'काय अशक्य!' पित्याने विचारले.

'मोहनचं जाईशी लग्न होणं अशक्य.' मोहन म्हणाला.

'कोण म्हणतो अशक्य?' पित्याने प्रक्षुब्ध होऊन विचारले.
'मी म्हणतो.' मोहनने निश्चयाने सांगितले.

'मोहन, विचार कर. आतापर्यंत तू माझी कधीही अवज्ञा केली नाहीस. आजपर्यंत माझी आज्ञा पाळलीस. ही आज्ञाही पाळ. वृध्द पित्याचं मन दुखवू नकोस.' रामजी म्हणाला.

'बाबा, ह्या एका गोष्टीशिवाय इतर काहीही सांगा. कडयावरून उडी टाकायला सांगा; समुद्रात बुडी घ्यावयास सांगा; विषाचा पेला तोंडाला लावायला सांगा; आगीतून जावयास सांगा; - हा मोहन ते सर्व आनंदानं करील; परंतु ही गोष्ट नको.' मोहन दृढ स्वराने म्हणाला.

'का नको? ज्या दिवशी जाईला मी आपल्या घरी आणलं, त्या दिवसापासून हे स्वप्न मी माझ्या मनात खेळवीत आहे. इतकी वर्षं मनात धरलेली आशा,- ती का तू मातीत मिळवणार? मोहन, घरात राहावयाचं असेल तर माझी आज्ञा मानली पाहिजे. माझ्या पित्यानं आज्ञाभंग कधी सहन केला नाही. तुझा बापही स्वत:चा आज्ञाभंग सहन करणार नाही. मुलानं बापाचं ऐकलंच पाहिजे अशी आपल्या कुळाची परंपरा आहे. ही परंपरा तूही चालव.' रामजी म्हणाला.

'बाबा, जाई व मी बहीण-भावाप्रमाणे वागत आलो. दुसरा विचार कधी मनात आला नाही. बहिणीजवळ का लग्न लावायला मला सांगता? पिता झाला म्हणून त्याची अपवित्र आज्ञा ऐकायची की काय? पिता थोर आहे, परंतु पित्याहून सत्य थोर आहे. पावित्र्य थोर आहे, कुळाची पवित्र परंपरा चालवावी, अपवित्रता बंद करावी.' मोहन म्हणाला.

रामजीचा संताप अनावर झाला. क्रोधाने तो थरथरू लागला. शेवटी तो मोहनला म्हणाला, -'तुला एक महिन्याची मी मुदत देतो; तेवढया अवधीत काय तो विचार कर. बर्‍या बोलानं मी सांगतो तसं करायला सिध्द हो, नाही तर ह्या घरातून तोंड काळं करून चालता हो. तू माझा मुलगाच नाहीस असं मी समजेन. मोहन मेला असं मानीन. जा. माझ्यासमोर उभा नको राहूस.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel