धर्मा त्या वस्त्राला कधी धूत नसे. फाटावयाचे एखादे वेळी लवकर आणि ते थोडेच मळणार होते? गंगा का मळते, चंद्रसुर्य का मावळतात, देव का मळतो? प्रेम हे मळत नाही. ते सदैव उजळतच असते. धर्माजवळची ती चिंधी. श्रीमंतांनी ती पाहून नाक धरले असते. त्यांना तिची दुर्गंधी आली असती. अत्तरे, तेले, चमचमीत पदार्थ, फुलांचे हार गजरे हयांचाच वास घेण्याची त्यांच्या श्रीमंत नाकांना सवय झालेली असते. धर्माच्या चिंधीतील पितृभक्तीचा वास, प्रेमाचा वास, तो समजण्याची शक्ती त्यांच्या नाकात उरलेली नव्हती.
ती फाटलेली चिंधी आणखी फाटेल म्हणून धर्मा भीत असे. किती हळू हाताने तो ती धरी. जणू फुल कुस्करेल, अंकुर मोडेल. कमळावर भुंगा जितक्या हळूवार रीतीने बसतो, तितक्या हळुवारपणाने तो ती चिंधी धरी. कोणी ती चिंधी चोरील असे त्याला वाटे. एखादा दुसरा भिकारी हात पुसायला, नाक पुसायला ही चिंधी नेईल असे त्याला वाटे. भिकारी भिकार्यांचीही चोरी करतात! चिंधीही जवळ नसणार्या भिकार्यांपेक्षा धर्मा हा श्रीमंत होता. चिंधीचा तो मालक होता. चिंधीचा भांडवलवाला होता.
त्या दिवशी सरदार गोपाळदास यांच्याकडे विवाहसोहळा होता. गोपाळदासांची मुलगी हेमलता हिचा विवाह होता. हेमलता किती तरी शिकलेली होती. श्रीमंत बापाची ती लाडकी लेक; त्यात पुन्हा विद्याविभूषित आणि सुंदर मग काय विचारता? विलायतेत जाऊन आलेल्या एका तरूणाशी तिचा विवाह होणार होता. वूध-वरांचा जोडा फारच अनुरूप होता. सागर व सरिता, चंद्र व रोहिणी असा हा जोडा आहे, असे बडे लोक म्हणत.
गोरज मुहूर्तावर लग्न होते. शेकडो मोटारी येत होत्या. श्रीमंत स्त्री-पुरूष येत होते. विजेचा चमचमाट होता. वाद्ये वाजत होती. रेडिओ लागले होते. फुलांचा, अत्तरांचा घमघमाट सुटला होता. मोठया थाटात लग्न लागले.
दुसर्या दिवशी गोपाळदासांकडे मोठी मेजवानी होती. दिवाणखान्यात मनोहर बिछाईत केलेली होती. लोड होते, तक्के होते, पानसुपारीची चांदीची तबके होती. श्रीमंतांची थुंकी झेलावयाला पिकदाण्या तयार होत्या. संगीत चालले होते, खेळ चालले होते. तेथे कशाची वाण नव्हती.
पंक्ती बसल्या. चंदनाचे पाट होते, चांदीची ताटे होती. उदबत्त्यांचा घमघमाट होता. पक्वांन्नांचा सुवास सुटला होता. मंडळी जेवावयाला बसली. आग्रह होत होता. मंडळीचे नको नको चालले होते. प्रत्येकाच्या पानात चार उपाशी लोकांचे पोट भरेल इतके अन्न फुकट जात होते. 'अहो, घ्या आणखी एक लाडू व मग वर सोडा घ्या, पोट हलके होईल. घ्या की...' असे चालले होते. डॉक्टर आहेत, सोडे आहेत मग खायला कमी का करावे? परंतु श्रीमंतांची चैन निराळयाच प्रकारची असते. नीरो नावाच्या रोमन बादशहाला रोम शहराला आग लावून ती बघण्यात मौज वाटे. तसेच ह्या श्रीमंतांना अन्नाचा नाश करण्यात मौज वाटत असते. 'कोणाच्या पानात काही टाकले नसेल' तर ते श्रीमंतांना अपमानाचे वाटते. ज्याच्याकडे अन्न जास्त फुकट जाते तो जास्त श्रीमंत.