आईचे असे शब्द ऐकले की गोपाळाच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे होई. आईच्या एका आश्वासनपर शब्दाने जगातील सारे अपमान तो विसरून जाई. पायाखाली तुडवले गेलेले, सुकलेले गवत चार थेंब पडताच पुन्हा टवटवीत दिसते, मान वर करते. आईच्या शब्दांनी गोपाळचे पोळलेले मन तसेच टवटवीत होत असे.
काही दिवस गेले. पुन्हा एकदा गुरूजी गोपाळावर असेच खवळले. त्यांनी त्याचा कान चांगलाच पिरगळला; त्याच्या थोबाडीतही त्यांनी दिली.‘, हल्ला!’ असे म्हणून बाकावर त्यांनी त्याला उभे केले.
शाळा सुटली. प्रत्येक जण गोपाळाला पाहून हसे व नाक मुरडी. आपले भाऊ तरी आपल्या दु:खात वाटेकरी होतील असे गोपाळाला वाटले व त्याने भावांस हाका मारल्या; परंतु भावांनी ऐकले न ऐकलेसे केले. ते इतर मुलांबरोबर ऐटीत पुढे जात होते. आपल्या बुध्दिहीन भावाबरोबर चालण्याची त्यांस लाज वाटत होती. शेवटी गोपाळच आपण होऊन त्यांच्याकडे धावत गेला; परंतु ते पाठचे भाऊ वस्कन त्याच्या अंगावर गेले व म्हणाले, 'मोठा आला दादा! झालेत दादा, पण अक्कल असेल तर शपथ. आमच्याबरोबर नको येऊस. तुझ्यामुळं आम्हालाही मुलं चिडवितात. तुझा मूर्खपणा आणि आम्हाला उगीच त्रास. तू एक पुढं तरी जा, नाही तर मागं तरी राहा.'
गोपाळ मागे राहिला. भावांचे ते कठोर विषासारखे शब्द ऐकून त्याच्या हृदयाचे पाणी-पाणी झाले. तो खिन्नपणे मंद-मंद पावले टाकीत चालला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. जगाने केलेल्या अपमानाचे त्याला विशेष वाटले नाही; परंतु सख्ख्या भावांनी केलेला अपमान, त्याला झोंबला; परंतु ते भाऊ होते. त्यांना क्षमा करणे हा त्याचा धर्म होता. त्याने आपल्या भावांना केव्हाच क्षमा केली.
वामन व हरी हरणासारखे उडया मारीत घरी पुढे गेले. ते दोघे आईजवळ गेले व म्हणाले. 'आई, दादाला कशाला ग शाळेत पाठवतेस? त्याला आज गुरूजींनी बाकावर उभं केलं. आम्ही त्याचे भाऊ म्हणून इतर मुलं आम्हासही नावं ठेवतात. आई, असा कसा ग दादा अगदी मूर्ख, अगदी शुध्द टोणपा- -' आईने एकदम मुलांच्या तोंडावर हात ठेवला व ती म्हणाली, 'छी: छी:, असं बोलू नये. अरे तो तुमचा वडील भाऊ ना? लोक बोलले तर ते बोलून-चालून लोकच मुळी; परंतु तुम्हीही त्याला अशी नावं ठेवलीत तर त्याला कोणी धीर द्यावा? कुणाकडे त्यानं पाहावं, कुणाकडे जावं? त्याच्यावर तुम्ही प्रेम करा हो. त्याला अंतर नका हो देऊ--' 'आम्हाला नाही अशा दगडावर प्रेम करता येत!' ते म्हणाले व बाहेर खेळावयाला निघून गेले.