती. दर वर्षी दिवाळी आली म्हणजे स्वर्गातील माळ या गावात येई. ज्याने सर्वांत सुंदर देणगी दिली असेल त्याच्या गळयात ती माळ पडत असे. देवाघरची माळ, तिचा वास दशदिशांना पसरे; परंतु अलिकडे बारा वर्षांत तशी माळ आली नाही. गावाची पुण्याई संपली. देवाची अवकृपा झाली. देवाला आवडणारे कृत्य जणू कोणीच करीना; देवाला आवडेल अशी देणगी कोणी देईना.

परंतु या वर्षी अशी दाट वदंता उठली होती की, स्वर्गातील माळ येणार येणार! भविष्य करण्यात आले होते. कोणाच्या गळयात पडणार ती माळ? लोकांचे तर्क सुरू झाले. कोणी नास्तिक व शंकेखोर म्हणू लागले, 'कसची येते माळ! गेले ते पूर्वीचे दिवस. सार्‍या गप्पा आहेत.'

त्या आमोदे गावात एक श्रीमंत जमीनदार राहात होता. त्याचे टुमदार घर होते. त्याला मुलगा नव्हता, परंतु तीन मुली होत्या. तिन्ही मुली मोठया सुंदर होत्या. हिरी, माणकी व रुपी अशी त्यांची नावे होती. त्यांच्याकडे एक मुलगी कामाला येत असे. त्या मुलीचे नाव होते सखू.

सखूची आई गरीब होती. ती मोलमजुरी करी. तिचा नवरा वारला होता. तिला सखू एवढी एकच मुलगी होती. आमोदे गावात ती नुकतीच आलेली होती. सखू फार लहान नव्हती, फार मोठी नव्हती. त्या श्रीमंताच्या मुलींच्या बरोबरीचीच ती होती. असेल बारा-तेरा वर्षांची. सखू प्रेमळ होती, प्रामाणिक होती, सारे काम टापटिपीने व स्वच्छतेने करी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel